ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. आलिफ, लाम, मीम.१

2

२. या ग्रंथा (चे अल्लाहचा ग्रंथ असण्या) बाबत कसलीही शंका नाही, अल्लाहच्या आज्ञाभंगाचे भय राखणाऱ्यांना मार्गदर्शन करणारा आहे.

3

३. जे लोक न पाहिलेल्या (परलोका) वर ईमान राखतात १ आणि नमाजला कायम करतात आमि आम्ही प्रदान केलेल्या (धन संपत्ती) मधून खर्च करतात.

4

४. आणि जे लोक ईमान राखतात त्यावर, जे तुमच्याकडे उतरविले गेले आणि जे तुमच्यापूर्वी उतरविले गेले. आणि ते आखिरतवरही अटळ विश्वास राखतात.

5

५. हेच लोक आपल्या पालनकर्त्याच्या तर्फे खऱ्या मार्गावर आहेत, आणि हेच लोक सफलता (आणि मुक्ती) प्राप्त करणारे आहेत.

6

६. निःसंशय, इन्कार करणाऱ्यांना तुम्ही भय दाखवा किंवा दाखवू नका सारखे आहे, हे लोक ईमान राखणार नाहीत.

7

७. सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या हृदयांवर आणि कानांवर मोहर लावली आहे. आणि त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडला आहे. आणि त्यांच्याकरिता मोठा भयंकर अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

8

८. आणि लोकांपैकी काही म्हणतात, आम्ही अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान राखले आहे, परंतु खरे पाहता ते ईमानधारक नाहीत.

9

९. ते अल्लाहला आणि ईमान राखणाऱ्यांना धोका देत आहेत, परंतु खरे पाहता ते स्वतःलाच धोका देत आहेत आणि त्यांना समज नाही.

10

१०. त्यांच्या मनात रोग आहे. अल्लाहने त्यांचा रोग आणखी वाढविला, आणि त्यांच्या खोट्या बोलण्यापायी त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

11

११. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की धरतीवर बिघाड निर्माण करू नका, तेव्हा ते उत्तर देतात की आम्ही तर केवळ सुधारक आहोत.

12

१२. खबरदार! वास्तविक हेच लोक बिघाड निर्माण करणार १ आहेत, परंतु समज (ज्ञान) बाळगत नाही.

13

१३. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की इतर लोकां (अर्थात सहाबा) प्रमाणे तुम्हीही ईमान राखा, तेव्हा ते उत्तर देतात, काय आम्ही अशा प्रकारे ईमान राखावे, जसे मूर्ख लोकांनी राखले आहे? खबरदार! वास्तविक हेच लोक मूर्ख आहे, परंतु जाणत नाहीत.

14

१४. आणि जेव्हा ईमान राखणाऱ्यांशी भेटतात, तेव्हा म्हणतात की आम्हीदेखील ईमानधारक आहोत. आणि जेव्हा एकांतात आपल्या थोरा-मोठ्यां (सैतानी प्रवृत्तीच्या लोकां) जवळ जातात, तेव्हा म्हणतात, आम्ही तर तुमच्यासोबत आहोत. त्यांच्याशी तर आम्ही केवळ थट्टा-मस्करी करतो.

15

१५. सर्वश्रेष्ठ अल्लाहदेखील त्यांच्याशी थट्टा-मस्करी करतो आणि त्यांच्या विद्रोह आणि बहकण्यात आणखी जास्त वाढ करतो.

16

१६. हे असे लोक आहेत, ज्यांनी मार्गभ्रष्टतेला, मार्गदर्शनाच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. परंतु ना त्यांचा व्यापार १ फायदेशीर ठरला, ना ते मार्गदर्शन प्राप्त करू शकले.

17

१७. या लोकांचे उदाहरण त्या माणसा सारखे आहे, ज्याने आग पेटवली, परंतु जेव्हा आगीने त्याच्या आस-पास खूप प्रकाश पसरविला, तेव्हा अल्लाहने त्यांचा प्रकाश हिरावून घेतला आणि त्यांना अंधारात सोडून दिले, ज्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही.

18

१८. (हे लोक) मुके, बहिरे आणि आंधळे आहेत. आता ते परतून येणार नाहीत.

19

१९. किंवा आकाशातून पडणाऱ्या पावसाप्रमाणे, ज्यात अंधार, मेघगर्जना आणि वीज असावी. विजेच्या कडाडण्यामुळे ते आपल्या कानात बोटे खुपसून घेतात आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह काफिरांना (इन्कार करणाऱ्यांना) घेरणारा आहे.

20

२०. वाटते की वीज त्यांचे डोळे हिसकून घेईल, जेव्हा ती त्यांच्याकरिता उजेड करते तेव्हा ते चालतात आणि जेव्हा अंधार करते, तेव्हा (जागच्या जागी) उभे राहतात आणि अल्लाहने इच्छिले तर त्यांचे कान आणि डोळे हिरावून घेईल. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखणारा आहे.

21

२१. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याची उपासना करा, ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांना निर्माण केले, यासाठी की तुम्ही परहेजगार (दुराचारापासून दूर राहणारे) बनावे.

22

२२. ज्याने तुमच्यासाठी धरतीला बिछायत आणि आकाशाला छत बनविले आणि आकाशातून पाऊस पाडला. मग त्याच्याद्वारे फळे निर्माण करून तुम्हाला रोजी (अन्न-सामग्री) प्रदान केली. तेव्हा हे ध्यानी घेता, तुम्ही कोणालाही अल्लाहचा सहभागी बनवू नका.

23

२३. आणि जर तुम्हाला त्याबाबत शंका असेल, जे आम्ही आपल्या दासावर अवतरीत केले आहे. तेव्हा तुम्ही सच्चे असाल तर यासारखी एखादी सूरह (अध्याय) बनवून आणा तुम्हाला सूट दिली जाते की अल्लाहच्या शिवाय आपल्या सहभागींनाही (उपास्यांनाही) बोलावून घ्या. १

24

२४. मग जर तुम्ही असे केले नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. १ तेव्हा (त्याला सत्य जाणून) त्या आगीचे भय राखा, जिचे इंधन मानव आणि दगड आहे. जी काफिरां (इन्कार करणाऱ्यां) साठी तयार केली गेली आहे.

25

२५. आणि ईमान राखणाऱ्या आणि नेक काम करणाऱ्यांना त्या स्वर्गाचा शुभ समाचार द्या, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. जेव्हा त्यांना त्यांच्यातून फळे खाण्यास दिले जातील, तेव्हा म्हणतील की याच्यापूर्वी आम्हाला खाण्यासाठी हेच दिले गेले. ती मिळतीजुळती फळे असतील आणि त्यांच्यासाठी त्यात पवित्र शुद्ध (शीलवान) पत्न्या असतील आणि ते त्यात नेहमी नेहमी राहतील.

26

२६. वास्तविक एखादे उदाहरण देण्यात अल्लाहला लज्जा-संकोच वाटत नाही, मग ते उदाहरण मच्छराचे असो किंवा त्याहूनही तुच्छ वस्तूचे. ईमान राखणारे त्याला आपल्या पालनकर्त्यातर्फे सत्य जाणतात, आणि काफिर (इन्कार करणारे) म्हणतात की असले उदाहरण देण्यात अल्लाहचे प्रयोजन काय आहे? याच्याचद्वारे अनेकांना मार्गभ्रष्ट करतो आणि बहुतेक लोकांना सत्य-मार्गावर आणतो. आणि मार्गभ्रष्ट तर केवळ आज्ञाभंग करणाऱ्या (दुराचारी लोकां) नाच करतो.

27

२७. जे लोक अल्लाहशी केलेल्या वचन- करारा (प्रतिज्ञे) ला तोडून टाकतात आणि अल्लाहने ज्या गोष्टींना जोडण्याचा आदेश दिला आहे, तिला तोडून टाकतात आणि धरतीवर उत्पात (फसाद) पसरवितात. हेच लोक मोठे नुकसान भोगणारे आहेत.

28

२८. तुम्ही अल्लाहला कसे नाही मानत, वास्तविक तुम्ही निर्जीव होते, तेव्हा त्याने तुम्हाला जीवन प्रदान केले मग तुम्हाला मृत्यू देईल मग पुन्हा दुसऱ्यांदा जिवंत करील, मग त्याच्याचकडे तुम्हाला जायचे आहे.

29

२९. त्यानेच तुमच्यासाठी, जे काही धरतीवर आहे, सर्व निर्माण केले. मग आकाशाचा इरादा केला आणि त्याने सात यथायोग्य आकाश बनविले आणि तो प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे.

30

३०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी धरतीवर एक खलीफा (असा समूह जो एकमेकांनंतर येईल) बनवीत आहे. तेव्हा (फरिश्ते) म्हणाले, काय तू धरतीवर अशा लोकांना निर्माण करशील, जे तिच्यावर फसाद आणि रक्तपात करतील आणि आम्ही तुझ्या स्तुती-प्रशंसेसह तुझे गुणगान आणि तुझी पवित्रता वर्णन करतो. त्याने फर्माविले, जे मी जाणतो तुम्ही नाही जाणत.

31

३१. आणि त्या (अल्लाह) ने आदमला सर्व नावे शिकवून त्या चीज वस्तूंना फरिश्त्यांसमोर प्रस्तुत केले आणि फर्माविले, तुम्ही सच्चे असाल तर या चीज वस्तुंची नावे सांगा.

32

३२. फरिश्ते म्हणाले, हे अल्लाह! तू तर पवित्र (दोष- व्यंग नसलेला) आहे. आम्हाला तर तेवढेच ज्ञान आहे, जेवढे तू आम्हाला शिकविले आहे परिपूर्ण ज्ञान आणि बुद्धी कुशलता राखणारा केवळ तूच आहे.

33

३३. सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदमला फर्माविले, तुम्ही यांची नावे सांगा. जेव्हा त्यांनी ती नावे सांगितली तेव्हा फर्माविले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की मी आकाशांच्या आणि धरतीच्या अदृश्य गोष्टी जाणतो आणि जे तुम्ही करता किंवा लपविता तेही जाणतो.

34

३४. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा. तेव्हा इब्लीसशिवाय सर्वांनी सजदा केला. त्याने इन्कार केला आणि घमेंड दाखविली १ आणि तो काफिरां (इन्कारी लोकां) पैकीच होता.

35

३५. आणि आम्ही फर्माविले हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा आणि जिथून इच्छा होईल तिथून वाटेल तेवढे खा व प्या. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका, अन्यथा अत्याचारी ठराल.

36

३६. परंतु सैताानाने त्यांना बहकवून तिथून बाहेर घालविलेच आणि आम्ही सांगून टाकले की उतरा येथून (जा, चालते व्हा), तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला धरतीवर राहायचे आणि लाभ घ्यायचे आहे.

37

३७. आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने शिकून घेतली (आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली). अल्लाहने त्यांची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे.

38

३८. आम्ही फर्माविले, तुम्ही सर्व येथून उतरा, मग जर तुमच्याजवळ माझ्याकडून मार्गदर्शन आले तर जो कोणी माझ्या उचित मार्गाचा स्वीकार करील त्यांच्यावर कसलेही भय राहणार नाही, ना ते दुःखी होतील.

39

३९. आणि जे कुप्र (इन्कार) आणि असत्याद्वारे आमच्या आयतींना खोटे ठरवतील ते जहन्नममध्ये राहणारे आहेत. नेहमी त्यातच राहतील.

40

४०. हे इस्राईलच्या पुत्रांनो! माझ्या त्या कृपा- देणगीचे स्मरण करा, जी मी तुमच्यावर केली, आणि माझ्याशी केलेला वचन- करार पूर्ण करा, मी तुमच्याशी केलेला वचन- करार पूर्ण करीन आणि फक्त माझेच भय राखा.

41

४१. आणि त्या (शरीअत) वर ईमान राखा, जिला मी त्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी अवतरीत केले, जो (तौरात) तुमच्याजवळ आहे, आणि तुम्ही याचे सर्वप्रथम इन्कारी बनू नका आणि माझ्या आयतींना थोड्याशा किंमतीवर विकू नका १ आणि फक्त माझेच भय राखा.

42

४२. आणि सत्या (हक) ची असत्या (बातिल) शी भेसळ करू नका आणि सत्य लपवू नका. तुम्ही तर स्वतः हे जाणता.

43

४३. आणि नमाज कायम करा आणि जकात द्या आणि रुकुउ करणाऱ्यां (झुकणाऱ्यां) सह रुकुउ करा (झुका)

44

४४. काय, लोकांना सत्कर्म करण्याचा आदेश देता, आणि स्वतःला विसरून जाता? वास्तविक तुम्ही ग्रंथ वाचता तर काय तुम्हाला एवढीही अक्कल नाही?

45

४५. आणि धीर-संयम व नमाजद्वारे मदत प्राप्त करा १ आणि ही फार मोठी गोष्ट आहे, परंतु अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता नाही.

46

४६. जे हे जाणतात की आपल्या पालनकर्त्याशी भेटायचे आहे आणि त्याच्याकडे परतून जायचे आहे.

47

४७. हे इस्राईल (याकूब) च्या मुलांनो! माझ्या त्या कृपा देणगीचे स्मरण करा जो मी तुमच्यावर उपकार केला आणि मी तुम्हाला साऱ्या जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली.

48

४८. आणि त्या दिवसाचे भय बाळगा, ज्या दिवशी कोणीही कोणाच्या उपयोगी पडणार नाही, ना त्याची एखादी शिफारस मान्य केली जाईल, ना त्याच्याकडून एखादा मोबदला स्वीकारला जाईल आणि ना त्यांना मदत दिली जाईल.

