All Islam Directory
1

१. अलिफ-लाम-मीम.

2

२. अल्लाह तो आहे, ज्याच्याशिवाय कोणीही उपासनीय नाही. तो सदैव जिवंत आहे आणि सर्वांचा रक्षणकर्ता आहे.

3

३. ज्याने सत्यासह हा ग्रंथ (कुरआन) अवतरित केला, जो आपल्या पूर्वीच्या (अवतरित धर्मग्रंथां) ची सत्यता सिद्ध करतो. आणि त्यानेच (यापूर्वीचे धर्मग्रंथ) तौरात आणि इंजील अवतरित केले

4

४. यापूर्वीच्या लोकांच्या मार्गदर्शनासाठी, आणि कुरआनदेखील त्यानेच उतरविले. जे लोक अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त (कठोर) अज़ाब आहे. आणि अल्लाह जबरदस्त आहे आणि सूड घेणारा.

5

५. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाहपासून धरती आणि आकाशाची कोणतीही वस्तू लपलेली नाही.

6

६. तोच मातेच्या गर्भात तुमचा चेहरा-मोहरा, जसे इच्छितो बनवितो. त्याच्याशिवाय कोणीही वस्तुतः उपासना करण्यायोग्य नाही. तो शक्ती-सामर्थ्य बाळगणारा आणि हिकमतशाली आहे.

7

७. तोच अल्लाह होय, ज्याने तुमच्यावर ग्रंथ अवतरित केला, ज्यात स्पष्ट आणि ठोस आयती आहेत, जो मूळ ग्रंथ आहे आणि काही समान आयती आहेत. मग ज्यांच्या मनात वक्रता आहे तर ते समान आयतींच्या मागे पडतात, फितुरी माजविण्याकरिता आणि त्याच्या स्पष्टीकरणाकरिता, परंतु त्यांच्या खऱ्या उद्दिष्टाला अल्लाहशिवाय कोणीही जाणत नाही. आणि परिपूर्ण व मजबूत ज्ञान राखणारे विद्वानदेखील हेच म्हणतात की आम्ही तर त्यांच्यावर ईमान राखले आहे. हे सर्व आमच्या पालनकर्त्यातर्फे आहे, आणि बोध-उपदेश तर केवळ बुद्धिमान लोकच प्राप्त करतात.

8

८. हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर आमच्या मनात वाकडेपणा येऊ देऊ नकोस आणि आम्हाला आपल्या जवळून दया- मेहरबानी प्रदान कर. निःसंशय, तूच सर्वांत मोठा दाता आहेस.

9

९. हे आमच्या पालनकर्त्या! निश्चितच तू एक दिवस लोकांना एकत्र करणार आहे, ज्याच्या येण्याविषयी काहीच शंका नाही. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या वायद्याविरूद्ध जात नाही.

10

१०. इन्कारी लोकांना त्यांची धन-दौलत आणि त्यांची संतती अल्लाहच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासून सोडिवण्यात काही कामी येऊ शकणार नाही आणि हे लोक तर जहन्नमचे इंधन आहेतच.

11

११. ज्याप्रमाणे फिरऔनच्या संततीची दुर्दशा झाली आणि त्यांची, जे त्यांच्यापूर्वी होऊन गेले त्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले, मग अल्लाहने त्यांना त्यांच्या अपराधाबद्दल पकडीत घेतले आणि अल्लाह मोठी सक्त (कठोर) शिक्षा देणारा आहे.

12

१२. काफिर लोकांना (इन्कार करणाऱ्यांना) सांगा की तुम्हा लोकांना निकट भविष्यात पराभूत केले जाईल आणि तुम्हाला जहन्नमकडे जमा केले जाईल आणि किती वाईट ठिकाण आहे ते!

13

१३. निःसंशय, तुमच्यासाठी (बोधदायक) निशाणी होती, त्या दोन समूहांमध्ये जे आपसात भिडले होते. त्यापैकी एक समूह अल्लाहच्या मार्गात लढत होता आणि दुसरा समूह काफिरांचा (इन्कारी लोकांचा) होता, जो त्यांना आपल्या डोळ्यांनी दुप्पट झालेले पाहात होता. आणि अल्लाह ज्याला इच्छितो, आपल्या मदतीने मजबूत (सामर्थ्यवान) करतो. निःसंशय, डोळे असणाऱ्यांकरिता यात मोठा बोध-उपदेश आहे.

14

१४. आवडत्या व मनपसंत गोष्टींचे प्रेम लोकांसाठी सुशोभित केले गेले आहे. उदाहरणार्थ, स्त्रिया आणि पुत्र, सोने-चांदीचे जमा केलेले खजिने, आणि निवडक निशाणीचे घोडे आणि गुरे-ढोरे व शेती वगैरे. ही सर्व ऐहिक जीवनाची सामग्री आहे आणि परतण्याचे उत्तम ठिकाणतर अल्लाहच्याच जवळ आहे.

15

१५. तुम्ही सांगा, काय मी तुम्हाला याहून उत्तम अशी गोष्ट सांगू अल्लाहचे भय राखणाऱ्या लोकांकरिता, त्यांच्या पालनकर्त्याजवळ जन्नती आहेत ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्यात ते नेहमी नेहमी राहतील, आणि पाक साफ (स्वच्छ-शुद्ध) पत्न्या आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहची प्रसन्नता आहे आणि सर्वच्या सर्व दास अल्लाहच्या नजरेत आहेत.

16

१६. जे असे म्हणतात की, हे आमच्या पालनर्त्या! आम्ही ईमान राखले, यास्तव आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आम्हाला आगीच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासून वाचव.

17

१७. जे धीर-संयम राखणारे, आणि सच्चे-प्रामाणिक व आज्ञाधारक आणि अल्लाहच्या मार्गात धन खर्च करणारे आहेत आणि रात्रीच्या अखेरच्या भागात (मोक्ष प्राप्तीकरिता) क्षमा-याचना करणारे आहे.

18

१८. अल्लाह, त्याचे फरिश्ते आणि ज्ञानी विद्वानांनी साक्ष दिली आहे की अल्लाहशिवाय कोणीही माबूद (उपासना करण्यायोग्य) नाही, तो न्यायाला कायम राखणारा आहे, तोच जबरदस्त हिकमत राखणारा आहे. त्याच्याशिवाय कोणीही उपासना करण्यास योग्य नाही.

19

१९. निःसंशय, अल्लाहच्या जवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे.१ (अल्लाहकरिता परिपूर्ण आत्मसमर्पण) आणि ज्यांना ग्रंथ दिला गेला, त्यांनी ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्वेष-मत्सरामुळे मतभेद केला आणि जो अल्लाहच्या आयतींना (पवित्र कुरआनाला) न मानेल तर अल्लाह लवकरच हिशोब घेईल.

20

२०. जर ते तुमच्याशी भांडण-तंटा करतील तर तुम्ही सांगा की मी आणि माझ्या अनुयायींनी स्वतःला अल्लाहकरिता समर्पित केले आणि तुम्ही ग्रंथधारक व अशिक्षित लोकांना सांगा की काय तुम्ही इस्लामचा स्वीकार केला आहे. जर ते इस्लामचा स्वीकार करतील तर त्यांनी सरळ मार्ग प्राप्त करून घेतला आणि जर तोंड फिरवतील तर तुमची जबाबदारी केवळ (संदेश) पोहचविण्याची आहे, आणि अल्लाह आपल्या दासांना स्वतःच पाहत आहे.

21

२१. निःसंशय, जे लोक अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात आणि अल्लाहच्या पैगंबरांची नाहक हत्या करतात आणि जे लोक न्यायाची गोष्ट बोलतात त्यांचीही हत्या करतात, तर (हे पैगंबर!) तुम्ही त्यांना फार मोठ्या अज़ाब (शिक्षा-यातने) ची सूचना द्या.

22

२२. त्यांची सर्व सत्कर्मे या जगात आणि आखिरतमध्ये वाया गेलीत. आणि त्यांचा कोणीही सहाय्यक (मदत करणारा) नाही.

23

२३. काय तुम्ही नाही पाहिले ज्यांना ग्रंथाचा एक भाग दिला गेला आहे ते आपल्या आपसातील फैसल्याकरिता अल्लाहच्या ग्रंथाकडे बोलाविले जातात, तरीदेखील त्यांच्यातला एक समूह तोंड फिरवून परत जातो.

24

२४. याला कारण त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांना काही मोजकेच दिवस आग स्पर्श करील. या त्यांच्या मनाने रचलेल्या गोष्टींनी त्यांना त्यांच्या दीन (धर्मा) बाबत धोक्यात टाकलेले आहे.

25

२५. मग काय अवस्था होईल, जेव्हा त्यांना आम्ही त्या दिवशी एकत्रित करू ज्या दिवसाच्या येण्याविषयी काहीच शंका नाही आणि प्रत्येक माणसाला आपल्या कृत-कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि त्यांच्यावर अत्याचार केला जाणार नाही.

26

२६. तुम्ही सांगा, हे अल्लाह! हे साऱ्या जगाचा स्वामी! तू ज्याला इच्छितो राज्य प्रदान करतो आणि ज्याच्याकडून इच्छितो राज्य हिरावून घेतो आणि तू ज्याला इच्छितो मान-प्रतिष्ठा प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो अपमानित करतो. तुझ्या हाती सर्व भलाई आहे. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीचा सामर्थ्य बाळगतो.

