१. मी या शहराची शपथ घेतो.
२. आणि तुम्ही या शहरात वास्तव्य करता.
३. आणि (शपथ आहे) मानवी पिता आणि संततीची.
४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले.
५. काय मनुष्य असे समजतो की तो कोणाच्या नियंत्रणाखाली नाही?
६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली.
७. काय, तो (असे) समजतो की कोणी त्याला पाहिलेच नाही?
८. काय, आम्ही त्याचे दोन डोळे नाही बनविले?
९. आणि एक जीभ व दोन ओठ (नाही बनविले?)
१०. आणि त्याला दोन्ही मार्ग दाखवून दिले.
११. तेव्हा, घाटीत प्रवेश करणे त्याला शक्य झाले नाही.
१२. तुम्हाला काय माहीत की तो घाटी मार्ग काय आहे?
१३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे.
१४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे.
१५. एखाद्या नातेवाईक अनाथाला.
१६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला.
१७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात.
१८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे.
१९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत.
२०. हेच आगीच्या कोंडीत असतील जी चारी बाजूंनी घेरलेली असेल.