49

४९. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला फिरऔनच्या लोकांपासून १ सुटका दिली, जे तुम्हाला खूप वाईट शिक्षा- यातना देत राहिले. तुमच्या पुत्रांची हत्या करीत राहिले आणि तुमच्या मुलींना जिवंत सोडत राहिले. यातून सुटका करण्यात तुमच्या पालनकर्त्याचा मोठा उपकार होता.

50

५०. आणि जेव्हा आम्ही तुमच्यासाठी समुद्र फाडला आणि त्यातून तुम्हाला पार केले आणि फिरऔनच्या साथीदारांना तुमच्या डोळ्यांदेखत बुडविले.

51

५१. आणि आम्ही मूसाला चाळीस रात्रींचे वचन दिले, मग तुम्ही वासराला उपास्य (दैवत) बनवून घेतले आणि अत्याचारी बनले.

52

५२. परंतु आम्ही, असे असतानाही तुम्हाला माफ केले, यासाठी की तुम्ही उपकार मानाल.

53

५३. आणि आम्ही मूसाला, तुमच्या मार्गदर्शनासाठी ग्रंथ (तौरात) आणि ईश-चमत्कार (मोजिजा) प्रदान केला.

54

५४. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, हे माझ्या जमातीच्या लोकांनो! तुम्ही वासराला (दैवत) बनवून स्वतःवर मोठा जुलूम केला आहे. आता तुम्ही आपल्या निर्माण करणाऱ्याकडे ध्यान द्या. स्वतःला (गुन्हेगाराला) आपल्या हातांनी ठार करा. अल्लाहच्या दृष्टीने यातच तुमच्यासाठी भलाई आहे. तेव्हा अल्लाहने तुमची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा आणि दया करणारा आहे.

55

५५. आणि (तुम्ही त्या गोष्टीचेही स्मरण करा) जेव्हा तुम्ही मूसाला म्हणाले होते की जोपर्यंत आम्ही अल्लाहला (प्रत्यक्ष) समोर पाहून घेत नाही तोपर्यंत कधीही ईमान राखणार नाही (या अवज्ञेची शिक्षा म्हणून) तुमच्यावर, तुमच्या डोळ्यांदेखत वीज कोसळली.

56

५६. (परंतु) मग आम्ही तुम्हाला मृत्युनंतर जीवन यासाठी दिले की तुम्ही आभार मानावेत.

57

५७. आणि आम्ही तुमच्यावर ढगांची सावली केली, आणि तुमच्यावर मन्न आणि सलवा उतरविला (आणि फर्माविले) आम्ही प्रदान केलेल्या स्वच्छ शुद्ध वस्तू खा; आणि त्यांनी आमच्यावर अत्याचार नाही केला उलट ते स्वतःच आपल्यावर अत्याचार करीत होते.

58

५८. आणि आम्ही तुम्हाला फर्माविले की त्या वस्तीत जा १ आणि जे काही, ज्या ठिकाणाहून इच्छा होईल मनसोक्त खा व प्या आणि दरवाजातून डोके नमवून दाखल व्हा २ आणि तोंडाने म्हणत जा, आम्ही क्षमा याचना करतो.३ आम्ही तुमचे अपराध माफ करू आणि भलाई करणाऱ्यांना आणखी जास्त प्रदान करू.

59

५९. मग त्या अत्याचारी लोकांनी, ही गोष्ट, जी त्यांना सांगितली गेली, बदलून टाकली. (परिणामी) आम्हीही त्या अत्याचारी लोकांवर त्यांच्या आज्ञाभंगामुळे आकाशातून अज़ाब (शिक्षा यातना) अवतरीत केला.

60

६०. आणि जेव्हा मूसाने आपल्या जनसमूहाच्या लोकांकरिता पाणी मागितले तेव्हा आम्ही फर्माविले की आपली काठी दगडावर मारा, ज्यातून बारा स्रोत (झरे) फुटून वाहू लागले. प्रत्येक समूहाने आपापला स्रोत जाणून घेतला (आणि आम्ही फर्माविले की) अल्लाहने प्रदान केलेली अन्नसामग्री खा व प्या आणि धरतीवर उत्पात (फसाद) पसरवित फिरू नका.

61

६१. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले, हे मूसा! आम्हाला एकाच प्रकारच्या जेवणाने धीर-संयम राखला जाणार नाही, यास्तव आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ-प्रार्थना करा की त्याने आम्हाला जमिनीतून उत्पन्न झालेली भाजी, काकडी, गहू, मसूर आणि कांदा द्यावा. मूसा म्हणाले की उत्तम वस्तूंऐवजी तुच्छ वस्तू का मागता? मग तर एखाद्या शहरात जा, तिथे तुम्हाला तुमच्या पसंतीच्या या सर्व चीज-वस्तू मिळतील. त्यांच्यावर अपमान आणि दुर्दशा टाकली गेली आणि ते अल्लाहचा अज़ाब (प्रकोप) घेऊन परतले. हे अशासाठी की ते अल्लाहच्या आयतींना मानत नव्हते, आणि पैगंबरांची नाहक हत्या करीत होते. त्यांच्या जुलूम अतिरेकाचा हा परिणाम होय.

62

६२. निःसंशय, जो मुस्लिम असो, यहूदी (ज्यू) असो, नसारा (ख्रिश्चन) असो किंवा साबी १ असो, जो कोणी सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि कयामतीच्या दिवसावर ईमान राखील आणि सत्कर्मे करील तर त्याचा मोबदला त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. त्यांना ना कसलेही भय राहील, आणि ना कसले दुःख राहील.

63

६३. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतले आणि तुमच्यावर तूर पर्वत आणून उभा केला आणि फर्माविले, जे आम्ही तुम्हाला प्रदान केले आहे, ते मजबूतीने धरून ठेवा आणि जे काही त्यात आहे ते ध्यानात राखा, यासाठी की तुम्ही दुराचारापासून आपला बचाव करू शकावे.

64

६४. मग त्यानंतरही तुम्ही पाठ फिरवली जर सर्वश्रेष्ठ अल्लाहची कृपा आणि दया तुमच्यावर राहिली नसती, तर तुम्ही नुकसान उचलणारे ठरले असते.

65

६५. आणि अवश्य तुम्हाला त्या लोकांविषयीही माहिती आहे. तुमच्यापैकी ज्यांनी शनिवारबाबत मर्यादेचे उल्लंघन केले. मग आम्ही (देखील) फर्माविले की तुम्ही अपमानित वान्हरेे व्हा.

66

६६. याला आम्ही पुढच्या-मागच्या लोकांकरिता सावध राहण्याचे कारण बनविले, आणि भय राखणाऱ्यांकरिता बोध आहे.

67

६७. आणि मूसा जेव्हा आपल्या जमातीच्या लोकांना म्हणाले की सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला एक गाय जिबह करण्याचा (बळी देण्याचा) आदेश देतो तेव्हा ते म्हणाले, काय, तुम्ही आमच्याशी थट्टा मस्करी करता? मूसा म्हणाले, मी अशा मूर्खतेपासून सर्वश्रेष्ठ अल्लाहचे शरण घेतो.

68

६८. ते म्हणाले, हे मूसा! अल्लाहजवळ दुआ प्रार्थना करा की आम्हाला त्याविषयी माहिती द्यावी. मूसा म्हणाले, ऐका, ती गाय ना तर म्हातारी असावी आणि ना वासरी, किंबहुना मध्यम वयाची असावी. आता जो आदेश तुम्हाला दिला गेला आहे, तो अमलात आणा.

69

६९. ते पुन्हा म्हणाले की, अल्लाहशी दुआ-प्रार्थना करा की त्याने आम्हाला हे सांगावे की तिचा रंग कसा असावा? सांगितले, अल्लाह फर्मावितो की गाय, गडद सोनेरी रंगाची असावी, आणि पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न करणारी असावी.

70

७०. ते म्हणू लागले की आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ करा की त्याने आम्हाला स्पष्टपणे सांगावे की ती कशी असावी? या प्रकारच्या बहुतेक गायी आहेत, तेव्हा उमजत नाही. अल्लाहने इच्छिले तर आम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल.

71

७१. मूसा म्हणाले, अल्लाहचा आदेश आहे की ती गाय शेत-जमिनीवर नांगर ओढणारी आणि शेतीला पाणी देण्याच्या कामाची नसावी, ती शरीराने पूर्ण निरोगी आणि डागविरहित असावी. लोक म्हणाले, आता तुम्ही स्पष्टपणे सांगितले. तरीही ते आदेशांचे पालन करणारे नव्हते, परंतु त्यांनी मानले आणि गायीची कुरबानी (बळी) दिली.

72

७२. आणि जेव्हा तुम्ही एका जीवाची हत्या केली, मग एकमेकांवर आरोप ठेवू लागले आणि अल्लाहला तुम्ही लपविलेली गोष्ट उघड करायची होती.

73

७३. आम्ही फर्माविले की त्या गाईचा एक तुकडा मृत शरीरावर मारा (तो जिवंत होईल) अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह मेलेल्यांना जिवंत करून तुमच्या बुद्धिमानतेकरिता निशाण्या दाखवितो.

74

७४. मग त्यानंतर तुमची मने पाषाणासारखी, किंबहुना त्याहून अधिक कठोर झालीत. काही दगडांमधून तर जल-प्रवाह निघून वाहू लागतात. आणि काही, अल्लाहच्या भय-दहशतीने खाली कोसळतात आणि तुम्ही अल्लाहला आपल्या आचरणापासून अनभिज्ञ जाणू नका.

75

७५. (हे मुसलमानांनो!) काय, तुम्ही इच्छिता की त्या (यहूदी) नी तुमच्यावर विश्वास करावा वास्तविक त्याच्यात काही असेही आहेत, जे अल्लाहचा ग्रंथ ऐकतात मग त्याला समजून घेतल्यानंतर त्यात फेरबदल करतात आणि असे ते जाणून करतात.

76

७६. आणि जेव्हा ईमान राखणाऱ्यांशी भेटतात, तेव्हा आपण ईमानधारक असल्याचे जाहीर करतात आणि आपसात गाठी भेटी करतात, तेव्हा म्हणतात की मुसलमानांपावेतो त्या गोष्टी का पोहचविता, ज्या अल्लाहने तुम्हाला शिकविल्या आहेत. काय हे नाही जाणत की या गोष्टी तर अल्लाहच्या समोर तुमच्यावर त्यांचा पुरावा ठरतील.

77

७७. काय यांना हे नाही माहीत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याच्या लपलेल्या व उघड अशा सर्वच गोष्टी जाणतो.

78

७८. आणि त्यांच्यापैकी काही अशिक्षित असेही आहेत, जे आशा-अपेक्षांशिवाय ग्रंथास जाणत नाहीत आणि केवळ काल्पनिक गोष्टी करतात.

79

७९. त्या लोकांसाठी विनाश आहे, जे स्वतः आपल्या हातांनी लिहिलेल्या ग्रंथास अल्लाहचा ग्रंथ म्हणतात. आणि अशा प्रकारे या जगाची कमाई करतात. आपल्या हातांनी लिहिण्यामुळे त्यांचा सर्वनाश आहे आणि आपल्या या कमाईमुळे त्यांचा विनाश आहे.

80

८०. आणि हे लोक म्हणतात की आम्ही तर काही मोजके दिवस जहन्नममध्ये राहू, (त्यांना) सांगा की, काय तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून एखादे वचन घेतले आहे जर घेतले आहे तर खात्रीने सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या वचनाचा भंग करणार नाही किंवा तुम्ही अल्लाहच्या संबंधाने अशा गोष्टी सांगता ज्या तुम्ही जाणत नाही.

81

८१. निःसंशय, ज्यानेदेखील अपराध केला आणि त्याच्या अपराधाने त्याला घेरले तो जहन्नमी आहे. तो नेहमीकरिता जहन्नममध्ये राहील.

82

८२. आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, ते जन्नती आहेत. ते नेहमीकरिता जन्नतमध्ये राहतील.

83

८३. आणि जेव्हा आम्ही इस्राईलच्या पुत्रांकडून वचन घेतले की तुम्ही अल्लाहच्या शिवाय दुसऱ्या कोणाचीही भक्ती-उपासना करू नका आणि आई-बापाशी चांगले वर्तन राखा आणि त्याचप्रमाणे जवळचे नातेवाईक, अनाथ आणि गरीब लोकांशी सद्‌व्यवहार करा आणि लोकांना चांगल्या- भल्या गोष्टी सांगा. नमाज कायम करा आणि जकात (कर्तव्य दान) देत राहा. परंतु काही लोक वगळता, तुम्ही सर्व मुकरले आणि तोंड फिरविले.

84

८४. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतले की आपसात रक्तपात करू नका (हत्या करू नका) आणि आपल्याच लोकांना देशाबाहेर घालवू नका. तुम्ही मान्य केले आणि तुम्ही याचे साक्षीदारही बनले.