27

२७. तूच रात्रीला दिवसात दाखल करतो आणि तूच दिवसाला रात्रीत दाखल करतो. तूच निर्जीवातून सजीवाला निर्माण करतो आणि सजीवातून निर्जीव बाहेर काढतो आणि तो तूच आहेस जो, ज्याला इच्छितो अगणित व अमर्याद रोजी (आजिविका) प्रदान करतो.

28

२८. ईमान राखणाऱ्यांनी, ईमानधारकांना सोडून काफिर लोकांना (इन्कारी लोकांना) आपला मित्र बनवू नये आणि जो कोणी असे करील तर त्याला अल्लाहतर्फे कोणेतही समर्थन नाही. परंतु हे की त्याच्या भय-दहशतीमुळे एखाद्या प्रकारच्या संरक्षणाचा इरादा असेल आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह स्वतः तुम्हाला आपले भय दाखवित आहे आणि (शेवटी) अल्लाहकडेच परतून जायचे आहे.

29

२९. सांगा, वाटल्यास तुम्ही आपल्या मनातील गोष्टी लपवा किंवा जाहीर करा अल्लाह त्या सर्व गोष्टी जाणतो. आकाशांमध्ये आणि धरतीवर जे काही आहे ते सर्व त्याला माहीत आहे. अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य राखतो.

30

३०. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्य आपल्या चांगल्या-वाईट कृत-कर्माला हजर असलेले (समक्ष) पाहील तेव्हा ही इच्छा करील की त्याच्या आणि अपराधाच्या दरम्यान खूप दूरचे अंतर असते तरी किती चांगले झाले असते! अल्लाह तुम्हाला आपले भय राखण्याची ताकीद करतो आणि अल्लाह आपल्या दासांवर अतिशय मेहरबान व कृपावान आहे.

31

३१. तुम्ही सांगा, जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहशी (सच्चे) प्रेम राखत असाल तर माझ्या मार्गाचे अनुसरण करा, अल्लाह स्वतः तुमच्यावर प्रेम करील आणि तुमचे अपराध माफ करील आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे.

32

३२. तुम्ही सांगा की अल्लाह आणि रसूल (पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचे आज्ञापालन करा. जर ते तोंड फिरवतील तर निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह काफिरांना (इन्कारी लोकांना) दोस्त राखत नाही.१

33

३३. निःसंशय, अल्लाहने सर्व लोकांमधून आदमला आणि नूहला आणि इब्राहीमच्या घराण्याला व इमरानच्या घराण्याला निवडून घेतले.

34

३४. की हे सर्व आपसात एकमेकांची संतान आहेत आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो.

35

३५. जेव्हा इमरानची पत्नी म्हणाली, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या गर्भात जे काही आहे मी त्याला तुझ्या नावाने मोकळे सोडण्याचा १ नवस मानला, तेव्हा तू या नवसाचा स्वीकार कर. निःसंशय, तू चांगल्याप्रकारे ऐकणारा आणि जाणणारा आहेस.’’

36

३६. जेव्हा बाळाला जन्म दिला, तेव्हा म्हणू लागली, हे माझ्या पालनहार! मला तर मुलगी झाली आहे. अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो की काय जन्माला घातले आहे आणि मुलगा मुलीसारखा नाही. मी तिचे नाव मरियम ठेवले आहे. मी तिला व तिच्या संततीला तिरस्कृत सैताना (च्या उपद्रवा) पासून तुझ्या आश्रयाखाली देते.

37

३७. तिला तिच्या पालनकर्त्याने चांगल्या प्रकारे स्वीकारले आणि तिचे सर्वांत उत्तम प्रकारे पालनपोषण करविले, जकरियाला तिचा देखभाल करणारा बनविले. जेव्हा जेव्हा जकरिया मरियमच्या खोलीत (उपासना-कक्षेत) जात तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ अन्न-सामग्री ठेवलेली आढळून येत असे. जकरिया विचारीत की हे मरियम! तुमच्याजवळ ही रोजी (आजिविका) कोठून आली? ती उत्तर देत असे की हे सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या जवळून आहे. निःसंशय, अल्लाह ज्याला इच्छितो अमर्याद रोजी प्रदान करतो.

38

३८. त्याच स्थानावर जकरिया यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ- प्रार्थना केली. म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! मला आपल्या जवळून नेक संतान प्रदान कर. निःसंशय, तू दुआ ऐकणारा आहे.

39

३९. मग फरिश्त्यांनी हाक मारली जेव्हा ते आपल्या हुजुऱ्यात उभे राहून नमाज पढत होते, की अल्लाह तुम्हाला यहिया (नावाच्या पुत्राचा) शुभ समाचार देतो जो अल्लाहच्या वचना (कलिमा) ची सत्यता सिद्ध करणारा, जनसमूहाचा प्रमुख, अल्लाहचे भय राखून वागणारा आणि पैगंबर असेल, नेक व सदाचारी लोकांपैकी.

40

४०. जकरिया म्हणू लागले, हे माझ्या पालनकर्त्या! मला पुत्र कसा बरे होईल? मी खूप म्हातारा झालो आहे आणि माझी पत्नी वांझ आहे. (फरिश्ते) म्हणाले, अशाच प्रकारे अल्लाह जे इच्छितो करतो.

41

४१. जकरिया म्हणाले, हे पालनकर्त्या! माझ्यासाठी एखादी निशाणी दे. फर्माविले, निशाणी ही की तीन दिवसपर्यंत तू लोकांशी बोलू शकणार नाहीस, केवळ इशाऱ्यांनी समजावशील. तू आपल्या पालनकर्त्याचे जास्तीतजास्त स्मरण कर, आणि सकाळ-संध्याकाळ त्याची महानता वर्णन कर.

42

४२. आणि जेव्हा फरिश्ते म्हणाले, हे मरियम! अल्लाहने तुझी निवड केली, आणि तुला पाक (स्वच्छ-शुद्ध) केले आणि सर्व जगातील स्त्रियांमध्ये तुझी निवड केली.

43

४३. हे मरियम! तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशांचे पालन करा आणि सजदा करा (अल्लाहच्या पुढे माथा टेका) आणि रुकुउ करणाऱ्यांसह (झुकणाऱ्यांसोबत) रुकुउ करा (झुकत जा).

44

४४. या ग़ैब (अपरोक्ष) च्या बातम्या आहेत, ज्या आम्ही तुम्हाला वहयी करीत आहोत. तेव्हा तुम्ही त्या वेळी त्यांच्याजवळ नव्हते, जेव्हा ते आपले कलम (लेखणी) टाकू लागले होते की त्यांच्यापैकी मरियमचे पालनपोषण कोण करील? आणि ना तुम्ही त्यांच्या भांडणप्रसंगी त्यांच्याजवळ होते.१

45

४५. जेव्हा फरिश्ते म्हणाले, हे मरियम! अल्लाह तुम्हाला आपल्या एका कलिमा १ चा शुभ समाचार देतो ज्याचे नाव मरियमचा पुत्र मसीह ईसा आहे, जो या जगात आणि मरणोत्तर जीवनात सन्मानित आहे आणि तो माझ्या निकट दासांपैकी आहे.

46

४६. तो लोकांशी पाळण्यात (असतानाही) संभाषण करील आणि मोठ्या वयातही १ आणि तो नेक सदाचारी लोकांपैकी असेल.

47

४७. मरियम म्हणाली, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मला मुलगा कसा बरे होईल? वास्तविक मला अद्याप कोणा पुरुषाने स्पर्शही केलेला नाही.’’ फरिश्ते म्हणाले, ‘‘अशा प्रकारे अल्लाह जे इच्छितो निर्माण करतो. अल्लाह जेव्हा एखादे कार्य करू इच्छितो तेव्हा फक्त एवढेच म्हणतो- ‘होऊन जा’ आणि ते घडून येते.’’

48

४८. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला लिहिणे आणि बुद्धिमानता आणि तौरात व इंजील शिकवील.

49

४९. आणि तो इस्राईलच्या संततीचा रसूल (पैगंबर) असेल की मी तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याची निशाणी आणली आहे, मी तुमच्यासाठी पक्ष्याच्या रूपासारखीच मातीची एक चिमणी बनवितो, मग तिच्यात फुंकर मारतो तर ती अल्लाहच्या हुकुमाने (जिवंत) पक्षी बनते आणि मी अल्लाहच्या हुकुमाने जन्मजात आंधळ्याला आणि कोढी इसमाला चांगले करतो, आणि मेलेल्याला जिवंत करतो आणि जे काही तुम्ही खाऊन येता आणि जे काही तुम्ही आपल्या घरांमध्ये जमा करता मी ते तुम्हाला सांगतो. यात तुमच्यासाठी मोठी निशाणी आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल!

50

५०. आणि मी तौरातची सत्यता साबीत करणारा आहे, जो माझ्यासमोर आहे आणि मी अशासाठी आलो आहे की तुमच्यासाठी त्या काही वस्तूंना हलाल (वैध) करावे, ज्या तुमच्यासाठी हराम (अवैध) केल्या गेल्या आहेत.१ आणि मी तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याची निशाणी घेऊन आलो आहे यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझ्या मार्गाचे अनुसरण करा.

51

५१. निःसंशय, माझा आणि तुमचा पालनहार अल्लाहच आहे, तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा. हाच सरळ मार्ग आहे.

52

५२. परंतु जेव्हा (हजरत) ईसा यांना, त्या लोकांचा इन्कार जाणवला तेव्हा म्हणू लागले, ‘‘अल्लाहच्या मार्गात माझी मदत करणारा कोण-कोण आहे?’’ हवारींनी उत्तर दिले की आम्ही आहोत अल्लाहच्या मार्गात मदतनीस. आम्ही अल्लाहवर ईमान राखले आणि तुम्ही साक्षी राहा की आम्ही मुस्लिम आहोत.

53

५३. हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही तू अवतरित केलेल्या (संदेशा) वर ईमान राखले आणि आम्ही तुझ्या रसूल (पैगंबरा) चा मार्ग पत्करला, तेव्हा आता तू आम्हाला सत्याची साक्ष देणाऱ्यांमध्ये लिहून घे.

54

५४. आणि इन्कार करणाऱ्यांनी षङ्‌यंत्र रचले आणि अल्लाहनेदेखील योजना बनविली आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व योजना आखणाऱ्यांपेक्षा उत्तम आहे.

55

५५. जेव्हा अल्लाहने फमार्विले, ‘‘हे ईसा! मी तुम्हाला पूर्णतः घेणार आहे आणि तुम्हाला आपल्याकडे उचलून घेणार आहे आणि तुम्हाला इन्कारी लोकांपासून मुक्त राखणार आहे आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुमच्या अनुयायींना इन्कारी लोकांवर श्रेष्ठतम राखणार आहे.’’ मग तुम्ही सर्वांना माझ्याकडेच परतावयाचे आहे, मीच तुमच्या दरम्यान समस्त मतभेदांचा फैसला करीन.

56

५६. मग इन्कार करणाऱ्यांना तर मी या जगात आणि आखिरतमध्ये अतिशय सक्त अज़ाब (कठोर शिक्षा-यातना) देईन आणि त्यांना कोणी मदत करणाराही नसेल.

57

५७. परंतु ईमान राखणाऱ्यांना आणि सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह पुरेपूर मोबदला प्रदान करील आणि अल्लाह, अत्याचारी लोकांशी प्रेम राखत नाही.

58

५८. हे जे आम्ही तुम्हाला वाचून ऐकिवत आहोत, आयती आहेत आणि बोध-पत्र आहे (हिकमतीने पूर्ण असा संदेश आहे.)

59

५९. अल्लाहजवळ ईसाचे उदाहरण आदमसारखे आहे, ज्याला मातीद्वार निर्माण करून फर्माविले, ‘‘होऊन जा’’ बस तो घडून आला.

60

६०. तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य हेच आहे, खबरदार! शंका-संवशय धरणाऱ्यांपैकी होऊ नका.

61

६१. यास्तव जो कोणी, तुमच्याजवळ हे ज्ञान येऊन पोहोचल्यानंतरही तुमच्याशी याबाबत वाद घालील तर तुम्ही सांगा की या आम्ही आणि तुम्ही आपापल्या पुत्रांना आणि आम्ही व तुम्ही आपापल्या पत्नींना आणि आम्ही व तुम्ही स्वतः आपल्याला बोलावून घेऊ, मग आम्ही सर्व मिळून दुआ (प्रार्थना) करू या आणि खोट्या लोकांवर अल्लाहचा धिःक्कार पाठवू या.

62

६२. निःसंशय, हेच सत्य निवेदन आहे आणि अल्लाहशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास योग्य नाही आणि निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि हिकमतशाली आहे.

63

६३. तरीही जर ते मान्य न करतील तर अल्लाहदेखील विद्रोह (बंड) करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.

64

६४. तुम्ही सांगा की, ‘‘हे ग्रंथ बाळगणाऱ्या लोकांनो! अशा न्यायपूर्ण गोष्टीकडे या जी आमच्या व तुमच्या दरम्यान समान आहे की आम्ही अल्लाहशिवाय अन्य कोणाचीही उपासना करू नये आणि ना अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करावे ना अल्लाहला सोडून आपसात एकमेकाला रब (पालनहार) बनवून घ्यावे.’’ जर ते तोंड फिरवतील तर सांगा की साक्षी राहा की आम्ही तर मुस्लिम आहोत.

65

६५. हे ग्रंथधारकांनो! तुम्ही इब्राहीमच्या बाबतीत का वाद घालता? वास्तविक तौरात आणि इंजील (हे ग्रंथ) तर त्यांच्यानंतर अवतरित केले गेले. मग काय तुम्ही तरीही समजत नाहीत?

66

६६. ऐका! तुम्ही लोक आता या गोष्टीबाबत वाद घालून चुकलात, जिचे तुम्हाला ज्ञान होते. आता या गोष्टीबाबत का झगडता, जिचे तुम्हाला अजिबात ज्ञान नाही? आणि अल्लाह सर्वकाही जाणतो, तुम्ही नाही जाणत.

67

६७. इब्राहीम ना तर यहूदी होते, ना ख्रिश्चन, किंबहुना ते तर पूर्णपणे मुस्लिम होते. ते मूर्तिपूजकही नव्हते.

68

६८. सर्व लोकांपेक्षा जास्त इब्राहीमच्या निकट ते लोक आहेत ज्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि हे पैगंबर आणि ते लोक ज्यांनी ईमान राखले, ईमानधारकांचा मित्र आणि मदतकर्ता अल्लाह आहे.

69

६९. ग्रंथधारकांची एक टोळी असे इच्छिते की तुम्हाला (सत्य मार्गापासून) विचलित करावे. वास्तविक ते स्वतःच स्वतःला भटकावित आहेत आणि समजत नाहीत.

70

७०. हे ग्रंथधारकांनो! तुम्ही स्वतः साक्षी असतानाही अल्लाहच्या आयतींना का मानत नाहीत?

71

७१. हे ग्रंथधारकांनो! जाणून घेतल्यानंतरही सत्य आणि असत्याचे मिश्रण का करता, आणि सत्य का लपविता?

72

७२. आणि ग्रंथधारकांचा एक समूह म्हणाला की जे काही ईमानधारकांवर उतरविले गेले आहे, त्यावर दिवसाच्या सुरुवातीला ईमान राखा आणि संध्याकाळ होताच इन्कार करा, यासाठी की या लोकांनीही परत फिरावे.

73

७३. (ते असेही म्हणतात) आणि तुमच्या दीन-धर्मावर चालणाऱ्यांशिवाय आणखी कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही सांगा, निःसंशय, मार्गदर्शन तर अल्लाहचेच मार्गदर्शन आहे (आणि असेही म्हणतात की या गोष्टीवरही विश्वास ठेवू नका) की कोणाला त्यासारखे दिले जावे, जसे तुम्हाला दिले गेले आहे किंवा हे की हे तुमच्याशी तुमच्या पालनकर्त्याजवळ वाद घालतील. तुम्ही सांगा की फज़्ल (श्रेष्ठता) तर अल्लाहच्या हाती आहे. तो ज्याला इच्छितो प्रदान करतो. अल्लाह अतिशय महान आणि सर्व काही जाणणारा आहे.

74

७४. ती आपल्या दया-कृपेने ज्याला इच्छितो खास करून घेतो, आणि अल्लाह मोठा कृपाशील आणि अतिशय महान आहे.

75

७५. आणि काही ग्रंथधारक असेही आहेत की तुम्ही त्यांना खजीन्याचे विश्वस्त बनवाल तरीही तुम्हाला परत करतील आणि त्यांच्यापैकी काही असेही आहेत की जर तुम्ही त्यांना एक दिनारही ठेव म्हणून द्याल तर जोपर्यंत तुम्ही त्यांच्या डोक्यावर उभे न राहाल तोपर्यंत तुम्हाला परत करणार नाहीत. हे अशासाठी की त्यांनी सांगून ठेवले आहे की या अशिक्षितांचा हक्क मारण्यात आमच्यावर काहीच गुन्हा नाही. हे लोक जाणून घेतल्यानंतरही अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलतात.

76

७६. का नाही (पकड होईल) परंतु जो मनुष्य आपला फायदा पूर्ण करील आणि अल्लाहचे भय राखील तर अल्लाह अशा भय राखणाऱ्यांना आपला दोस्त राखतो.

77

७७. निःसंशय, जे लोक अल्लाहशी केलेला वचन-करार आणि आपल्या शपथांना थोड्याशा किंमतीवर विकून टाकतात त्यांच्यासाठी आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह ना तर त्यांच्याशी संभाषण करील, ना कियामतच्या दिवशी त्यांच्याकडे पाहील, ना त्यांना पाक (पवित्र) करील, आणि त्यांच्यासाठी मोठा दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

78

७८. निश्चितच त्यांच्यात एक समूह असाही आहे जो ग्रंथाचे वाचन करताना आपल्या जीभेला मोड देतो, यासाठी की तुम्ही त्याला ग्रंथातलाच मजकूर समजावे. वास्तविक तो ग्रंथातला मजकूर नाही आणि ते असेही म्हणतात की ते अल्लाहतर्फे आहे, वास्तविक ते अल्लाहतर्फे नाही. ते जाणूनबुजून अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलतात.