85

८५. तरीही तुम्ही स्वजनांची हत्या केली आणि आपल्या एका समूहाला देशाबाहेर घालविले आणि अपराध व द्वेष करण्याच्या कामात त्यांच्याविरूद्ध दुसऱ्याची बाजू धरली. मात्र जेव्हा ते कैदी बनून तुमच्याजवळ आले तेव्हा तुम्ही त्यांच्या मोबदल्यात धन दिले (ज्याला फिदीया म्हणतात) परंतु त्यांना देशाबाहेर घालविणे जे तुमच्यावर हराम होते (त्याची काहीच काळजी घेतली नाही) काय तुम्ही ग्रंथातल्या काही गोष्टींना मान्य करता आणि काही गोष्टींना नाकारता? तुमच्यापैकी जो कोणी असे करील, त्याची शिक्षा याखेरीज काय असावी की या जगात अपमान आणि कयामतीच्या दिवशी भयंकर शिक्षा- यातनांचा मारा! आणि अल्लाह तुमच्या कर्मांपासून गाफील नाही.

86

८६. हे असे लोक आहेत ज्यांनी ऐहिक जीवनाला आखिरतच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. त्यांची ना शिक्षा कमी होईल आणि ना त्यांची काही मदत केली जाईल.

87

८७. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्यांच्यानंतर सतत रसूल (पैगंबर) ही पाठविले आणि आम्ही मरियम-पुत्र ईसाला स्पष्ट निशाण्या प्रदान केल्या आणि पवित्र आत्मा (हजरत जिब्रील) द्वारे त्यांना समर्थन दिले गेले. परंतु जेव्हा जेव्हा तुमच्याजवळ रसूल (पैगंबर) ती गोष्ट घेऊन आले, जी तुमच्या विचारांच्या विरूद्ध होती, तुम्ही तत्काळ घमेंड दाखविली, मग काहींना तुम्ही खोटे ठरविले आणि काहींना जीवे ठार मारले.

88

८८. आणि ते म्हणाले, आमची मने झाकलेली आहेत (नाही, नाही) किंबहुना त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे, अल्लाहने त्यांना धिक्कारले आहे. तेव्हा त्यांच्यात ईमान राखणारे फार थोडेच आहेत!

89

८९. आणि जेव्हा त्यांच्याजवळ त्यांचा ग्रंथ (तौरात) ची पुष्टी करण्याकरिता एक ग्रंथ (पवित्र कुरआन) येऊन पोहचला, वास्तविक याच्यापूर्वी हे स्वतः याच्याद्वारे काफिरांवर (इन्कार करणाऱ्यांवर) विजय इच्छित होते, तेव्हा येऊन पोहोचल्यानंतर आणि ओळखून घेतल्यानंतर त्यांनी नकार दिला. सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे धिक्कार असो इन्कार करणाऱ्यांवर!

90

९०. अतिशय वाईट आहे ती गोष्ट, जिच्या मोबदल्यात त्यांनी स्वतःला विकून टाकले. ते त्यांचे कुप्र (इन्कार) करणे होय, अल्लाहतर्फे अवतरीत ग्रंथाला केवळ या गोष्टीचा द्वेष करून की अल्लाहने आपली कृपा देणगी, ज्या दासावर इच्छिले अवतरीत केली. या कारणाने ते प्रकोपावर प्रकोपाचे भागीदार ठरले. आणि त्या काफिरां (इन्कार करणाऱ्यां) करिता अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

91

९१. आणि जेव्हा त्यांना सांगितले गेले की त्यावर ईमान राखा जे अल्लाहने अवतरीत केले आहे, तेव्हा ते म्हणाले की जे आमच्यावर (तौरात) उतरविले गेले, त्यावर आमचे ईमान आहे आणि ते त्याला सोडून दुसऱ्या ग्रंथाचा (पवित्र कुरआनाचा) इन्कार करतात. वास्तविक तो सत्य आहे. त्यांच्याजवळ असलेल्या (धर्मग्रंथा) ची सत्यता सिद्ध करीत आहे. (हे पैगंबर!) त्यांना सांगा की जर तुम्ही आपल्या ग्रंथावर ईमान राखता तर यापूर्वी अल्लाहच्या पैगंबरांची हत्या का केली?

92

९२. आणि तुमच्याजवळ मूसा याच निशाण्या घेऊन आले, परंतु तरीही तुम्ही वासराची पूजा केली. तुम्ही आहातच अत्याचारी!

93

९३. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतले आणि तुमच्यावर तूर पर्वत (अधांतरी) उभा केला (आणि फर्माविले) की आम्ही जे काही प्रदान केले आहे ते मजबुतीने धरा आणि ऐका. तेव्हा ते म्हणाले, आम्ही ऐकले आणि आज्ञाभंग केला आणि त्यांच्या मनात वासराचे प्रेम (जणू काही) पाजले (रुजवले) गेले. त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे. (त्यांना) सांगा की तुमचे ईमान तुम्हाला वाईट आदेश देत आहे. जर तुम्ही ईमानधारक असाल.

94

९४. (तुम्ही त्यांना) सांगा की जर अल्लाहजवळ आखिरतचे घर तुमच्यासाठीच आहे, अन्य कोणासाठी नाही तर या, आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी मृत्युची याचना करा.

95

९५. परंतु आपल्या कर्मांचा विचार करता, ते कधीही मृत्युची याचना करणार नाहीत आणि अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो.

96

९६. किंबहुना (हे पैगंबर!) ऐहिक जीवनाची सर्वांत जास्त आसक्ती राखणारे तुम्हाला तेच आढळून येतील. जीवनाचा लोभ राखण्यात हे मूर्तीपूजकांपेक्षाही जास्तच आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकजण हजार वर्षांचे आयुष्य इच्छितो. वास्तविक हे दीर्घायुष्य दिले जाणेही त्यांना अज़ाब (शिक्षा-यातनां) पासून वाचवू शकत नाही. अल्लाह त्यांचे कर्म चांगल्या प्रकारे पाहत आहे.

97

९७. (हे पैगंबर!) तुम्ही सांगा की जो जिब्रीलचा शत्रू असेल, ज्याने तुमच्या हृदयावर अल्लाहचा संदेश उतरविला आहे, जो संदेश त्याच्या जवळच्या ग्रंथाची सत्यता सिद्ध करणारा आणि ईमानधारकांना मार्गदर्शन आणि शुभ-समाचार देणारा आहे (तर अल्लाहदेखील त्यांचा शत्रू आहे).

98

९८. जो मनुष्य अल्लाहचा आणि त्याच्या फरिश्त्यांचा आणि त्याच्या पैगंबरांचा व जिब्रील आणि मिकाईलचा शत्रू असेल तर अशा अधर्मी लोकांचा शत्रू स्वतः अल्लाह आहे.

99

९९. आणि निःसंशय, आम्ही तुमच्याकडे स्पष्ट निशाण्या पाठविल्या आहेत. ज्यांचा इन्कार, दुराचारी लोकांशिवाय अन्य कोणी करत नाही.

100

१००. हे लोक, जेव्हा जेव्हा एखादा वचन-करार करतात, तेव्हा त्यांच्यातला एक न एक गट त्याचा भंग करतो. किंबहुना त्यांच्यापैकी अधिकांश लोक बेईमान (ईमान नसलेले) आहेत.

101

१०१. आणि जेव्हादेखील त्यांच्याजवळ अल्लाहचा एखादा रसूल (पैगंबर) त्यांच्या ग्रंथाची पुष्टी करण्यास आला, तेव्हा त्या ग्रंथधारकांच्या एका गटाने अल्लाहच्या ग्रंथाला अशा प्रकारे पाठीमागे टाकले, जणू जाणत नव्हते.

102

१०२. आणि अशा गोष्टीच्या मागे लागले जिला सैतानी लोक, हजरत सुलेमानच्या साम्राज्यात पढत असत. सुलेमानने तर कुप्र (इन्कार) केला नव्हता. किंबहुना हे कुप्र-कर्म सैतानांचे होते. ते लोकांना जादू-टोणा शिकवित असत आणि बाबीलमध्ये हारुत व मारुत या दोन फरिश्त्यांवर जो उतरविला गेला होता, ते दोघेही कोणत्याही माणसाला त्या वेळपर्यंत शिकवित नसत, जोपर्यंत हे सांगत नसत की आम्ही तर एक कसोटी मात्र आहोत, तू कुप्र करू नकोस. मग लोक त्यांच्याकडून अशी विद्या शिकत की ज्याद्वारे पती-पत्नीच्या दरम्यान फूट पाडावी. वास्तविक अल्लाहच्या मर्जीविना ते कोणाला कसलेही नुकसान पोहचवू शकत नाही.१ हे लोक ते काही शिकतात, जे यांना न नुकसान पोहचवील आणि ना फायदा पोहचवू शकेल आणि ते खात्रीपूर्वक जाणतात की हे प्राप्त करणाऱ्याचा आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही आणि ती अतिशय वाईट गोष्ट आहे, जिच्या मोबदल्यात ते स्वतःला विकत आहेत. यांनी हे जाणले असते तर!

103

१०३. आणि जर या लोकांनी ईमान राखले असते व अल्लाहचे भय बाळगले असते तर अल्लाहच्या तर्फे यांना भलाई (शुभ-मांगल्य) लाभली असती. यांनी हे जाणले असते तर!

104

१०४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही (पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना) आमच्याकडे लक्ष द्या किंवा आमचा विचार करा असे म्हणू नका, किंबहुना आमच्याकडे पाहा असे म्हणत जा, आणि लक्षपूर्वक ऐकत राहा, आणि इन्कार करणाऱ्या लोकांकरिता दुःदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

105

१०५. ना तर ग्रंथ लाभूनही त्याचा इन्कार करणारे आणि ना मूर्तीपूजक असे इच्छितात की तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्यातर्फे भलाई उतरावी (त्यांच्या या द्वेष-मत्सराने काय झाले?) अल्लाह ज्याला इच्छिल त्याला आपली दया कृपा विशेष रीतीने प्रदान करील आणि अल्लाह मोठा कृपाशील आहे.

106

१०६. ज्या आयतीला आम्ही रद्द करतो किंवा तिचा विसर पाडतो तर त्याहून चांगली किंवा तिच्यासारखी आणखी आणतो. काय तुम्ही नाही जाणत की अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

107

१०७. काय तुम्हाला नाही माहीत की धरती आणि आकाशांची राज्य-सत्ता केवळ अल्लाहकरिताच आहे, आणि अल्लाहच्या शिवाय तुमचा कोणी संरक्षक आणि सहाय्यक नाही.

108

१०८. काय तुम्ही आपल्या रसूल (पैगंबर) ला तसे प्रश्न विचारू इच्छिता, जसे यापूर्वी मूसाला विचारले गेले (ऐका!) जो ईमानचा मार्ग सोडून कुप्र (इन्कार) चा मार्ग धरतो, तो सरळ मार्गापासून भटकतो.

109

१०९. या ग्रंथधारकांपैकी अधिकांश लोक सत्य प्रकट झाल्यानंतरही केवळ द्वेष-मत्सरामुळे तुम्हालाही ईमानापासून दूर करू इच्छितात, तेव्हा तुम्हीही माफ करा आणि सोडून द्या, येथपर्यंत की अल्लाहने आपला फैसला लागू करावा. निःसंशय अल्लाह प्रत्येक कार्य करण्याचे सामर्थ्य राखतो.

110

११०. तुम्ही नमाज (नित्य-नेमाने) अदा करीत राहा, आणि जकात (धर्म दान) देत राहा आणि जी भलाई तुम्ही आपल्यासाठी पुढे पाठवाल, ती सर्वकाही अल्लाहजवळ प्राप्त कराल. निःसंशय, अल्लाह तुमचे प्रत्येक कर्म पाहत आहे.

111

१११. आणि हे म्हणतात की जन्नतमध्ये यहूदी आणि ख्रिश्चनांखेरीज अन्य कोणी जाणार नाही. या त्यांच्या काल्पिनक आशा- अपेक्षा आहेत. त्यांना सांगा, तुम्ही (आपल्या कथनात) सच्चे असाल तर एखादा पुरावा तरी प्रस्तुत करा.

112

११२. ऐका! ज्याने स्वतःला अल्लाहच्या हवाली केले, आणि नेक-सदाचारी आहे, तर त्याच्याचकरिता, त्याच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या ठिकाणी चांगला मोबदला आहे आणि ना त्यांना कसले भय राहील ना एखादे दुःख.

113

११३. यहूदी म्हणतात, ख्रिश्चन उचित मार्गावर नाहीत आणि ख्रिश्चन म्हणतात की यहूदी उचित मार्गावर नाहीत. वास्तविक हे तौरातचे वाचन करतात अशा प्रकारे यांच्यासारखी गोष्ट अज्ञानी लोकही बोलतात. कयामतीच्या दिवशी अल्लाह यांच्या या मतभेदाचा फैसला करील.

114

११४. आणि त्याहून मोठा अत्याचारी कोण आहे? जो अल्लाहच्या मस्जिदीमध्ये अल्लाहचे स्मरण करण्यापासून रोखील, आणि त्यांना उजाडण्याचा प्रयत्न करील? अशा लोकांनी अल्लाहचे भय राखत, त्यात दाखल झाले पाहिजे. त्यांच्याकरिता या जगातही अपमान आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) मध्येही मोठमोठ्या शिक्षा-यातना आहेत.

115

११५. आणि पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी अल्लाहच आहे. तुम्ही जिकडे देखील तोंड कराल, तिकडे अल्लाहचे तोंड आहे. अल्लाह अतिशय सामर्थ्यशाली खूप खूप जाणणारा आहे.

116

११६. आणि हे म्हणतात की अल्लाहला संतान आहे (मुळीच नाही, किंबहुना) तो पवित्र (व्यंग-दोष विरहीत) आहे. धरती आणि आकाशांच्या समस्त निर्मितीवर त्याची शासन-सत्ता आहे आणि प्रत्येक त्याचा आज्ञाधारक आहे.