79

७९. ज्याला अल्लाहने ग्रंथ, हिकमत (बुद्धिमानता) आणि प्रेषित्व प्रदान करावे अशा एखाद्या माणसाकरिता हे उचित नव्हे की तरीही त्याने लोकांना सांगावे की अल्लाहला सोडून माझे दास (उपासक) बना, किंबहुना तो तर असेच म्हणेल की तुम्ही सर्व लोक ‘रब’ (पालनकर्त्या) चे व्हा ज्याअर्थी तुम्ही ग्रंथ शिकविता आणि त्याचा पाठदेखील देता.

80

८०. आणि तो तुम्हाला हा आदेश नाही देणार की फरिश्त्यांना आणि पैगंबरांना आपले आराध्य दैवत बनवून घ्या, काय आज्ञाधारक झाल्यानंतर तो तुम्हाला अवज्ञाकारी बनण्याचा आदेश देईल?

81

८१. आणि जेव्हा अल्लाहने पैगंबरांकडून वचन घेतले की जे काही मी तुम्हाला ग्रंथ आणि हिकमत देईन, मग तुमच्याजवळ तो रसूल (पैगंबर) येईल जो तुमच्याजवळ असलेल्या ग्रंथाची सत्यता दर्शवील तर त्याच्यावर ईमान राखणे व त्याची मदत करणे तुमच्यावर बंधनकारक आहे. फर्माविले की तुम्ही काय हे कबूल करता आणि त्यावर माझी जबाबदारी घेता? सर्व म्हणाले, आम्हाला मान्य आहे. फर्माविले, तर साक्षी राहा आणि मी स्वतःदेखील तुमच्यासोबत साक्षी आहे.

82

८२. आता यानंतरही जो परत फिरेल, तो निश्चितच अवज्ञाकारी आहे.

83

८३. काय ते अल्लाहच्या दीन-धर्माला सोडून दुसऱ्या एखाद्या दीन-धर्माच्या शोधात आहेत? वास्तविक आकाशांमध्ये व धरतीवर वास्तव्य करणारे सर्वच्या सर्व अल्लाहचे आज्ञाधारक आहेत. मग राजीखुशीने असो किंवा लाचार होऊन, सर्वांना त्याच्याचकडे परतविले जाईल.

84

८४. तुम्ही सांगा, ‘‘आम्ही अल्लाहवर आणि जे काही आमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे इब्राहीम आणि इस्माईल आणि याकूब आणि त्यांच्या संततीवर उतरविले गेले आणी जे काही मुसा आणी ईसा आणि इतर पैगबरांना अल्लहाच्या तर्फे प्रदान केले गेले त्या सर्वांवर ईमान ( विश्वास) राखलेे,आम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही दरम्यान फरक करीत नाही आणि आम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहचे आज्ञधारक आहोत.’’

85

८५. आणि जो कोणी इस्लामऐवजी अन्य एखाद्या दीन-धर्माचा शोध करील त्याचा तो दीन-धर्म कबूल केला जाणार नाही आणि तो आखिरतमध्ये तोटा उचलणाऱ्यांपैकी राहील.

86

८६. अल्लाह कशाप्रकारे त्या लोकांना मार्गदर्शन करील, जे स्वतः ईमान राखल्यानंतर, पैगंबरांची सत्यता जाणण्याची साक्ष दिल्यानंतर आणि आपल्या स्वतःजवळ स्पष्ट निशाणी येऊन पोहोचल्यानंतरही इन्कारी व्हावेत. अल्लाह अशा अत्याचारींना सरळ मार्ग दाखवित नाही.

87

८७. त्यांची शिक्षा ही की, त्यांच्यावर अल्लाहचा धिःक्कार आहे आणि फरिश्त्यांचा व समस्त लोकांतर्फेही धिःक्कार आहे.

88

८८. ते सदैव त्यात राहतील ना त्यांची सजा हलकी (सौम्य) केली जाईल आणि ना त्यांना कसली सूट दिली जाईल.

89

८९. परंतु जे लोक यानंतर तौबा (क्षमा-याचना) करून (आपल्या आचरणात) सुधार करून घेतली तर निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, मेहरबान आहे.

90

९०. निःसंशय, जे लोक स्वतः ईमान राखल्यानंतर कुप्र (इन्कार) करतील मग इन्कार करण्यात अधिक पुढे जातील तर त्यांची तौबा (क्षमा-याचना) कधीही कबूल केली जाणार नाही आणि हेच लोक मार्गभ्रष्ट आहेत.

91

९१. निःसंशय, जे लोक काफिर (इन्कारी, अविश्वासी) असतील, आणि मरेपर्यंत काफिर राहतील, त्यांच्यापैकी जर कोणी अज़ाबपासून सुटका मिळविण्यासाठी दंड (फिदिया) म्हणून जमिनीइतके सोने देईल, तरीही ते कधीही स्वीकारले जाणार नाही. अशाच लोकांकरिता सक्त अज़ाब (अतिशय कठोर शिक्षा-यातना) आहे आणि त्यांचा कोणी मदतकर्ता नाही.

92

९२. जोपर्यंत तुम्ही आपल्या आवडत्या व प्रिय धन-संपत्तीतून अल्लाहच्या मार्गात खर्च न कराल, तोपर्यंत तुम्हाला भलाई लाभणार नाही, आणि जे काही तुम्ही खर्च कराल, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

93

९३. तौरात (हा ग्रंथ) उतरण्यापूर्वीच (हजरत) याकूब यांनी ज्या वस्तूला स्वतःसाठी हराम करून घेतले होते, त्याच्याव्यतिरिक्त सर्व खाद्यवस्तू इस्राईलच्या संततीकरिता हलाल होत्या. (हे पैगंबर!) तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही सच्चे असाल तर तौरात आणा, आणि वाचून ऐकवा.

94

९४. तरीही जे लोक सर्वश्रेष्ठ अल्लाहवर खोटा आरोप लावतील तर असे लोक अत्याचारी आहेत.

95

९५. तुम्ही सांगा की अल्लाह आपल्या कथनात सच्चा आहे. तुम्ही सर्व इब्राहीमच्या जनसमूहाच्या मार्गाचे अनुसरण करा, जे मूर्तिपूजक नव्हते.

96

९६. निःसंशय, (सर्वश्रेष्ठ अल्लाहचे) पहिले घर, जे लोकांसाठी बनविले गेले, तेच आहे, जे मक्का येथे आहे, जे साऱ्या जगाकरिता शुभ- मंगलप्रद आणि मार्गदर्शक आहे.

97

९७. ज्यात स्पष्ट निशाण्या आहेत. ‘मुकामे इब्राहीम’ (एक दगड आहे, ज्यावर काबागृहाचे बांधकाम करताना हजरत इब्राहीम उभे राहात) इथे जो कोणी दाखल झाला, त्याला शांती लाभली. अल्लाहने त्या लोकांवर, जे या घरापर्यंत येण्याचे सामर्थ्य राखतात, १ या घराचे हज्ज आवश्यक ठरविले आहे आणि जो कोणी इन्कार करील तर सर्वश्रेष्ठ अल्लाहला सर्व जगाच्या लोकांची काही पर्वा नाही.

98

९८. तुम्ही त्यांना सांगा, हे ग्रंथधारकांनो! तुम्ही अल्लाहच्या आयतींचा इन्कार का करता? आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह त्यावर साक्षी आहे.

99

९९. त्या ग्रंथधारकांना सांगा की तुम्ही अल्लाहच्या मार्गा (धर्मा) पासून त्या लोकांना का रोखता, ज्यांनी ईमान राखले आहे, आणि त्यात वाईटपणा शोधता, वास्तविक तुम्ही स्वतः साक्षी आहात आणि अल्लाह तुमच्या कर्मांशी अनभिज्ञ नाही.

100

१००. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्ही ग्रंथधारकांच्या एखाद्या समूहाचे म्हणणे ऐकाल तर तुम्ही ईमान राखल्यानंतरही तो तुम्हाला इन्कार (कुप्र) कडे फिरवील.

101

१०१. आणि (अर्थात हे कारण आहे) तुम्ही कशा प्रकारे इन्कार करू शकता, वास्तविक तुम्हाला अल्लाहच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, आणि तुमच्या दरम्यान पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) हजर आहेत, आणि जो अल्लाहच्या दीन-धर्माला मजबूतपणे धरेल तर निःसंशय त्याला सरळमार्ग दाखविला गेला आहे.

102

१०२. हे ईमानधारकांनो! अल्लाहचे एवढे भय राखा, जेवढे त्याचे भय राखले पाहिजे आणि पाहा मरेपर्यंत ईमानधारकच राहा.