117

११७. तो, आकाशांना व धरतीला नव्याने बनवून उत्पन्न करणारा आहे, आणि तो ज्या कामाचा निर्णय घेतो, तेव्हा म्हणतो, होऊन जा आणि ते काम होते.

118

११८. आणि अशा प्रकारे अडाणी-अशिक्षित लोकदेखील म्हणाले की स्वतः अल्लाह आमच्याशी संभाषण का नाही करीत किंवा आमच्याजवळ एखादी निशाणी का नाही येत. अशा प्रकारचे कथन त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही केले होते, त्यांची आणि यांची मने एकसमान झालीत. आम्ही तर विश्वास (श्रद्धा) ठेवणाऱ्यांकरिता निशाण्यांचे निवेदन केले आहे.

119

११९. आम्ही तुम्हाला सत्यासह खूशखबर देणारा आणि सचेत करणारा बनवून पाठविले आहे आणि जहन्नमी लोकांविषयी तुम्हाला विचारणा केली जाणार नाही.

120

१२०. आणि यहूदी व ख्रिश्चन तुमच्याशी कधीही खूश होणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या धर्माचे अनुसरण न कराल. (तुम्ही) सांगा की अल्लाहचे मार्गदर्शनच, मार्गदर्शन असते आणि जर तुम्ही, आपल्याजवळ ज्ञान घेऊन पोहोचल्यानंतरही त्यांच्या इच्छा अभिलाषांचे अनुसरण केले तर अल्लाहच्या जवळ तुमचा ना कोणी समर्थक असेल, ना कोणी सहाय्यक.

121

१२१. ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आणि ते त्याला अशा प्रकारे वाचतात, जसा त्याच्या वाचनाचा हक्क आहे.१ ते या ग्रंथावरही ईमान राखतात आणि जे यावर ईमान राखत नाहीत ते स्वतः आपला तोटा करून घेतात.

122

१२२. हे इस्राईलच्या पुत्रांनो! मी तुम्हाला ज्या कृपा- देणग्या प्रदान केल्या आहेत, त्यांची आठवण करा आणि हे की मी तुम्हाला साऱ्या जगात श्रेष्ठता प्रदान केली होती.

123

१२३. आणि त्या दिवसाचे भय बाळगा, ज्या दिवशी कोणीही कोणाला फायदा पोहचवू शकणार नाही, आणि ना कोणाकडून काही मोबदला स्वीकारला जाईल, ना त्याला एखाद्याची शिफारस लाभ देऊ शकेल, ना त्याला मदत केली जाईल.

124

१२४. आणि जेव्हा इब्राहीमची त्यांच्या पालनकर्त्याने अनेक गोष्टींद्वारे कसोटी घेतली आणि त्यांनी सर्व कसोट्यांमध्ये सफल होऊन दाखविले, तेव्हा (अल्लाहने) फर्माविले की मी तुम्हाला लोकांचा इमाम (प्रमुख) बनवीन. विचारले, आणि माझ्या संततीला? उत्तर दिले की माझा वायदा अत्याचारी लोकांबाबत(साठी) नाही.

125

१२५. आणि आम्ही बैतुल्लाह (काबा) ला मानवाकरिता पुण्य (सवाब) आणि शांतीचे ठिकाण बनविले. तुम्ही मुकामे इब्राहीम (इब्राहिमचे स्थान- काबागृहात एक निर्धारीत ठिकाणाचे नाव आहे, जे काबागृहाच्या दरवाजासमोर, किंचित डावीकडे आहे.) ला मुसल्ला (नमाज पढण्याचे स्थान) ठरवून घ्या आणि आम्ही इब्राहीम आणि इस्माईल यांच्याकडून वचन घेतले की माझ्या घराला तवाफ (प्रदक्षिणा) आणि एतिकाफ (काही काळ मस्जिदीत ध्यान लावून उपासना) करणाऱ्यांसाठी आणि रुकुउ आणि सजदा करणाऱ्यांसाठी पवित्र आणि साफ-स्वच्छ राखा.

126

१२६. आणि जेव्हा इब्राहीम म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! तू या ठिकाणाला शांतीपूर्ण शहर बनव आणि इथल्या रहिवाशांना जे अल्लाह आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखणारे असतील, फळांची रोजी (अन्न-सामग्री) प्रदान कर. अल्लाहने फर्माविले की मी काफीर (इन्कार करणाऱ्या) लोकांनाही थोडा लाभ पोहचवीन, मग त्यांना आगीच्या अज़ाब (शिक्षा-यातने) कडे विवश करून टाकीन. पोहचण्याचे मोठे वाईट ठिकाण आहे हे!

127

१२७. जेव्हा इब्राहीम आणि इस्माईल काबागृहाचा पाया (आणि भिंती) रचत होते आणि म्हणत जात होते की हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्याकडून (ही सेवा) स्वीकार कर. निःसंशय तूच ऐकणारा आणि जाणणारा आहे.

128

१२८. हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला तुझा आज्ञाधारक बनव आणि आमच्या संततीमधून एका समूहाला तुझा आज्ञाधारक बनव आणि आम्हाला तुझ्या उपासनेच्या रीती शिकव आणि आमची तौबा (क्षमा-याचना) कबूल कर. निःसंशय तू तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे.

129

१२९. हे आमच्या पालनकर्त्या! त्यांच्यात, त्यांच्यामधूनच एक रसूल (पैगंबर) पाठव. ज्यांनी त्यांच्याजवळ तुझ्या आयतींचे पठण करावे आणि त्यांना ग्रंथ व हिकमत शिकवावे१ आणि त्यांना स्वच्छ- पवित्र करावे. निःसंशय, तू वर्चस्वशाली आणि बुद्धीकौशल्य बाळगणारा आहे.

130

१३०. आणि इब्राहीमच्या दीन (धर्मा) पासून तोच तोंड फिरविल, जो स्वतः मूर्ख असेल. आम्ही तर त्याला या जगातही पसंत केले आणि आखिरतमध्येही तो नेक-सदाचारी लोकांपैकी आहे.

131

१३१. जेव्हा (देखील) त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले की आत्मसमर्पण करा तेव्हा ते म्हणाले की मी समस्त विश्वाच्या पालनकर्त्यासाठी आत्मसमर्पण केले.

132

१३२. याच गोष्टीची ताकीद इब्राहीम आणि याकूब यांनी आपल्या संततीला केली की हे आमच्या पुत्रांनो! अल्लाहने तुमच्यासाठी हा दीन (धर्म) निर्धारित केला आहे. तेव्हा खबरदार! तुम्ही मुस्लिम असण्याच्या स्थितीतच मरा.

133

१३३. काय तुम्ही (हजरत) याकूबच्या मृत्युसमयी हजर होते? जेव्हा त्यांनी आपल्या संततीला म्हटले की तुम्ही माझ्या मृत्युनंतर कोणाची उपासना कराल? तेव्हा सर्वांनी उत्तर दिले की तुमच्या पालनकर्त्याची आणि तुमचे वाडवडील इब्राहीम आणि इस्माईल आणि इसहाक यांच्या उपास्या (दैवता) ची, जो एकमेव आहे आणि आम्ही त्याचेच ताबेदार बनून राहू.

134

१३४. हा जनसमूह तर होऊन गेला, त्यांनी जे केले ते त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही जे कराल ते तुमच्यासाठी आहे. त्यांच्या कर्माविषयी तुम्हाला विचारले जाणार नाही.

135

१३५. हे म्हणतात की यहूदी (ज्यू) आणि ख्रिश्चन व्हाल तर मार्गदर्शन लाभेल. तुम्ही सांगा की सरळ आणि उचित मार्गावर तर इब्राहीमच्या मार्गाचे अनुसरण करणारे आहेत आणि इब्राहीम केवळ अल्लाहचे आज्ञाधारक होते. ते मूर्तीपूजक नव्हते.

136

१३६. (हे ईमानधारकांनो!) तुम्ही सर्व सांगा, आम्ही अल्लाहवर ईमान राखले आणि त्यावरही जे आमच्याकडे उतरविले गेले आणि जे इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब आणि त्यांच्या संततीवर उतरविले गेले आणि जे काही अल्लाहच्या तर्फे मूसा, ईसा आणि अन्य पैगंबरांना दिले गेले. आम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही दरम्यान फरक करीत नाही. आम्ही अल्लाहचे ताबेदार आहोत.१

137

१३७. जर ते तुमच्यासारखे ईमान राखतील तर मार्गदर्शन प्राप्त करतील आणि जर तोंड फिरवतील तर विरोधात आहेत. अल्लाह त्या सर्वांच्या विरोधात भविष्यात तुमची मदत करील. अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि जाणणारा आहे.

138

१३८. अल्लाहचा रंग धारण करा, आणि अल्लाहपेक्षा उत्तम रंग आणि कोणाचा असेल? आम्ही तर त्याचीच उपासना करणारे आहोत.

139

१३९. (तुम्ही) सांगा, काय तुम्ही आमच्याशी अल्लाहबाबत वाद घालता, जो आमचा आणि तुमचा पालनकर्ता आहे. आमच्यासाठी आमची कर्मे आहेत, तुमच्यासाठी तुमची कर्मे. आम्ही तर केवळ अल्लाहशीच सच्चे, प्रामाणिक आहोत.

140

१४०. काय तुम्ही असे म्हणता की इब्राहीम, इस्माईल, इसहाक आणि याकूब व त्यांची संतती यहूदी किंवा ख्रिश्चन होती? सांगा, काय तुम्ही जास्त जाणता की अल्लाह? अल्लाहच्या जवळ पुरावा लपविणाऱ्यांपेक्षा जास्त अत्याचारी आणखी कोण आहे? आणि अल्लाह तुमच्या कर्मांपासून गाफील नाही.

141

१४१. हा एक जनसमूह होता जो होऊन गेला, त्यांनी जे (कर्म) केले ते त्यांच्यासाठी आहे आणि जे तुम्ही केले ते तुमच्यासाठी. तुम्हाला त्यांच्या कर्मांविषयी विचारले जाणार नाही.१

142

१४२. लवकरच हे मूर्ख लोक म्हणतील की ज्या किब्ला (ज्या दिशेकडे तोंड करून नमाज पढली जाते) वर हे होते, त्याकडून यांना कोणत्या गोष्टीने फिरविले? (तुम्ही त्यांना) सांगा की पूर्व आणि पश्चिमेचा मालक अल्लाह आहे. तो ज्याला इच्छितो सरळ मार्ग दाखवितो.

143

१४३. आणि आम्ही अशा प्रकारे तुम्हाला मधली (संतुलित) उम्मत (जनसमूह) बनविले,१ यासाठी की तुम्ही लोकांवर साक्षी राहावे आणि रसूल (स.) तुमच्यावर साक्षी राहावेत आणि ज्या किब्लावर तुम्ही पूर्वीपासून होते, तो आम्ही केवळ एवढ्यासाठी निश्चित केला होता की (याद्वारे) आम्ही हे जाणून घ्यावे की रसूलचा सच्चा ताबेदार कोण आहे आणि कोण आहे जो उलट्या पावली परत फिरतो. वास्तविक हे कठीण काम आहे, परंतु ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन केले आहे (त्यांच्यासाठी काहीच कठीण नाही) अल्लाह तुमचे ईमान वाया जाऊ देणार नाही. निःसंशय, अल्लाह, लोकांशी प्रेम राखणारा आणि दया करणारा आहे.

144

१४४. आम्ही तुमचे तोंड वारंवार आकाशाकडे वर होत असलेले पाहत आहोत, आता आम्ही तुम्हाला त्या किब्लाकडे फिरवून देऊ ज्यामुळे तुम्ही खूश व्हाल. तुम्ही आपले तोंड मस्जिदे हराम (काबा) कडे फिरवून घ्या आणि तुम्ही कोठेही असा, आपले तोंड त्याच्याचकडे फिरवून घेत जा. ग्रंथधारकांना, ही गोष्ट अल्लाहतर्फे सत्य असण्याचे खरे ज्ञान आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्या त्या कर्मांपासून गाफील नाही, जी कर्मे हे करतात.

145

१४५. आणि तुम्ही जर ग्रंथधारकांना सर्व पुरावे सादर करून द्याल, तरीही ते तुमच्या किब्लाचे अनुसरण करणार नाहीत आणि ना तुम्ही त्याचा किब्ला मान्य करणारे व्हाल, ना हे आपसात एकमेकांचा किब्ला मानणारे आहेत. तुमच्याजवळ स्पष्ट ज्ञान येऊन पोहोचल्यानंतरही जर तुम्ही त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचे अनुसरण करू लागाल तर निश्चितच तुम्हीदेखील अत्याचारी ठराल.१

146

१४६. ज्यांना आम्ही ग्रंथ दिला आहे, ते तर याला अशा प्रकारे ओळखतात, ज्या प्रकारे एखादा मनुष्य आपल्या पुत्रांना ओळखतो, त्यांच्यातला एक समूह सत्याला ओळखूनही ते लपवितो.

147

१४७. तुमच्या पालनकर्त्यातर्फे हे परिपूर्ण सत्य आहे. सावधान! तुम्ही शंका-संशय करणाऱ्यांपैकी होऊ नका.

148

१४८. आणि प्रत्येक मनुष्य कोणत्या न कोणत्या दिशेकडे पर्वृत्त (लक्ष केंद्रित करणारा) असतो. तुम्ही नेकी (सत्कर्मां) कडे धाव घ्या. तुम्ही कोठेही असा अल्लाह तुम्हाला घेऊन येईल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

149

१४९. आणि तुम्ही ज्या ठिकाणाहूनही निघाल आपले तोंड मस्जिदे हरााम (आदरणीय मस्जिद अर्थात काबा) कडे करून घेत जा. तुमच्या पालनकर्त्यातर्फे हेच सत्य आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, त्यापासून अल्लाह गाफील नाही.

150

१५०. आणि ज्या ठिकाणाहूनही तुम्ही निघाल आपले तोंड मस्जिदे हरामकडे करून घ्या आणि ज्या ठिकाणीदेखील तुम्ही राहाल आपले तोंड त्याच्याचकडे (अर्थात काबाकडे) करून घेत जा, यासाठी की लोकांना वाद घालण्याचे कोणतेही प्रमाण बाकी राहू नये, त्यांच्याखेरीज जे यांच्यात अत्याचारी आहेत. तुम्ही त्यांचे भय बाळगू नका, १ फक्त माझेच भय बाळगा, यासाठी की मी आपली कृपा- देणगी (नेमत) तुमच्यावर पूर्ण करावी, आणि यासाठी की तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करू शकावे.

151

१५१. ज्या प्रकारे आम्ही तुमच्यात, तुमच्यामधूनच रसूल (पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना पाठविले, जो आमच्या आयती (पवित्र कुरआन) तुमच्यासमोर वाचून ऐकवितो आणि तुम्हाला स्वच्छ शुद्ध करतो आणि तुम्हाला ग्रंथ आणि हिकमत (बुद्धिमानता) शिकवितो आणि त्या गोष्टीचे ज्ञान देतो, ज्याविषयी तुम्ही अजाण होते.

152

१५२. यासाठी तुम्ही माझे स्मरण करा, मीदेखील तुमचे स्मरण राखीन आणि माझ्याशी कृतज्ञशील राहा आणि कृतघ्नता दाखवू नका.

153

१५३. हे ईमान राखणाऱ्यांनो! धीर-संयम आणि नमाजद्वारे मदत मागा. निःसंशय, अल्लाह धीर-संयम राखणाऱ्यांना साथ देतो.१

154

१५४. आणि अल्लाहच्या मार्गात शहीद होणाऱ्यांना मेलेले म्हणू नका, ते तर जिवंत आहेत, परंतु तुम्ही समजू शकत नाही.

155

१५५. आणि आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमची कसोटी जरूर घेऊ. शत्रूंच्या भय-दहशतीने, तहान भूकेने, संपत्ती आणि प्राण, फळांच्या कमतरतेने आणि त्या सबुरी राखणाऱ्यांना खूशखबर द्या.

156

१५६. त्यांना जेव्हा जेव्हा एखाद्या संकटाला तोंड द्यावे लागते, तेव्हा ते म्हणत असतात की आम्ही तर स्वतः सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता आहोत, आणि आम्ही त्याच्याचकडे परतणार आहोत.

157

१५७. हेच ते लोक होत, ज्यांच्यावर त्यांच्या पालनकर्त्याची रहमत (दया-कृपा) आणि मेहरबानी आहे आणि हेच लोक सरळ मार्गावर आहेत.

158

१५८. निःसंशय, सफा आणि मरवह (हे दोन्ही पर्वत) अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहेत. यासाठी अल्लाहच्या घरा (काबा) चा हज आणि उमरा करणाऱ्यांवर यांच्या दरम्यान फेऱ्या करून घेण्यात काहीच हरकत नाही. आपल्या आवडीने नेकी (सत्कर्म) करणाऱ्यांचा अल्लाह सन्मान करतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.

159

१५९. जे लोक आम्ही अवतरीत केलेल्या निशाण्यांना आणि मार्गदर्शनाला लपवितात यानंतरही की आम्ही आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनात) लोकांसाठी त्यांचे निवेदन केलेले आहे, अशा लोकांचा अल्लाहतर्फे आणि सर्व धिक्कारणाऱ्यांतर्फे धिक्कार आहे.

160

१६०. परंतु ते लोक, जे तौबा (क्षमा याचना) करतील आणि (आपल्या आचरणात) सुधार करून घेतील, आणि जे लपविले ते सांगून टाकतील तर मी त्यांची तौबा कबूल करतो, आणि मी तौबा कबूल करणारा आणि दया करणारा आहे.

161

१६१. निःसंशय, जे काफिर (इन्कारी लोक) इन्कार करण्याच्या स्थितीतच मरण पावतील तर त्यांच्यावर अल्लाहतर्फे, फरिश्त्यांतर्फे आणि सर्व लोकांतर्फे धिक्कार आहे.

162

१६२. यात ते नेहमीकरिता राहतील, ना त्यांच्यावरील अज़ाब (शिक्षा- यातना) हलकी (सौम्य) केली जाईल आणि ना त्यांना ढील दिली जाईल.

163

१६३. आणि तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) एक अल्लाहच आहे. त्याच्याशिवाय कोणीही सच्चा (वास्तव) उपास्य नाही, तो अतिशय कृपाळू आणि मोठा दयाळू आहे.

164

१६४. निःसंशय, आकाश आणि धरतीची निर्मिती, रात्र आणि दिवसाचा फेरबदल, लोकांच्या लाभदायक वस्तू घेऊन नौकांचे समुद्रात चालणे, आकाशातून पाणी उतरवून मृत जमिनीला जिवंत करणे, त्यात प्रत्येक प्रकारचे जीव पसरविणे, वाऱ्यांची (हवेची) दिशा बदलणे आणि ढग जे आकाश व धरतीच्या दरम्यान हुकूमाधीन आहेत, यात बुद्धिमानांकरिता अल्लाहच्या सामर्थ्याची निशाणी आहे.

165

१६५. आणि काही लोक असेही आहेत जे दुसऱ्यांना अल्लाहचा सहभागी ठरवून त्यांच्याशी असे प्रेम राखतात, जसे प्रेम अल्लाहशी असायला हवे आणि ईमानधारक तर अल्लाहशी प्रेम राखण्यात मोठे सक्त असतात. मूर्तीपूजक लोकांनी हे जाणले असते तर! वास्तविक अल्लाहच्या शिक्षा- यातना पाहून (जाणून घेतील) की सर्व प्रकारचे सामर्थ्य अल्लाहलाच आहे आणि अल्लाह सक्त अज़ाब (शिक्षा-यातना) देणारा आहे. (तर कधीही मूर्तीपूजा केली नसती.)

166

१६६. ज्या वेळी प्रमुख (पेशवा) लोक आपल्या अनुयायींपासून वेगळे होतील आणि अज़ाबला आपल्या डोळ्यांनी पाहून घेतील आणि सर्व नाते-संबंध तुटतील.

167

१६७. आणि अनुयायी म्हणू लागतील, आम्हाला पुन्हा एकदा जगात जायला मिळाले तर किती बरे होईल, मग तर आम्हीही त्यांच्यापासून असेच वेगळे होऊ जसे हे आमच्यपासून आहेत. अशा प्रकारे अल्लाह त्यांना त्यांचे कर्म दाखविल त्यांच्या पश्चात्तापासाठी. जहन्नममधून बाहेर पडणे त्यांना कधीच शक्य होणार नाही.१

168

१६८. हे लोकांनो! धरतीवर जेवढ्यादेखील हलाल (वैध) आणि पाक (स्वच्छ-शुद्ध) वस्तू आहेत त्या खा व प्या आणि सैतानाच्या मार्गावर चालू नका१ तो तुमचा उघड शत्रू आहे.

169

१६९. तो तुम्हाला फक्त वाईट आणि निर्लज्जपणाचा आणि अल्लाहच्या संबंधाने अशा गोष्टी सांगण्याचा आदेश देतो, ज्या तुम्ही जाणतही नाही.

170

१७०. आणि जेव्हा जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने अवतरीत केलेल्या ग्रंथानुसार आचरण करा, तेव्हा उत्तर देतात की आम्ही तर त्याच मार्गाचे अनुसरण करू, ज्यावर आम्हाला आपले वाडवडील आढळले, वास्तविक त्यांचे वाडवडील मूर्ख आणि भटकलेले असले तरी.१

171

१७१. आणि काफिर (इन्कारी लोक) त्या जनावरांसारखे आहेत, जे आपल्या गुराख्याची फक्त हाक आणि आवाज एकतात (समजून घेत नाहीत) ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत, त्यांना अक्कलच नाही.

172

१७२. हे ईमान राखणाऱ्यांनो! जी (पाक) वस्तू आम्ही तुम्हाला प्रदान केली आहे, ती खा व प्या आणि अल्लाहचे आभारी बनून राहा. जर तुम्ही फक्त त्याचीच उपासना करत असाल.

173

१७३. तुमच्यासाठी मेलेले आणि रक्त, डुकरांचे मांस, आणि अशी ती प्रत्येक वस्तू जिच्यावर अल्लाहच्या नावाशिवाय दुसऱ्यांचे नाव घेतले जावे, हराम आहे. परंतु जो लाचार होईल आणि तो मर्यादा ओलांडणारा व अत्याचारी नसावा, त्याच्यावर ते खाण्यात काही गुन्हा नाही. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

174

१७४. निःसंशय, जे लोक सर्वश्रेष्ठ अल्लाहने अवतरीत केलेला ग्रंथ लपवितात आणि त्याला थोड्याशा किंमतीवर विकतात, खात्रीने ते आपल्या पोटात आग भरत आहेत. कयामतच्या दिवशी अल्लाह त्यांच्याशी संभाषणही करणार नाही ना त्यांना पाक (स्वच्छ-शुद्ध) करील. त्याच्यासाठी मोठी सक्त शिक्षा-यातना आहे.

175

१७५. हेच ते लोक आहेत, ज्यांनी मार्गदर्शनाच्या मोबदल्यात मार्गभ्रष्टतेला आणि माफीच्या मोबदल्यात अज़ाब खरेदी केला. हे लोक आगीचा अज़ाब किती सहन करणारे आहेत.

176

१७६. या शिक्षा-यातनांचे कारण हेच आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने सच्चा (सत्यांवर आधारीत) ग्रंथ उतरविला आणि या ग्रंथाच्या संदर्भात मतभेद राखणारे निश्चितच दूरच्या विरोधात पडले.

177

१७७. समस्त नेकी (सत्कर्म) केवळ पूर्व आणि पश्चिमेकडे तोंड करण्यातच नाही, किंबहुना वास्तविक भला माणूस तो आहे जो अल्लाहवर, कयामतच्या दिवसावर, फरिश्त्यांवर, अल्लाहच्या ग्रंथावर आणि पैगंबरावर ईमान राखणारा आहे. धन संपत्तीचा मोह असतानाही जो आपले धन नातेवाईकांवर, अनाथांवर, गोर गरीबांवर, प्रवाशांवर आणि याचकांवर खर्च करतो. बंदी झाले त्यांना मुक्त करतो. नमाज नियमितपणे पढतो आणि जकात (धर्म दान) अदा करतो. जेव्हा वायदा करतो तर त्याला पूर्ण करतो. धन संपत्तीची तंगी-अडचण, दुःख-यातना आणि लढाईच्या प्रसंगी धीर-संयम राखतो. हेच लोक सच्चे आहेत आणि हेच परहेजगार (अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणारे) आहेत.

178

१७८. हे ईमानधारकांनो! तुमच्यावर हत्या केल्या गेलेल्या माणसाचा (रक्ताचा) मोबदला घेणे अनिवार्य केले गेले आहे, स्वतंत्र माणसाच्या मोबदल्यात स्वतंत्र माणूस, गुलामाच्या मोबदल्यात गुलाम, स्त्रीच्या बदल्यात स्त्री, मात्र जर एखाद्याला, त्याच्या भावा तर्फे माफ केले जाईल, त्याने भलेपणाचा आदर राखला पाहिजे आणि सहजपणे फिदिया (एखाद्याच्या खुनाची नुकसानभरपाई म्हणून दिले जाणारे धन) अदा केले पाहिजे. तुमच्या पालनकर्त्यातर्फे ही सूट (सवलत) आहे. आणि रहमत (दया-कृपा) आहे. त्यानंतरही जो मर्यादेचे उल्लंघन करील, तर त्याला अतिशय सक्त शिक्षा- यातनेला तोंड द्यावे लागेल.

179

१७९. बुद्धिमानांनो! किसास (हत्यादंडा) मध्ये तुमच्याकरिता जीवन आहे. या कारणाने तुम्ही (हत्या करण्यापासून) स्वतःला रोखाल.१

180

१८०. तुमच्यासाठी हे बंधनकारक केले गेले आहे की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचे मरण जवळ येऊन ठेपेल आणि तो आपल्या मागे धन-संपत्ती सोडून जात असेल तर त्याने आपल्या माता-पित्यासाठी आणि नातेवाईकांसाठी भलेपणाने वसीयत (मृत्युपत्र) करून जावे. अल्लाहचे भय राखणाऱ्यांवर हे अनिवार्य कर्तव्य आहे.

181

१८१. आता जो मनुष्य त्याला ऐकून घेतल्यानंतर त्यात बदल करील तर त्याचा गुन्हा, बदल करणाऱ्यावरच राहील. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.

182

१८२. तथापि ज्याला मृत्युपत्र करणाऱ्यातर्फे पक्षपात आणि अपराधाचे भय जाणवेल, त्याने जर त्यांच्या दरम्यान सुधार-समझोता घडवून आणला तर त्याच्यावर गुन्हा नाही. निःसंशय, अल्लाह माफ करणारा, मेहरबान आहे.