103

१०३. आणि अल्लाहचा दोर सर्वांनी मिळून मजबूतपणे धरून ठेवा, आणि आपसात गटबाजी करू नका आणि अल्लाहची त्या वेळीची नेमत आठवा जेव्हा तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू होते. अल्लाहने तुमच्या हृदयात प्रेम निर्माण केले आणि तुम्ही त्याच्या कृपा देणगीने बांधव झाले आणि तुम्ही आगीच्या खड्याच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले होते तेव्हा अल्लाहने तुम्हाला वाचविले. सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा प्रकारे आपल्या आयतींचे निवेदन करतो यासाठी की तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करू शकावे.

104

१०४. आणि तुमच्यापैकी एक समूह असा असला पाहिजे, ज्याने भल्या कामांकडे बोलवावे आमि सत्कर्मांचा आदेश द्यावा आणि वाईट कामांपासून रोखावे आणि हेच लोक सफल होणारे आहेत.

105

१०५. आणि तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी आपल्याजवळ स्पष्ट प्रमाण येऊन पोहोचल्यानंतर ही फूट पाडली व मतभेद करू लागले, अशा लोकांसाठी सक्त सजा-यातना आहे.

106

१०६. त्या दिवशी काही चेहरे सफेद (तेजस्वी) असतील आणि काही चेहरे काळे१ असतील. काळ्या चेहऱ्यांच्या लोकांना सांगितले जाईल की तुम्ही ईमान राखल्यानंतर कुप्र (इन्कार, अविश्वास) का केला? आता आपल्या इन्कार करण्याची सजा चाखा.

107

१०७. आणि सफेद (तेजस्वी) चेहऱ्यांचे लोक अल्लाहच्या दयेत (कृपाछत्राखाली) असतील आणि त्यात नेहमी नेहमी राहतील.

108

१०८. (हे पैगंबर!) आम्ही या सत्य आयती तुम्हाला वाचून ऐकवित आहोत, आणि लोकांवर जुलूम अत्याचार करण्याचा, अल्लाहचा इरादा नाही.

109

१०९. आणि जे काही आकाशांमध्ये व धरतीवर आहे ते सर्व अल्लाहचेच आहे. अल्लाहच्याकडेच सर्व कामांना रुजू व्हायचे आहे.

110

११०. तुमचा जनसमूह, सर्वोत्तम जनसमूह आहे, जो लोकांसाठी निर्माण केला गेला आहे, कारण तुम्ही सत्कर्मांचा आदेश देता आणि दुष्कर्मांपासून रोखता आणि अल्लाहवर ईमान राखता. जर ग्रंथधारकांनीही ईमान राखले असते तर त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते. त्यात काही ईमान बाळगणारेही आहेत परंतु अधिकांश लोक दुराचारी आहेत.

111

१११. असे लोक तुम्हाला सताविण्याखेरीज आणखी जास्त काही नुकसान पोहचवू शकत नाहीत आणि जर तुमच्याशी लढाई झाली तर पाठ दाखवून पळ काढतील. मग कोणी त्यांची मदत करायला येणार नाही.

112

११२. असे लोक प्रत्येक ठिकाणी अपमानित होत राहतील, तथापि अल्लाहच्या किंवा लोकांच्या आश्रयाखाली असतील तर गोष्ट वेगळी. मात्र हे लोक अल्लाहच्या प्रकोपास पात्र ठरले आणि त्यांच्यावर दारिद्य्र आणि दुर्दशा टाकली गेली. हे अशासाठी झाले की हे लोक अल्लाहच्या आयातींचा इन्कार करीत होते, आणि पैगंबरांची नाहक हत्या करीत होते. हा मोबदला त्यांच्या आज्ञाभंगाचा आणि मर्यादा पार करण्याचा आहे.

113

११३. हे सर्वच्या सर्व एकसमान नाहीत, किंबहुना या ग्रंथधारकांत एक समूह (सत्यावर) कायमही आहे, जे रात्री अल्लाहच्या आयतींचे पठण करतात व सजदा (अल्लाहसमोर माथा टेकत) करीत असतात.

114

११४. हे लोक अल्लाह आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखतात, सत्कर्मांचा आदेश देतात आणि दुष्कर्मांपासून रोखतात आणि भल्या कामांमध्ये घाई करतात. हे नेक व सदाचारी लोकांपैकी आहेत.

115

११५. आणि हे जे काही नेकीचे काम करतील, त्याची उपेक्षा केली जाणार नाही आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह, परहेजगार (अल्लाहचे भय राखून वागणाऱ्या) लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.

116

११६. निःसंशय, इन्कारी लोकांना त्यांची धन-संपत्ती आणि त्यांची संतती अल्लाहच्या इथे काहीच उपयोगी पडणार नाही. हे तर जहन्नमी (नरकवासी) आहेत, ज्यात ते नेहमी पडून राहतील.

117

११७. ते जे काही या ऐहिक जीवनात खर्च करतात, ते त्या वादळासारखे आहे, ज्यात कडाक्याची थंडी असावी, जे एखाद्या जुलमी जनसमूहाच्या शेतावरून जावे आणि त्याचा सर्वनाश करून टाकावा१ अल्लाहने त्यांच्यावर अत्याचार नाही केला, उलट ते स्वतः आपल्या प्राणांवर अत्याचार करीत होते.

118

११८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही आपला जीवलग मित्र ईमानधारकांशिवाय दुसऱ्या कोणाला बनवू नका (तुम्ही नाही पाहत दुसरे लोक तर) तुमचा सर्वनाश करण्यात काहीच कसर बाकी ठेवत नाही. ते तर असे इच्छितात की तुम्ही दुःखातच पडून राहावे. त्यांची शत्रूता तर स्वतः त्यांच्या तोंडून उघड झाली आहे आणि त्यांच्या मनात जे काही आहे ते तर आणखी जास्त आहे. आम्ही आपल्या आयती तुम्हाला स्पष्ट करून सांगितल्या तुम्ही अक्कलवान असाल (तर काळजी घ्या)

119

११९. तुम्ही तर असे आहात की त्यांच्याशी प्रेम राखता, पण ते तुमच्याशी प्रेम राखत नाहीत, तुम्ही अल्लाहचा संपूर्ण ग्रंथ मानून घेता आणि (ते नाही मानत, तर मग प्रेम कसे?) हे तुमच्यासमोर तर आपले ईमान कबूल करतात, परंतु जेव्हा एकटे असतात तेव्हा रागाने आपल्या बोटांचा चावा घेतात. त्यांना सांगा, मराल असेच रागाच्या भरात! सर्वश्रेष्ठ अल्लाह मनातल्या सुप्त गोष्टीही चांगल्या प्रकारे जाणतो.

120

१२०. जर तुम्हाला एखादी भलाई लाभते तर त्यांना मोठे वाईच वाटते, मात्र जेव्हा दुःख यातना पोहचते तेव्हा मात्र खूप आनंदित होतात. जर तुम्ही सबुरी (धीर-संयम) राखाला आणि स्वतःला दुराचारापासून दूर ठेवत राहाल तर त्यांची कूटनीती तुम्हाला काहीच नुकसान पोहचविणार नाही, सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या कारवायांना घेरा टाकला आहे.

121

१२१. (हे पैगंबर! त्या वेळेचे स्मरण करा) जेव्हा सकाळी सकाळी तुम्ही आपल्या घराबाहेर पडून ईमानधारकांना लढाईच्या मोर्चावर ठाव ठिकाण दाखवून बसवित होते आणि अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.

122

१२२. जेव्हा तुमच्यातल्या दोन गटांचे पाय डगमगू लागले, जेव्हा अल्लाह त्या दोघांचा मदत करणारा हजर होता आणि त्याच अल्लाहवर ईमानधारकांनी भरोसा राखला पाहिजे.

123

१२३. आणि अल्लाहने बद्रच्या युद्धात तुमची अशा वेळी मदत केली, जेव्हा तुम्ही खूप हलाखीच्या अवस्थेत होते, यास्तव अल्लाहचे भय राखा, यासाठी की तुम्ही कृतज्ञशील व्हावे.

124

१२४. जेव्हा तुम्ही ईमानधारकांना धीर देत होते, काय तुमच्यासाठी हे पुरेसे नाही की अल्लाहने तीन हजार फरिश्ते उतरवून तुमची मदत करावी.

125

१२५. का नाही? जर तुम्ही धीर-संयम आणि दुराचारापासून अलिप्तता पत्कराल आणि त्याच क्षणी हे लोक तुमच्याजवळ आल्यास, तुमचा पालनकर्ता, पाच हजार फरिश्त्यांद्वारे तुमची मदत करेल, जे निशाणी असलेले असतील.

126

१२६. आणि आम्ही याला तुमच्यासाठी फक्त शुभ-समाचार आणि तुमच्या मनाच्या समाधानाकरिता बनविले, अन्यथा मदत तर वर्चस्वशाली, हिकमतशाली अल्लाहकडूनच असते.

127

१२७. (अल्लाहच्या या मदतीचा उद्देश हा होता की, अल्लाहने) इन्कारी लोकांचा एक गट कापून टाकावा किंवा त्यांना अपमानित करून टाकावे आणि मग त्यांनी असफल होऊन परत फिरावे.

128

१२८. (हे पैगंबर!) तुमच्या अखत्यारीत काही एक नाही१ अल्लाह इच्छिल तर त्यांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करील किंवा त्यांना सजा देईल, कारण ते अत्याचारी लोक आहेत.