183

१८३. हे ईमानधारकांनो! तुमच्यावर रोजे (उपवास व्रत जे रमजानच्या महिन्यात राखले जाते) फर्ज (बन्धनकारक) केले गेलेत, ज्या प्रकारे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर फर्ज केले गेले होते. यासाठी की तुम्ही तकवा (अल्लाहचे भय) चा मार्ग धरावा.१

184

१८४. काही मोजकेच दिवस आहेत, परंतु तुमच्यापैकी जर एखादा मनुष्य आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर त्याने इतर दिवसात गणना पूर्ण करून घ्यावी आणि ज्याला या गोष्टीचे सामर्थ्य असेल त्याने फिदियाच्या स्वरूपात एका गरीबाला जेऊ घालावे, मग जो मनुष्य आपल्या आवडीने याहून जास्त नेकी करील तर ते त्याच्याचकरिता उत्तम आहे, परंतु तुमच्या हक्कात रोजे राखणे हेच अधिक चांगले कर्म आहे. जर तुम्ही जाणार असाल.

185

१८५. रमजान महिना तो आहे, ज्यात कुरआन उतरविला गेला, जो लोकांकरिता मार्गदर्शन आहे आणि जो मार्गदर्शक आणि सत्य व असत्याच्या दरम्यान निर्णायक आहे. तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी या महिन्यास प्राप्त करील, त्याने रोजे राखले पाहिजेत, परंतु जो आजारी असेल, किंवा प्रवासात असेल तर त्याने इतर दिवसात ही संख्या पूर्ण करून घेतली पाहिजे. अल्लाह तुमच्याकरिता सहज-सुलभता इच्छितो, सक्ती- अडचण इच्छित नाही. तो इच्छितो की तुम्ही गणना पूर्ण करून घ्यावी आणि अल्लाहने प्रदान केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याची महानता वर्णन करा आणि त्याचे कृतज्ञशील (दास) बनून राहा.

186

१८६. आणि जेव्हा माझे उपासक माझ्याविषयी तुम्हाला विचारतील, तेव्हा त्यांना सांगा की मी अगदी जवळ आहे. प्रत्येक प्रार्थना करणाऱ्याच्या प्रार्थनेला, जेव्हा जेव्हा तो मला पुकारतो, मी कबूल करतो. यास्तव लोकांनीही माझा हुकूम मानला पाहिजे आणि माझ्यावर ईमान राखले पाहिजे. हेच त्यांच्या भलाईचे कारण आहे.

187

१८७. रोजांच्या रात्रीत आपल्या पत्नीच्या जवळ जाण्याची तुम्हाला परवानगी आहे. त्या तुमच्या पोषाख आहेत आणि तुम्ही त्यांचे पोषाख आहात. तुम्ही लपून छपून केलेल्या खियानतीचे अल्लाहला ज्ञान आहे. त्याने तुमची तौबा (क्षमा-याचना) कबूल करून तुम्हाला माफ केले. आता तुम्हाला त्यांच्याशी समागम करण्याचा आणि अल्लाहने लिहून ठेवलेले प्राप्त करण्याचा आदेश आहे. तुम्ही खात-पीत राहा.येथेपर्यर्ंत की प्रातःकाळच्या सफेदीचा धागा अंधाराच्या काळ्या धाग्यापासून वेगळा व्हावा, मग रात्र होईपर्यंत रोजा पूर्ण करा आणि आपल्या पत्नीशी अशा वेळी संभोग करू नका, जेव्हा तुम्ही मस्जिदींमध्ये एतिकाफ (एका ठराविक अवधीपर्यंत, अल्लाहची उपासना करण्याच्या हेतूने स्वतःला मस्जिदच्या हद्दीतच रोखणेे) मध्ये असाल, या अल्लाहने घातलेल्या मर्यादा आहेत. तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका. अशा प्रकारे अल्लाह आपल्या निशाण्या, लोकांना स्पष्ट करून सांगतो, यासाठी की त्यांनी अल्लाहचे भय राखून दुष्कर्मांपासून दूर राहावे.

188

१८८. आणि एकमेकांचे धन चुकीच्या रीतीने खाऊ नका, ना हक्कदार लोकांना लाचलुचपत पोहचवून एखाद्याची काही संपत्ती जुलूमाने हडप करा, जरी तुम्ही हे जाणत असाल.१

189

१८९. लोक तुम्हाला नव्या चंद्राविषयी विचारतात. तुम्ही त्यांना सांगा की हे लोकांच्या उपासनेच्या वेळा आणि हजच्या अवधीकरिता आहे (एहरामच्या अवस्थेत) आणि घरांच्या मागच्या बाजूने तुमचे प्रवेश करणे काही नेकीचे काम नव्हे. किंबहुना नेक काम (सत्कर्म) तर ते आहे जे अल्लाहचे भय राखून केले जावे. घरांमध्ये त्यांच्या दरवाज्यामधून प्रवेश करीत जा, आणि अल्लाहचे भय बाळगून राहा. यासाठी की तुम्ही सफल व्हावे.

190

१९०. आणि लढा अल्लाहच्या मार्गात त्यांच्याशी, जे तुमच्याशी लढतात आणि अत्याचार करू नका.१ निःसंशय, अल्लाह अत्याचारीला पसंत करीत नाही.

191

१९१. आणि त्यांना ठार करा जिथे जिथे ते आढळतील आणि त्यांना बाहेर काढा जिथून त्यांनी तुम्हाला बाहेर घालविले आहे. आणि (ऐका) फितना (भांडण-तंटा, फसाद) हत्या करण्यापेक्षाही वाईट आहे. आणि मस्जिदे हराम (काबा) च्या जवळ त्यांच्याशी लढाई करू नका, जोपर्य ंत ते स्वतः तुमच्याशी न लढावेत. जर ते तुमच्याशी लढतील तर तुम्हीही त्यांना ठार करा, इन्कारी लोकांचा हाच मोबदला आहे.

192

१९२. मग जर ते (लढणे) थांबवतील, तर अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

193

१९३. आणि त्यांच्याशी तोपर्यंत लढा, जोपर्यंत फितना (फसाद, उपद्रव) पूर्णपणे मिटत नाही आणि अल्लाहचा दीन (धर्म) कायम राहात नाही, परंतु जर ते (लढणे) थांबवतील तर (मग तुम्हीही थांबा). जुलूम अत्याचार केवळ अत्याचारी लोकांवर आहे.

194

१९४. आदर-सन्मानवाल्या महिन्यांच्या मोबदल्यात आदर-सन्मानपूर्ण महिने आहेत, आणि आदर-सन्मानाच्या सर्व गोष्टींमध्ये बरोबरीचा विचार राखला पाहिजे. जो तुमच्यावर अत्याचार करील तर तुम्हीही त्याच्यावर तसाच जुलूम करा जसा तुमच्यावर केला गेला आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगत राहा आणि चांगले ध्यानात ठेवा की अल्लाह, दुराचारापासून दूर राहणाऱ्यांच्या सोबत आहे.

195

१९५. आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करा आणि आपल्याच हातांनी स्वतःला हलाखीत टाकू नका. भलाई (नेकी) करीत राहा. निःसंशय अल्लाह भलाई करणाऱ्यांशी प्रेम राखतो.

196

१९६. आणि अल्लाहकरिता हज व उमरा पूर्ण करा जर मार्गात रोखले जाल तर जेदेखील कुर्बानीचे जनावर असेल, त्याची कुर्बानी करून टाका, आणि जोपर्यंत कुर्बानी, कुर्बानीच्या ठिकाणावर पोहचत नाही, तोपर्यंत आपल्या डोक्यावरील केस काढू नका. आणि तुमच्यापैकी जो आजारी असेल किंवा त्याच्या डोक्याला काही त्रास असेल ज्यामुळे तो डोक्यावरचे केस काढून घेईल तर त्यावर फिदिया (दंड) आहे की, वाटल्यास त्याने रोजा (व्रत) राखावा किंवा वाटल्यास सदका (दान) द्यावा, किंवा कुर्बानी करावी. परंतु शांतीपूर्ण अवस्था लाभताच जो उमरासह हज करण्याचा लाभ घेऊ इच्छिल तर त्याने, जीदेखील कुर्बानी हजर असेल, ती करून टाकावी. ज्याला हे सामर्थ्य नसेल, त्याने तीन रोजे हजच्या दिवसात राखावे आणि सात रोजे हज हून परतताना राखावेत, हे पूर्ण दहा झाले. हा आदेश त्यांच्यासाठी आहे, जे मस्जिदे हराम (मक्का) चे रहिवाशी नसावेत. (लोकांनो!) अल्लाहचे भय बाळगून राहा आणि जाणून असा की सर्वश्रेष्ठ अल्लाह फार कठोर शिक्षा-यातना देणारा आहे.

197

१९७. हजचे महिने निर्धारीत आहेत. यास्तव जो या ठराविक दिवसात हजचा पक्का इरादा करील तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करण्यापासून, अपराध करण्यापासून आणि भांडण-तंटा करण्यापासून दूर राहावे. तुम्ही जे सवाब (पुण्य) चे काम कराल, ते सर्वश्रेष्ठ अल्लाह जाणणारा आहे, आणि आपल्यासोबत प्रवासखर्च (साधन-सामग्री) अवश्य घ्या. सर्वांत उत्तम असा प्रवासखर्च तर अल्लाहचे भय आहे. आणि हे बुद्धिमानानो! माझे भय बाळगत राहा.

198

१९८. आपल्या पालनकर्त्याची कृपा शोधण्यात तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही. जेव्हा तुम्ही अरफात (या ठिकाणापासून) परत व्हाल, तेव्हा मशअरे हराम (मुज्दलिफा) जवळ अल्लाहचे स्मरण करा आणि अशा प्रकारे स्मरण करा, जसे त्याने तुम्हाला शिकविले आहे. वास्तविक यापूर्वी तुम्ही मार्गभ्रष्ट लोकांमध्ये होता.

199

१९९. मग तुम्ही त्या स्थानापासून परत फिरा, ज्या स्थानापासून सर्व लोक परत फिरतात आणि अल्लाहजवळ माफी मागत राहा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

200

२००. मग जेव्हा तुम्ही हजचे प्रत्येक काम (विधी) पूर्ण करून घ्याल, तेव्हा अल्लाहचे स्मरण करा ज्याप्रकारे तुम्ही आपल्या थोर-बुजूर्ग लोकांचे स्मरण करीत होते, किंबहुना त्याहून जास्त. काही लोक तर असेही आहेत, जे म्हणतात, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला या जगात देऊन टाक’’ अशा लोकांचा आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही.

201

२०१. आणि काही लोक असेही आहेत, जे म्हणतात, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला या जगातही भलाई प्रदान कर आणि आखिरतमध्येही भलाई प्रदान कर आणि आम्हाला जहन्नमच्या अज़ाबपासून वाचव.’’

202

२०२. हे लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी त्यांच्या कर्मांचा हिस्सा (चांगला मोबदला) आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह लवकरच हिशोब घेणारा आहे.

203

२०३. आणि त्या काही ठराविक दिवसांमध्ये (‘तशरीक’च्या दिवसांत) अल्लाहचे स्मरण करा.१ दोन दिवसांतच घाई करणाऱ्यांवर काही गुन्हा नाही, आणि जो मागे राहील त्याच्यावरही काही गुन्हा नाही. हे अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता आहे आणि अल्लाहचे भय बाळगत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही सर्व त्याच्याचकडे एकत्र (जमा) केले जाल.

204

२०४. आणि काही लोकांच्या सांसारिक जीवनाच्या गोष्टी तुम्हाला आनंदित करतात आणि तो आपल्या मनातल्या गोष्टींवर अल्लाहला साक्षी ठरवितो, वास्तविक तो मोठा भांडखोर आहे.

205

२०५. आणि जेव्हा तो परतून जातो, तेव्हा धरतीवर दंगा-धोपा, रक्तपात पसरविण्याचा, शेती-वाडी आणि वंशाचा विनाश करण्याचा प्रयत्न करीत राहतो. आणि अल्लाह उत्पात-उपद्रवाला पसंत करीत नाही.

206

२०६. आणि जेव्हा त्याला सांगितले जाते की अल्लाहचे भय राख, तेव्हा त्याची घमेंड त्याला अपराध करण्यास प्रवृत्त करते. अशा माणसाकरिता फक्त जहन्नमच आहे आणि निःसंशय ते अतिशय वाईट ठिकाण आहे.

207

२०७. आणि काही लोक असेही आहेत, जे अल्लाहची मर्जी प्राप्त करण्यासाठी आपला प्राणदेखील विकून टाकतात आणि अल्लाह, आपल्या दासांवर मोठा स्नेह- प्रेम राखणारा आहे.

208

२०८. हे ईमान राखणाऱ्यांनो! इस्लाममध्ये पूर्णपणे दाखल व्हा आणि सैतानाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालू नका. तो तुमचा उघड शत्रू आहे.

209

२०९. जर तुम्ही निशाण्या येऊन पोहोचल्यानंतरही घसरून जाल तर लक्षात ठेवा, अल्लाह मोठा जबरदस्त आणि हिकमत राखणारा आहे.

210

२१०. काय लोकांना या गोष्टीची प्रतिक्षा आहे की अल्लाह स्वतः घनदाट ढगांमध्ये प्रकट व्हावा आणि फरिश्तेदेखील आणि मग काम तमाम केले जावे! अल्लाहकडेच सर्व कामे रुजू केली जातात.