129

१२९. आकाशांमध्ये आणि धरतीवर जे काही आहे, सर्व अल्लाहचेच आहे, तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल अज़ाब (शिक्ष-यातना) देईल आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.

130

१३०. हे ईमान राखणाऱ्यांनो! दुप्पट, तिप्पट करून व्याज खाऊ नका, आणि अल्लाहचे भय बाळगा, यासाठी की तुम्हाला सफलता लाभावी.

131

१३१. आणि त्या आगीचे भय राखा, जी काफिरांसाठी तयार केली गेली आहे.

132

१३२. आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या आदेशांचे पालन करा, यासाठी की तुमच्यावर मेहरबानी केली जावी.

133

१३३. आणि आपल्या पालनकर्त्याच्या माफीकडे आणि त्या जन्नतकडे धाव घ्या, जिचा विस्तार आकाशांच्या व जमिनीच्या इतका आहे, जी दुराचारापासून दूर राहणाऱ्यांकरिता तयार केली गेली आहे.

134

१३४. जे लोक सुसंपन्न अवस्थेत आणि तंगी-अडचणीच्या अवस्थेतही (अल्लाहच्या मार्गात) खर्च करतात, राग गिळून टाकतात आणि लोकांचे अपराध माफ करतात, अल्लाह अशा नेक सदाचारी लोकांना दोस्त राखतो.

135

१३५. जेव्हा त्यांच्याकडून एखादे वाईट कृत्य घडते किंवा ते एखादा अपराध करून बसतात, तेव्हा त्वरीत अल्लाहचे स्मरण आणि आपल्या अपराधआंची माफी मागतात आणि वास्तविक अल्लाहशिवाय अपराध माफ करणारा दुसरा कोण आहे? आणि ते जाणूनबुजून आपल्या कृत-कर्मावर अडून बसत नाहीत.

136

१३६. त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यातर्फे माफी आणि जन्नत आहे, जिच्याखाली नहरी (प्रवाह) वाहत आहेत, ज्यात ते नेहमी राहतील, आणि नेक-सदाचारी लोकांचा हा किती चांगला मोबदला आहे!

137

१३७. तुमच्या पूर्वीपासून नियम चालत आला आहे. तुम्ही जमिनीवर हिंडून फिरून पाहा की, ज्यांनी अल्लाहच्या आयतींचा इन्कार केला, त्यांचा कशा प्रकारे शेवट झाला.

138

१३८. लोकांकरिता हे एक फर्मान (निवेदन(आदेश)) आहे आणि अल्लाहचे भय राखून आचरण करणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि उपदेश आहे.

139

१३९. तुम्ही हताश होऊ नका आणि दुःखी-कष्टी होऊ नका. तुम्ही (खरोखर) ईमान राखणारे असाल तर तुम्ही विजयी व्हाल.

140

१४०. (या युद्धात) जर तुम्ही जखमी झाले असाल तर तेदेखील (बद्रच्या युद्धआत) अशा प्रकारे जखमी झाले आहेत आणि या दिवसांना आम्ही लोकांच्या दरम्यान अलटत-पालटत राहतो, यासाठी की अल्लाहने ईमानधारकांना (वेगळे करून) पाहावे, आणि तुमच्यापैकी काहींना शहीद बनवावे, आणि अल्लाह अत्याचारी लोकांशी प्रेम राखत नाही.

141

१४१. आणि यासाठी की, अल्लाहने ईमानधारकांना अलग करून घ्यावे, आणि काफिरांचा (इन्कारी लोकांचा) सर्वनाश करून टाकावा.

142

१४२. काय तुम्ही हे गृहित धरले आहे की जन्नतमध्ये दाखल होऊन जाल, वास्तविक अल्लाहने अजून हे पाहिले नाही की तुमच्यापैकी कोण जिहाद (धर्मयुद्ध) करतात आणि कोण धीर-संयम राखतात.

143

१४३. आणि तुम्ही यापूर्वी मरणाची इच्छा धरत होते, आता तर तुम्ही मृत्युला आपल्या डोळ्यांनी पाहून घेतले.

144

१४४. आणि मुहम्मद तर केवळ एक रसूल (पैगंबर) आहेत. यापूर्वी अनेक रसूल होऊन गेलेत, मग जर ते मरण पावतील किंवा जीवे मारले जातील, तर काय तुम्ही (इस्लामकडे पाठ फिरवून) उलट पावली परत फिराल? आणि जो कोणी उलट पावली परत फिरेल तो अल्लाहला कसलेही नुकसान पोहचवू शकणार नाही आणि अल्लाह कृतज्ञशील लोकांना फार लवकर मोबदला प्रदान करेल.

145

१४५. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या हुकूमाविना कोणताही जीव मरू शकत नाही, ठरलेली वेळ लिखित आहे. या जगाशी प्रेम राखणाऱ्यांना आम्ही थोडेसे या जगातच देऊन टाकतो आणि आखिरतचे पुण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना आम्ही तेदेखील प्रदान करतो आणि आभार मानणाऱ्यांना आम्ही लवकरच चांगला मोबदला प्रदान करू.

146

१४६. आणि अनेक पैगंबरांच्या सोबत(राहून)अनेक अल्लाहवाल्यांनी जिहाद (धर्मयुद्ध) केले आहे. त्यांनाही अल्लाहच्या मार्गात दुःख-यातना पोहचल्या, परंतु ना तर त्यांनी धैर्य सोडले, ना कमजोर पडले आणि ना प्रभावित (दबले गेले) झाले आणि अल्लाह धीर-संयम राखणाऱ्यांशी प्रेम राखतो.

147

१४७. आणि ते हेच म्हणत राहिले की, हे आमच्या पालनकर्त्या! आमच्या अपराधांना माफ कर आणि जर आमच्याकडून आमच्या कामांमध्ये नाहक काही जुलूम-अतिरेक झाला असेल तर तोही माफ कर आणि आम्हाला मजबूती प्रदान कर आणि आम्हाला इन्कारी लोकांच्या जनसमूहाच्या विरोधात सहायता प्रदान कर.

148

१४८. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांना या जगाचाही मोबदला प्रदान केला आणि आखिरतच्या पुण्याची विशेषताही प्रदान केली, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सत्कर्म करणाऱ्यांना आपला दोस्त राखतो.

149

१४९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्ही इन्कारी लोकांचे म्हणणे मानाल तर ते तुम्हाला उलट पावली परत फिरवतील (अर्थात तुमच्या धर्मापासून अलग करतील) परिणामी तुम्ही तोट्यात राहाल.

150

१५०. किंबहुना अल्लाह तुमचा स्वामी आणि मालक आहे आणि तोच तुमचा सर्वोत्तम सहाय्यकर्ता आहे.

151

१५१. आम्ही लवकरच इन्कारी लोकांच्या मनात भय निर्माण करू या कारणास्तव की ते अल्लाहच्या सोबत त्या चीज वस्तूंनाही सहभागी करतात, ज्यांच्याविषयी कोणतेही प्रमाण अल्लाहने उतरविले नाही,१ त्यांचे ठिकाण जहन्नम आहे आणि त्या अत्याचारी लोकांचे वाईट ठिकाण आहे.

152

१५२. आणि अल्लाहने आपला वायदा खरा करून दाखविला, जेव्हा अल्लाहच्या हुकुमानुसार तुम्ही त्यांचा निःपात करीत होते, येथपर्यंत की, जेव्हा तुमची हिंमत खचत होती आणि आदेशाबाबत मतभेद करू लागले आणि आज्ञापालन केले नाही. हे सर्व तुम्ही त्यानंतर केले, जेव्हा अल्लाहने तुम्हाला तुमचा मनपसंत विजय दाखवून दिला होता. तुमच्यापैकी काहीजण या जगाचा लाभ इच्छित होते आणि काही आखिरतची इच्छा करीत होते. मग त्याने तुम्हाला शत्रूंकडून फिरविले, यासाठी की तुमची कसोटी घ्यावी आणि निःसंशय अल्लाहने तुमच्या चुका माफ केल्या आणि ईमानधारकांसाठी अल्लाह अतिशय मेहरबान, कृपावान आहे.

153

१५३. जेव्हा तुम्ही चढत जात होते आणि मागे वळून कोणाला पाहातही नव्हते, आणि अल्लाहचे रसूल (पैगंबर) तुम्हाला पाठीमागून हाक मारीत होते, तेव्हा तुम्हाला दुःखावर दुःख पोहचले, यासाठी की तुम्ही आपल्या हातून निसटलेल्या (विजया) वर दुःख न करावे आणि ना त्या (मानसिक आघात) वर, जो तुम्हाला पोहचला, आणि अल्लाह तुमच्या सर्व कर्मांना चांगले जाणतो.