211

२११. इस्राईलच्या संततीला विचारा की आम्ही त्यांना किती स्पष्ट निशाण्या प्रदान केल्या, आणि जो, अल्लाहची कृपा- देणगी प्राप्त झाल्यानंतर तिला बदलून टाकील तर (त्याने ध्यानी घ्यावे) की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.

212

२१२. काफिरां (इन्कार करणाऱ्यां) साठी या जगाचे जीवन सुशोफित केले गेले आहे आणि ते ईमानधारकांची थट्टा उटवितात, तथापि जे अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणारे आहे, कयामतच्या दिवशी (दर्जामध्ये) त्याच्यापेक्षा फार मोठे असतील. अल्लाह ज्याला इच्छितो अगणित प्रदान करतो.

213

२१३. वास्तविक, सुरुवातीच्या काळात सर्व लोक एकाच जनसमूहाचे (दीन-धर्माचे) होते. मग अल्लाहने पैगंबरांना शुभ समाचार देण्यासाठी आणि सचेत करण्यासाठी पाठविले आणि त्यांच्यासोबत ग्रंथ अवतरित केले, यासाठी की लोकांच्या दरम्यान असलेल्या प्रत्येक मतभेदाचा फैसला व्हावा, आणि केवळ त्याच लोकांनी, जे त्यांना दिले गेले होते, आपल्याजवळ प्रमाण येऊन पोहचल्यानंतरही आपल्या द्वेष आणि घमेंडीमुळे त्यात मतभेद केला. याकरिता अल्लाहने ईमानधारकांच्या या मतभेदातही सत्याकडे आपल्या आज्ञेने मार्गदर्शन केले आणि अल्लाह ज्याला इच्छितो सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करतो.

214

२१४. काय तुम्ही अशी कल्पना करून बसलात की जन्नतमध्ये अगदी सहजपणे प्रवेश कराल? वास्तविक अजून तुमच्यावर ती अवस्था नाही आली, जी तुमच्या पूर्वीच्या लोकांवर आली होती. त्यांना सक्त गरीबी व रोगराईचा सामना करावा लागला. त्यांना इतके झिंजोडले गेले की रसूल (पैगंबर) आणि त्यांच्या सोबतचे ईमानधारक लोक म्हणून लागले की अल्लाहची मदत केव्हा येईल ? ऐका अल्लाहची मदत जवळच आहे!

215

२१५. तुम्हाला ते विचारतात की त्यांनी कशावर खर्च करावा? तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही जो काही माल (धन) खर्च कराल तो माता-पित्याकरिता, नातेवाईकांकरिता, अनाथ व गोरगरीबांकरिता आणि प्रवाशांकरिता आहे. आणि तुम्ही जी काही भलाई कराल, अल्लाह ती चांगल्या प्रकारे जाणतो.

216

२१६. तुमच्यावर जिहाद फर्ज (बंधनकारक कर्तव्य) केले गेले. जरी ते तुम्हाला अप्रिय वाटत असले तरीही, शक्य आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला वाईट जाणावे आणि खरे पाहता तोच तुमच्यासाठी भली असावी आणि हेही शक्य आहे की तुम्ही ज्या गोष्टीला चांगली समजावे ती तुमच्यासाठी वाईट असावी. खरे ज्ञान तर अल्लाहलाच आहे. तुम्ही मात्र अजाण आहात.

217

२१७. लोक तुम्हाला आदर-सन्मानाच्या महिन्यात लढाईविषयी विचारतात. तुम्ही सांगा, त्या महिन्यात लढाई करणे फार मोठे अपराध कर्म आहे. परंतु अल्लाहच्या मार्गात रोखणे, अल्लाहचा इन्कार करणे, मस्जिदे हरामपासून रोखणे आणि तिथल्या रहिवाशांना तिथून बाहेर घालविणे, अल्लाहजवळ त्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे, आणि फितना (फितूर माजवणे) हत्या करण्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे. हे लोक तुमच्याशी लढाई करतच राहतील, येथपर्यंत की त्यांना शक्य झाल्यास तुम्हाला तुमच्या धर्मापासून फिरवतील आणि तुमच्यापैकी जे लोक आपल्या धर्मापासून परत फिरतील आणि त्याच कुप्र (इन्कारी) अवस्थेत मरण पावतील तर त्यांची या जगाची व आखिरतची सर्व कर्मे वाया जातील. हे लोक जहन्नमी असतील आणि नेहमीकरिता जहन्नममध्येच राहतील.

218

२१८. परंतु ज्यांनी ईमान कबूल केले आणि स्थलांतर केले आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद केले (धर्माच्या रक्षणासाठी अल्लाहच्या मार्गात लढले) तेच अल्लाहच्या दया-कृपेची आशा बाळगतात आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

219

२१९. लोक तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. तुम्ही सांगा, या दोन्ही गोष्टींत मोठा गुन्हा आहे. आणि लोकांना यांपासून या जगाचा लाभही होतो, परंतु त्यांचा गुन्हा त्यांच्या फायद्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे, तुम्हाला हेही विचारतात की काय खर्च करावे. तुम्ही सांगा, गरजेपेक्षा जे जास्त असेल ते. अल्लाह अशा प्रकारे आपला आदेश स्पष्टपणे तुम्हाला सांगतो यासाठी की तुम्ही विचार-चिंतन करावे.

220

२२०. ऐहिक आणि मरणोत्तर जीवनाच्या आचरणाला, आणि तुम्हाला अनाथांविषयी विचारतात. त्यांना तुम्ही सांगा की त्यांची भलाई करणेच उत्तम आहे. जर तुम्ही आपले धन त्यांच्या धन-संपत्तीत मिसळून घ्याल तरी ते तुमचे बांधव आहेत. वाईट इरादा राखणारा आणि नेक इरादा राखणारा सर्वांनाच अल्लाह पूर्णपणे जाणतो आणि अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हाला अडचणीत (कष्ट-यातनेत) टाकले असते. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे.

221

२२१. आणि अनेकेश्वरवादी स्त्रियांशी तोपर्यंत विवाह करू नका, जोपर्यंत त्या ईमान स्वीकारत नाहीत. ईमानधारक दासी अनेकेश्वरवादी स्वतंत्र स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे. जरी तुम्हाला आनेकेश्वरवादी स्त्री कितीही चांगली वाटत असली तरीही, आणि ना अनेकेश्वरवादी पुरुषांना आपल्या (ईमानधारक) स्त्रियांशी विवाह करू द्या, जोपर्यंत ते ईमान स्वीकारीत नाही. ईमानधारक गुलाम (मुस्लिम दास) स्वतंत्र (गुलाम नसलेल्या) अनेकेश्वरवादी पुरुषापेक्षा अधिक चांगला आहे, जरी तुम्हाला अनेकेश्वरवादी खूप चांगला वाटत असला तरीही. हे लोक जहन्नमकडे बोलवितात, आणि अल्लाह जन्नतकडे आणि माफीकडे आपल्या हुकूमाने बोलवितो. तो आपल्या निशाण्या लोकांकरिता स्पष्टपणे सांगतो, यासाठी की त्यांनी बोध (उपदेश) प्राप्त करावा.

222

२२२. आणि तुम्हाला मासिक पाळीविषयी विचारतात, सांगा ती घाणेरडी अवस्था आहे. मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांपासून अलग राहा आणि जोपर्यंत त्या पाक (स्वच्छ-शुद्ध) होत नाहीत त्यांच्या जवळ जाऊ नका, मात्र जेव्हा त्या पाक होतील, तेव्हा त्यांच्या जवळ जा, जशी अल्लाहने तुम्हाला अनुमती दिली आहे. निःसंशय, अल्लाह माफी मागणाऱ्याला आणि स्वच्छ-शुद्ध (पाक) राहणाऱ्याला पसंत करतो.

223

२२३. तुमच्या पत्न्या तुमची शेते आहेत. आपल्या शेतांमध्ये वाटेल त्या प्रकारे या आणि स्वतःकरिता (पुण्य) पुढे पाठवा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगत राहा आणि लक्षात असू द्या की अल्लाहशी तुमची भेट होणारच आहे आणि ईमानधारकांना खूशखबर ऐकवा.

224

२२४. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहला आपल्या शपथांसाठी (अशा प्रकारे) निशाना बनवू नका की भलाई आणि दुराचारापासून अलिप्तता आणि लोकांच्या दरम्यान सुधारणा करणे सोडून बसावे.१ आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही ऐकणारा, जाणणारा आहे.

225

२२५. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला तुमच्या त्या शपथांबाबत धरणार नाही, ज्या पक्क्या (मजबूत) नसतील, मात्र तुमची पकड त्या गोष्टीबाबत आहे, जी तुम्ही मनापासून केली आहे, आणि अल्लाह माफ करणारा मोठा सहनशील आहे.

226

२२६. जे लोक आपल्या पत्नीजवळ न जाण्याची शपथ घेतील तर त्यांच्यासाठी चार महिन्यांची मुदत आहे. मग जर ते आपली शपथ मागे घेतील, तर अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

227

२२७. आणि जर तलाक देण्याचाच इरादा करून घ्याल तर सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही ऐकणारा, जाणणारा आहे.

228

२२८. ज्यांना तलाक दिला गेला त्या (घटस्फोटित) स्त्रियांनी स्वतःला तीन मासिक पाळी येईपापर्यंत रोखून ठेवावे. त्यांच्याकरिता हे उचित नव्हे की अल्लाहने त्याच्या उदरात जे निर्माण केले असेल, त्याला लपवावे, जर त्यांचे अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान असेल. त्यांच्या पतीला या मुदतीत, त्यांना परत येण्याचा पूर्ण हक्क आहे, जर त्यांचा इरादा सुधारणा करण्याचा असेल. स्त्रियांचेही तसेच हक्क आहेत, जसे त्यांच्यावर पुरुषांचे भलाईसह आहेत. मात्र पुरुषांना स्त्रियांवर श्रेष्ठता प्राप्त आहे आणि अल्लाह जबरदस्त हिकमत राखणारा आहे.

229

२२९. या प्रकारची तलाक दोन वेळा आहे. मग एकतर भलेपणाने रोखावे किंवा उचित रीतीने सोडून द्यावे आणि तुमच्यासाठी हे योग्य नव्हे की तुम्ही त्यांना जे काही दिले आहे, त्यातून काही परत घ्यावे. मात्र ही गोष्ट वेगळी की दोघांना अल्लाहच्या मर्यादा कायम न राखल्या जाण्याचे भय असेल, यास्तव जर तुम्हाला भय असेल की हे दोघे अल्लाहच्या मर्यादा कायम राखू शकणार नाहीत, तर स्त्रीने सुटका प्राप्त करून घेण्यासाठी काही देऊन टाकावे. यात दोघांवर कसलाही गुन्हा नाही. या अल्लाहने बांधलेल्या सीमा आहेत. सावधान! यांचे उल्लंघन करू नका आणि जे लोक अल्लाहच्या सीमा ओलांडतील, ते अत्याचारी आहेत.

230

२३०. मग जर तिला (तिसऱ्या खेपेस) तलाक दिली गेली तर आता ती स्त्री त्याच्याकरिता हलाल नाही, जोपर्यंत ती स्त्री त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाशी विवाह करून न घेईल. मग जर तोही तलाक देऊन टाकील तर त्या दोघांवर पुन्हा एकत्र येण्यात काही गुन्हा नाही, मात्र त्यांनी हे जाणून घ्यावे की अल्लाहच्या (निर्धारीत) सीमा कायम राखतील. या अल्लाहच्या मर्यादा आहेत, ज्यांना तो जाणणाऱ्यांकरिता सांगत आहे.

231

२३१. आणि जेव्हा तुम्ही स्त्रियांना तलाक द्याल आणि त्या आपली इद्दत (तीन मासिक पाळीपर्यंतचा अवधी) संपविण्याच्या बेतात असतील तर आता त्यांना चांगल्या प्रकारे राखा (नांदवा) किंवा भलेपणाने अलग करा आणि त्यांना हानी पोहचविण्याच्या हेतूने, अत्याचार व अतिरके करण्यासाठी रोखू नका. जो मनुष्य असे करील तर त्याने आपल्या जीवावर जुलूम केला. तुम्ही अल्लाहच्या आदेशाला थट्टा-खेळ बनवू नका आणि अल्लाहची जी कृपा-देणगी (नेमत) तुमच्यावर आहे तिची आठवण करा आणि जे काही ग्रंथ आणि हिकमत त्याने अवतरित केली आहे, ज्याद्वारे तुम्हाला शिकवण देत आहे तिलादेखील, आणि अल्लाहचे भय बाळगून असा आणि लक्षात ठेवा की अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो.

232

२३२. आणि जेव्हा तुम्ही आपल्या स्त्रियांना तलाक द्याल आणि त्या आपली इद्दत पूर्ण करून घेतील, तर त्यांना त्यांच्या पतींशी विवाह करण्यापासून रोखू नका, जेव्हा ते आपसात भलेपणाने राजीखुशी असती. ही शिकवण त्यांना दिली जाते, तुमच्यापैकी ज्यांचा अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर विश्वास आणि ईमान असेल. यात तुमच्यासाठी चांगली शुद्धता- पवित्रता आहे आणि अल्लाह जाणतो, तुम्ही नाही जाणत.