154

१५४. मग त्या दुःखानंतर तुमच्यावर शांती अवतरित केली आणि तुमच्यापैकी एका समूहाला शांतीपूर्ण डुलकी येऊ लागली, तथापि काही लोक असेही होते ज्यांना केवळ आपल्या जीवाची धास्ती लागली होती. ते अल्लाहविषयी नाहक मूर्खतापूर्ण विचार करू लागले आणि म्हणू लागले की आम्हालाही काही हक्क (अधिकार) आहेत. तुम्ही त्यांना सांगा, काम तर सर्वच्या सर्व अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे. हे लोक आपल्या मनातले रहस्यभेद तुम्हाला नाही सांगत. ते म्हणतात की जर आम्हाला थोडासाही अधिकार असता तर या ठिकाणी जीवे मारले गेलो नसतो. तुम्ही सांगा, जर तुम्ही आपल्या घरांतही असते, तरीही ज्यांच्या नशिबी मारले जाणे लिहिले होते, ते वधस्थळाकडे चालत गेले असते. अल्लाहला तुमच्या मनातल्या गोष्टींची परीक्षा घ्यायची होती आणि जे काही तुमच्या मनात आहे त्यापासून तुम्हाला स्वच्छ-शुद्ध करायचे होते आणि अल्लाह अपरोक्ष (गैब) जाणणारा आहे. (मनात दडलेले रहस्यभेद तो चांगल्या प्रकारे जाणतो.)

155

१५५. ज्या दिवशी दोन समूह एकमेकांशी मुकाबल्यासाठी भिडले, आणि त्या वेळी तुमच्यापैकी ज्या लोकांनी पाठ दाखवली, हे लोक आपल्या काही कर्मांमुळे सैतानाच्या बहकविण्यात आले, पण तरीदेखील अल्लाहने त्यांना माफ केले. निःसंशय अल्लाह माफ करणारा, सहनशिल (बुर्दबार) आहे.

156

१५६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, जे कृतघ्न झाले, आणि त्यांच्या बांधवांबद्दल, जेव्हा ते जमिनीवर प्रवासाला किंवा जिहादकरिता निघाले, तेव्हा म्हणाले की जर ते आमच्याजवळ राहिले असते तर मेले नसते, ना मारले गेले असते१ (त्यांच्या या विचाराचे कारण हे आहे की) अल्लाहने त्यांच्या मनात हळहळ निर्माण करावी. जीवन आणि मृत्यु केवळ अल्लाहच्या अवाख्यात आहे, आणि अल्लाह तुमच्या सर्व कर्मांना पाहत आहे.

157

१५७. जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात शहीद व्हाला किंवा मरण पावाल तर अल्लाहची माफी आणि दया कृपा त्या (धन-संपत्ती) पेक्षा चांगली आहे, जी ते जमा करीत आहेत.१

158

१५८. आणि तुम्ही मरण पावाल किंवा मारले जाल (कोणत्याही स्थितीत) तुम्हाला अल्लाहच्या जवळच एकत्र व्हायचे आहे.

159

१५९. अल्लाहच्या कृपेमुळे तुम्ही त्यांच्यासाठी कोमल बनले आहात आणि जर तुम्ही फटकळ तोंडाचे आणि कठोर मनाचे असते तर हे सर्व तुमच्या जवळून दूर पळाले असते, यास्तव त्यांना माफ करा आणि त्यांच्यासाठी क्षमा-याचना करा आणि कामासंबंधी त्यांच्याशी सल्लामसलत करा. मग जेव्हा तुमचा इरादा पक्का होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, आणि अल्लाह भरोसा करणाऱ्यांना आपला दोस्त राखतो.

160

१६०. जर अल्लाह तुम्हाला मदत करील तर कोणीही तुमच्यावर वर्चस्वशाली ठरू शकत नाही आणि जर तो तुम्हाला सोडून देईल तर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करील? आणि ईमान राखणाऱ्यांनी अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे.

161

१६१. आणि हे अगदी असंभव आहे की पैगंबरांनी काही लपवून ठेवावे. प्रत्येक लपवून ठेवणारा कयामतच्या दिवशी आपले लपवून ठेवलेले घेऊन हजर होईल, मग प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि त्यांच्यावर अत्याचार केला जाणार नाही.

162

१६२. काय तो मनुष्य, ज्याने अल्लाहच्या मार्गाचे अनुसरण केले, त्या माणसासारखे आहे, जो अल्लाहचा प्रकोप घेऊन परतला? आणि त्याचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते अतिशय वाईट ठिकाण आहे.

163

१६३. अल्लाहच्या जवळ त्यांचे वेगवेगळे दर्जे आहेत आणि त्यांच्या समस्त कर्मांना अल्लाह चांगल्या प्रकारे पाहात आहे.

164

१६४. निःसंशय, ईमानधारकांवर अल्लाहचा मोठा उपकार आहे की त्याने त्यांच्यातूनच एक रसूल त्यांच्यामध्ये पाठविला, जो त्यांना अल्लाहच्या आयती वाचून ऐकवितो आणि त्यांना पाक (पवित्र) करतो, आणि त्यांना ग्रंथ आणि अकलेच्या गोष्टी शिकवितो आणि निःसंशय, हे सर्व त्यापूर्वी उघडपणे भटकलेले होते.

165

१६५. हे काय की जेव्हा तुमच्यावर एक संकट कोसळले, ज्याच्या दुप्पट तुम्ही त्यांना पोहचविले, तर तुम्ही म्हणाले की हे कोठून आले? (हे पैगंबर!) तुम्ही सांगा की हे संकट तुम्ही स्वतः आपल्यावर ओढवून घेतले आहे. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

166

१६६. आणि दोन्ही समूह मुकाबल्यासाठी ज्या दिवशी एकमेकांशी भिडले तेव्हा तुम्हाला जे काही पोहचले तर हे अल्लाहच्या आदेशाने पोहोचले, आणि यासाठी की अल्लाहने ईमानधारकांना उघडपणे जाणून घ्यावे.

167

१६७. आणि ढोंगी (वरकरणी) मुसलमानांनाही जाणून घ्यावे ज्यांना सांगितले गेले की या, अल्लाहच्या मार्गात लढा किंवा शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करा, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला जर हे माहीत असते की लढाई होईल तर अवश्य तुम्हाला साथ दिली असती. ते त्या दिवशी ईमानाच्या तुलनेत कुप्र (इन्कारा) च्या अधिक जवळ होते. आपल्या मुखाने अशी गोष्ट बोलत होते, जी त्यांच्या मनात नव्हीत आणि अल्लाह ते जाणतो, जे हे लपवितात.

168

१६८. हेच ते लोक होत जे स्वतः घरात बसून राहिले आणि आपल्या बांधवांबद्दल म्हणाले, की त्यांनी जर आमचे म्हणणे ऐकून घेतले असते तर जीवे मारले गेले नसते. त्यांना सांगा की तुम्ही सच्चे असाल तर आपल्यावरून मृत्युला टाळून दाखवा.

169

१६९. आणि जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार केले गेले त्यांना मृत (मेलेले) समजू नका, किंबहुना ते जिवंत आहेत. त्यांना त्यांच्या पालनर्त्याजवळून रोजी (अन्न-सामग्री) दिली जात आहे.

170

१७०. सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांना आपली जी कृपा प्रदान केली आहे, तिच्याद्वारे ते फार आनंदित आहेत आणि त्या लोकांबाबत आनंद साजरा करीत आहे जे अद्याप त्यांच्याजवळ पोहोचतले नाहीत, त्यांच्या मागे आहेत. या गोष्टीबद्दल की त्यांना ना कसले भय आहे आणि ना कसले दुःख.

171

१७१. ते अल्लाहच्या कृपा देणगीने खूश होतात आणि या गोष्टीनेही की अल्लाह ईमानधारकांचा मोबदला वाया जाऊ देत नाही.

172

१७२. ज्या लोकांनी जखमी अवस्थेतही अल्लाह आणि रसूलचा आदेश मानला त्यांच्यापैकी जे सत्कर्म करीत राहिले आणि अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहिले, त्यांच्यासाठी फार मोठा मोबदला आहे.

173

१७३. हे ते लोक आहेत, ज्यांना भीती दाखवली गेली की लोक तुमच्यासाठी एकत्र झाले आहेत, तेव्हा तुम्ही त्यांचे भय राखा परिणामी त्यांचे ईमान आणखी वाढले आणि ते म्हणाले की अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो सर्वोत्तम संरक्षक आणि कार्य पार पाडणारा आहे.

174

१७४. (तात्पर्य) ते अल्लाहच्या कृपा देणगीसह परतले. त्यांना कसलेही दुःख पोहोचले नाही, त्यांनी अल्लाहच्या मर्जीचा मार्ग पत्करला आणि अल्लाह मोठा कृपाशील आहे.

175

१७५. हा सैतानच आहे, जो आपल्या मित्रांद्वारे भयभीत करतो, यास्तव त्यांचे भय बाळगू नका, फक्त माझेच भय राखा जर तुम्ही ईमानधारक असाल.

176

१७६. जे शीघ्रतेने कुप्र (इन्कार करण्यात) फसत जात आहेत, त्याच्याबाबत तुम्ही दुःखी होऊ नका. अल्लाहचे ते काहीच बिघडवू शकणार नाहीत. आखिरतच्या वेळी अल्लाह त्यांना काहीच हिस्सा देऊ इच्छित नाही आणि अशा लोकांसाठी महाभयंकर अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

177

१७७. ईमानच्या बदल्यात कुप्र खरेदी करणारे लोक, अल्लाहला कदापि कोणतेही नुकसान पोहचवू शकत नाहीत आणि त्यांच्याचसाठी कठोर शिक्षा (अज़ाब) आहे.

178

१७८. काफिर (इन्कारी) लोकांनी या विचारात राहू नये की आमचे त्यांना सवड देणे त्यांच्यासाठी चांगले आहे, किंबहुना आम्हीही सवड अशासाठी देत आहोत की त्यांनी आणखी जास्त अपराध करावेत, आणि त्यांच्यासाठीच अपमानित करणारी शिक्षा-यातना आहे.१

179

१७९. ज्या अवस्थेत तुम्ही आहात, त्याच अवस्थेत, अल्लाह ईमानधारकांना सोडणार नाही, जोपर्यंत पवित्र आणि अपवित्र वेगवेगळे न करील, आणि अल्लाह असाही नाही की तुम्हाला अपरोक्षाद्वारे सूचित करील, परंतु अल्लाह आपल्या पैगंबरांमधून ज्याची इच्छितो निवड करतो. यास्तव तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखा. जर तुम्ही ईमान राखाल आणि अपराधांपासून अलिप्त राहाल तर तुमच्यासाठी फार मोठा मोबदला आहे.

180

१८०. आणि ज्या लोकांना अल्लाहने आपल्या कृपेने धनवान केले आहे आणि ते तरीही कंजूषी करतात तर त्याला त्यांनी चांगले समजू नये, उलट ते त्यांच्या हक्कात अतिशय वाईट आहे. त्यांनी ज्या (धन-संपत्ती) त कंजूषी केली आहे, कयामतच्या दिवशी त्यांच्या गळ्यातले जोखंड (तौक) बनेल, आणि आकाशांचा व जमिनीचा वारस केवळ अल्लाह आहे आणि तो तुमच्या सर्व कर्मांची खबर राखतो.

181

१८१. निःसंशय, अल्लाहने त्या लोकांचे बोलणे ऐकून घेतले, जे असे म्हणाले की अल्लाह गरीब, गरजवान आहे आणि आम्ही गनी (श्रीमंत) आहोत, आम्ही त्यांचे हे कथन लिहून घेऊ आम्ही यांच्याद्वारे पैगंबरांच्या नाहक हत्येलादेखील. आणि आम्ही फर्माविणार की आता जळत राहण्याचा अज़ाब चाखा!

182

१८२. ही तुमची वाईट कर्मे आहेत आणि निःसंशय अल्लाह आपल्या दासांवर किंचितही अत्याचार करीत नाही.

183

१८३. ते म्हणाले, अल्लाहने आमच्याकडून वचन घेतले आहे की आम्ही एखाद्या पैगंबरावर ईमान न राखावे, जोपर्यंत तो आमच्यासमोर अशी कुर्बानी (बलिदान) आणत नाही, जिला आगीने खाऊन टाकावे. तुम्ही त्यांना सांगा की तुमच्याजवळ माझ्यापूर्वी पैगंबर प्रमाण आणि त्यासोबत तेही घेऊन आले जे तुम्ही सांगितले, तर मग तुम्ही त्यांची हत्या का केली, जर तुम्ही सच्चे असाल.

184

१८४. तरीही तर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील, तर तुमच्यापूर्वी अनेक पैगंबर खोटे ठरविले गेले, जे आपल्यासोबत स्पष्ट प्रमाण पोथी (सहीफे) आणि दिव्य-ग्रंथ घेऊन आले.

185

१८५. प्रत्येक जीवाला मृत्युचा स्वाद चाखावा लागणारच आहे, आणि कयामतच्या दिवशी तुम्हाला आपला मोबदला पुरेपूर दिला जाईल. परंतु जो मनुष्य आगीपासून दूर हटविला गेला आणि जन्नतमध्ये दाखल केला गेला, निःसंशय, तो सफल झाला आणि या जगाचे जीवन केवळ धोक्याची सामुग्री आहे.१

186

१८६. निःसंशय, तुमच्या धन आणि प्राणाद्वारे तुमची कसोटी घेतली जाईल आमि अवश्य तुम्हाला त्या लोकांची ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला आणि अनेकेश्वरवाद्यांची मनाला दुःख देणारी बोलणी ऐकावी लागतील, तथापि तुम्ही धीर-संयम राखाला आणि अल्लाहचा आदेश मानाल तर निश्चितच हे फार हिमतीचे काम आहे.

187

१८७. आणि जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने ग्रंथधारकांकडून करार घेतला की तुम्ही ते सर्व लोकांना जरूर सांगाल आणि त्याला लपविणार नाही, पण तरीही त्या लोकांनी तो करार पाठीमागे टाकला आणि त्याला फार कमी किमतीवर विकून टाकले. त्यांचा हा व्यापार फार वाईट आहे.

188

१८८. ते लोक, जे आपल्या कारवायांवर खूश आहेत आणि असे इच्छितात की जे त्यांनी केले नाही, त्याबद्दलही त्यांची स्तुती-प्रशंसा केली जावी. तुम्ही त्यांना अज़ाब (शिक्षा-यातना) पासून मुक्त समजू नका. त्यांच्यासाठी तर दुःखदायक अज़ाब आहे.

189

१८९. आणि आकाशांचा आणि जमिनीचा स्वामी (मालक) अल्लाहच आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो.

190

१९०. निःसंशय, आकाशांच्या आणि जमिनीच्या रचनाकार्यात आणि रात्र-दिवसाच्या आळीपाळीने ये-जा करण्यात, बुद्धिमानांकरिता निशाण्या आहेत.

191

१९१. जे लोक अल्लाहचे स्मरण उभे राहून, बसलेल्या अवस्थेत आणि आपल्या कुशीवर पहुडले असताना करतात आणि आकाशांच्या व जमिनीच्या निर्मितीवर विचार-चिंतन करतात (आणि म्हणतात) की हे आमच्या पालनकर्त्या! तू हे सर्व हेतुविना बनविले नाही. तू पवित्र आहे. तेव्हा तू आम्हाला आगीच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासून वाचव.

192

१९२. हे आमच्या पालनकर्त्या! तू ज्याला आगीत टाकले, निःसंशय तू त्याला अपमानित केले, आणि अत्याचारी लोकांचा कोणीही मदत करणारा नाही.

193

१९३. हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही असे ऐकले की एक पुकारणारा ईमानाकडे बोलावित आहे की लोकांनो! आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखा आणि आम्ही ईमान राखले. हे आमच्या पालनकर्त्या! आता तरी आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आमच्या दुष्कर्मांना आमच्यापासून दूर कर आणि नेक सदाचारी लोकांसोबत आम्हाला मृत्यु दे.

194

१९४. हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला ते प्रदान कर ज्याचा वायदा तू आमच्याशी आपल्या पैगंबरांच्या तोंडून केला आहे, आणि आम्हाला कयामतच्या दिवशी अपमानित करू नकोस. निःसंशय तू आपल्या वायद्याविरूद्ध जात नाही.

195

१९५. यास्तव त्यांच्या पालनकर्त्याने त्यांची दुआ (प्रार्थना) कबूल केली (आणि फर्माविले) की तुमच्यापैकी कोणा कर्म करणाऱ्याच्या कर्माला, मग तो पुरुष असो की स्त्री, मी वाया जाऊ देत नाही. तुम्ही आपसात एकमेकांचे सहायक आहात, यास्तव ते लोक ज्यांनी (धर्मासाठी) स्थलांतर केले आणि ज्यांना आपल्या घरातून बाहेर घालविले गेले आणि ज्यांना माझ्या मार्गात कष्ट-यातना दिली गेली आणि ज्यांनी जिहाद केले आणि शहीद केले गेले, मी अवश्य त्यांची दुष्कर्मे त्यांच्यापासून दूर करीन आणि अवश्य त्यांना त्या जन्नतमध्ये नेईन, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हा मोबदला आहे अल्लाहतर्फे आणि अल्लाहजवळच चांगला मोबदला आहे.

196

१९६. शहरांमध्ये काफिरांचे (इन्कारी लोकांचे) येणे-जाणे तुम्हाला धोक्यात न टाकावे.

197

१९७. हा तर फार अल्पसा फायदा आहे. त्यानंतर त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, आणि ते फार वाईट ठिकाण आहे.

198

१९८. परंतु जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहिले, त्यांच्यासाठी जन्नत आहे ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, त्यात ते नेहमी नेहमी राहतील हे अल्लाहतर्फे अतिथ्य (पाहुणचार) आहे आणि पुण्य-कार्य करणाऱ्यांकरिता अल्लाहजवळ जे काही आहे ते सर्वाधिक चांगले आणि उत्तम आहे.

199

१९९. आणि ग्रंथधारकांपैकी काही लोक अवश्य असे आहेत जे अल्लाहवर ईमान राखतात आणि जे तुमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे त्यांच्याकडे उतरविले गेले आहे त्यावर ईमान राखतात. अल्लाहचे भय बाळगून राहतात, आणि अल्लाहच्या आयतींना थोडे थोडे मोल घेऊन विकत नाहीत१ त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे. निःसंशय अल्लाह लवकरच हिशोब घेणार आहे.

200

२००. हे ईमानधारकांनो! तुम्ही धीर-संयम राखा आणि एकमेकांना मजबुती देत राहा आणि जिहाद (धर्मयुद्ध) साठी तयार राहा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करावी.