233

२३३. आणि मातांनी आपल्या बाळांना पूर्ण दोन वर्षांपर्यंत दूध पाजावे ज्यांचा इरादा दूध पाजण्याच्या पूर्ण मुदतीचा असेल आणि ज्यांची ती संतती आहे त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांना अन्न-वस्त्र द्यावे. जे भलेपणाने असावे, प्रत्येक माणसाला एवढीच कष्ट-यातना दिली जाते जेवढी त्याच्या अंगी शक्ती असेल. मातेला तिच्या संततीच्या कारणाने किंवा पित्याला त्याच्या मुलाबाळांच्या कारणाने कसलाही त्रास किंवा हानी पोहचिवली जाऊ नये, वारसावरदेखील तशी जबाबदारी आहे, मग जर दोघे (पित-पत्नी) आपल्या होकार आणि एकमेकांच्या इराद्याने दूध सोडवू इच्छित असतील तर दोघांवर काही गुन्हा नाही आणि जर तुम्ही आपल्या बालकांना दूध पाजू इच्छित असाल तरीही तुमच्यावर काही गुन्हा नाही. जेव्हा तुम्ही त्यांना जग रहाटीनुसार त्यांना (जे काही ठरले ते) देऊन टाका. सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगत राहा आणि जाणून असा की अल्लाह तुमचे प्रत्येक कर्म पाहत आहे.

234

२३४. तुमच्यापैकी जे लोक मरण पावतील आणि आपल्या मागे पत्न्या सोडून जातील, तर त्या स्त्रियांनी स्वतःला चार महिने व दहा दिवसांच्या इद्दतमध्ये राखावे. मग जेव्हा त्या, ही मुदत संपवतील तर जे काही भलेपणाने स्वतःसाठी कराल त्यात तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही आणि अल्लाह तुमच्या एक एक कर्माला जाणणारा आहे.

235

२३५. आणि तुमच्यावर या बाबतीतही काही गुन्हा नाही की तुम्ही इशाऱ्याने किंवा नकळतरित्या त्या स्त्रियांशी विवाहाबाबत बोलावे किंवा आपल्या मनात इरादा लपवावा. अल्लाहला चांगले मााहिती आहे की तुम्ही अवश्य त्यांची आठवण कराल. परंतु तुम्ही लपून छपून त्यांच्याशी वायदा करू नका, मात्र ही गोष्ट वेगळी की तुम्ही भलेपणाची एखादी गोष्ट बोलावी आणि जोपर्यंत इद्दतची मुदत पूर्ण होत नाही, विवाहाचे बंधन मजबूत करू नका. लक्षात ठेवा, अल्लाहला तुमच्या मनातल्या गोष्टींचेही ज्ञान आहे. तुम्ही त्याचे भय बाळगत राहा आणि हेही लक्षात ठेवा की अल्लाह मोठा माफ करणारा आणि सहन करणारा आहे.

236

२३६. जर तुम्ही स्त्रियांना हात न लावता आणि महर निर्धारीत न करता तलाक द्याल तर अशाही स्थितीत तुमच्यावर काही गुन्हा नाही, मात्र त्यांना काही न काही फायदा पोहचवा. धनवानाने आपल्या हिशोबाने आणि गरीबाने आपल्या ताकदीच्या हिशोबाने नियमानुसार चांगला फायदा द्यावा. भलाई करणाऱ्यांकरिता हे आवश्यक आहे.

237

२३७. आणि जर तुम्ही स्त्रियांना यापूर्वी तलाक द्याल की तुम्ही त्यांना हात लावला असेल आणि तुम्ही त्यांचा महरही निश्चित केला असेल तर मग ठरलेल्या महरची निम्मी रक्कम (महर) द्या, आता तिने स्वतःच माफ केले तर गोष्ट वेगळी किंवा त्या माणसाने माफ करावे ज्याच्या हाती निकाहचे बंधन आहे. तुमचे हे माफ करणे तकवा (अल्लाहचे भय राखण्या) शी अगदी जवळचे आहे. आणि एकमेकांच्या प्रतिष्ठेला विसरू नका. निःसंशय, अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला पाहत आहे.

238

२३८. नमाजांचे रक्षण करा, विशेषतः मधल्या नमाजची आणि अल्लाहकरिता नम्रतापूर्वक उभे राहात जा.

239

२३९. जर तुम्हाला एखादे भय असेल तर पायी चालत किंवा वाहनावर बसून आणि जर शांतीपूर्ण स्थिती झाल्यास अल्लाहचा महिमा वर्णन करा, ज्या प्रकारे त्याने तुम्हाला या गोष्टीची शिकवण दिली आहे, जी तुम्ही जाणत नव्हते.

240

२४०. आणि तुमच्यापैकी जे मरण पावतील आणि मागे पत्न्या सोडून जातील त्यांनी वसीयत (मृत्युपत्र) करून जावे की त्यांच्या पत्नींनी एक वर्षापर्यंत गुजराण करण्याचा लाभ घ्यावा. त्यांना कोणी घराबाहेर घालवू नये, परंतु जर त्या स्वतः निघून जातील तर तुमच्यावर यात काही गुन्हा नाही, जे ती स्वतःसाठी भलेपणाने करील. अल्लाह तर मोठा जबरदस्त, हिकमतशाली आहे.

241

२४१. आणि तलाक दिल्या गेलेल्या स्त्रियांना चांगल्या प्रकारे फायदा पोहचविणे अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता आवश्यक आहे.

242

२४२. अशा प्रकारे अल्लाह तुमच्यासाठी आपल्या आयती स्पष्टपणे सांगतो, यासाठी की तुम्ही अकलेचा वापर करावा.

243

२४३. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे हजारोंच्या संख्येने मृत्युच्या भयामुळे आपल्या घरांमधून बाहेर पडले. अल्लाहने त्यांना फर्माविले की मरा, आणि नंतर त्यांना जिवंत केले. निःसंशय, अल्लाह लोकांवर मोठा कृपा करणारा आहे, परंतु अधिकांश लोक आभार मानत नाहीत.

244

२४४. आणि अल्लाहच्या मार्गात लढा आणि हे जाणून घ्या की अल्लाह सर्व काही ऐकणारा, जाणणारा आहे.

245

२४५. असा कोण आहे, जो अल्लाहला चांगले कर्ज देईल? ज्यास अल्लाहने अनेक पटींनी जास्त करून प्रदान करावे आणि अल्लाहच कमी-अधिक करतो आणि तुम्ही त्याच्याचकडे दुसऱ्यांदा जाल.

246

२४६. काय तुम्ही मूसानंतरच्या इस्राईली वंशाच्या जमातीस नाही पाहिले, जेव्हा त्यांनी आपल्या पैगंबरास म्हटले की आमच्यावर एखाद्याला बादशहा नेमून द्या, यासाठी की आम्ही अल्लाहच्या मार्गात लढावे. पैगंबर म्हणाले, संभवतः जिहाद फर्ज (अनिवार्य) झाल्यानंतर तुम्ही जिहाद करण्यास इन्कार कराल. लोक म्हणाले, आम्ही अल्लाहच्या मार्गात का नाही लढणार? आम्हाला तर आपल्या घरादारांपासून आणि मुलाबाळांपासून दूर केले गेले आहे. मग जेव्हा त्यांच्यावर जिहाद फर्ज (अनिवार्य) केला गेला तेव्हा काही थोड्या लोकांखेरीज इतर सर्व मुकरले, आणि अल्लाह अत्याचारी लोकांना खूप चांगले जाणतो.

247

२४७. आणि त्यांना त्यांचे पैगंबर म्हणाले, अल्लाहने तालूत (नावाच्या व्यक्ती) ला, तुमचा बादशहा बनविले आहे. तेव्हा ते म्हणू लागले, त्याची राज्य-सत्ता आमच्यावर कशी बरे असू शकते. त्याच्यापेक्षा खूप जास्त राज्य-सत्तेचे हक्कदार तर आम्ही आहोत. त्याला तर विपुल धनही प्रदान केले गेले नाही. पैगंबर म्हणाले, ऐका! सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला तुमच्यावर प्राधान्य दिले आहे आणि त्याला ज्ञान व शारीरिक शक्तीही जास्त प्रदान केली आहे. खरी गोष्ट अशी की अल्लाह ज्याला इच्छितो आपला मुलूख प्रदान करतो. अल्लाह मोठी व्यापकता आणि ज्ञान राखणारा आहे.

248

२४८. त्यांचे पैगंबर पुन्हा त्यांना म्हणाले, त्याच्या मुलूखाची स्पष्ट निशाणी ही आहे की तुमच्याजवळ ती पेटी परत येईल, जिच्या तुमच्या पालनकर्त्यातर्फे मनाच्या शांतीची सामग्री आहे आणि मूसाच्या संततीने व हारूनच्या संततीने आपल्या मागे सोडलेले सामान आहे. फिरश्ते ती पेटी उचलून आणतील. निःसंदेह, ही तर तुमच्यासाठी स्पष्ट निशाणी आहे, जर तुम्ही ईमान बाळगत असाल.

249

२४९. मग जेव्हा तालूत सैन्य घेऊन निघाले तेव्हा म्हणाले, ऐका, एका नदीच्याद्वारे अल्लाहला तुमची कसोटी घ्यायची आहे, तेव्हा जो कोणी त्या नदीतून पाणी पील तो माझा नव्हे आणि जो तिच्यातून पिणार नाही तो माझा आहे. आता ही गोष्ट वेगळी की जो आपल्या हाताने एक ओंजळभर घेईल ( तर हरकत नाही) तथापि काहींच्या खेरीज इतर सर्वांनी पाणी पिऊन घेतले. (हजरत) तालूत जेव्हा नदीला पार करून गेले आणि जे त्यांच्यासोबत ईमानधारक होते, तर ते म्हणाले की आज तर आमच्यात एवढे बळ नाही की जालूत आणि त्याच्या फौजांशी लढावे. परंतु ज्यांना अल्लाहच्या भेटीबाबत पूर्ण विश्वास होता ते म्हणाले, अनेकदा लहानसहान जमात, अल्लाहच्या हुकूमाने भारी भरकम (मोठ्या) जमातीवर विजय प्राप्त करते आणि अल्लाह सबुरी (धीर-संयम) राखणाऱ्यांच्या सोबत आहे.

250

२५०. आणि जेव्हा त्यांचा जालूत आणि त्याच्या सैन्यांशी मुकाबला झाला तेव्हा त्यांनी दुआ (प्रार्थना) केली, ‘‘हे आमच्या पालनहार (अल्लाह)! आम्हाला धीर-संयम प्रदान कर आणि आमचे पाय स्थिर राख आणि इन्कारी जनसमूहाच्या विरोधात आमची मदत कर.’’

251

२५१. यास्तव, अल्लाहच्या हुकूमाने त्यांनी शत्रूला पराभूत केले आणि दाऊदने जालूतला ठार मारले आणि अल्लाहने त्याला राज्य आणि हिकमत तसेच जेवढे इच्छिले ज्ञानही प्रदान केले आणि जर अल्लाह, काही लोकांना इतर समूहाद्वारे हटवित राहिला नसता तर धरतीवर फसाद पसरला असता, परंतु अल्लाह या जगातील लोकांवर फार कृपा करणारा आहे.

252

२५२. या अल्लाहच्या आयती आहेत, ज्या आम्ही तुम्हाला सत्याच्या आधारे वाचवून ऐकवित आहोत आणि निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात.१

253

२५३. हे सर्व रसूल (पैगंबर) आहेत, ज्यांच्यापैकी आम्ही काहींना, काहींवर श्रेष्ठता प्रदान केली आहे. त्यांच्यापैकी काहींशी सर्वश्रेष्ठ अल्लाहने संभाषण केले आहे, आणि काहींचा दर्जा उंचाविला आहे आणि आम्ही मरियमचे पुत्र ईसा यांना चमत्कार (मोजिजा) प्रदान केला आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांना समर्थन दिले१ अल्लाहने इच्छिले असते तर त्यांच्यानंतर आलेले लोक, स्पष्ट निशाण्या येऊन पोहोचल्यावरही आपसात लढले नसते. परंतु त्या लोकांनी मतभेद केला. त्यांच्यापैकी काहींनी ईमान राखले आणि काही काफिर (इन्कारी) झाले आणि अल्लाहने इच्छिले असते तर हे आपसात लढले नसते, परंतु अल्लाह जे काही इच्छितो ते करतो.

254

२५४. हे ईमान राखणाऱ्यांनो! जी काही रोजी आम्ही तुम्हाला दिली आहे, त्यातून खर्च करीत राहा, यापूर्वी की तो दिवस यावा, ज्या दिवशी ना सौदेबाजी, ना दोस्ती आणि ना शिफारस काहीही उपयोगी पडणार नाही आणि सत्याचा इन्कार करणारे लोकच अत्याचारी आहेत.

255

२५५. अल्लाहच सच्चा माबूद (उपासना करण्यायोग्य) आहे, ज्याच्याशिवाय दुसरा कोणीही माबूद नाही, जो जिवंत आहे आणि नेहमी कायम राहणारा आहे, ज्याला ना डुलकी (गुंगी) येते ना झोप. त्याच्या स्वामीत्वात जमीन व आकाशाच्या समस्त चीज वस्तू आहेत. असा कोण आहे, जो त्याच्या आदेशाविना, त्याच्यासमोर शिफारस करू शकेल. तो जाणतो जे काही निर्मितीच्या समोर आहे व जे काही त्यांच्या मागे आहे आणि ते त्याच्या ज्ञानापैकी कोणत्याही गोष्टीला आपल्या अधिकारकक्षेत घेऊ शकत नाही, परंतु जेवढे तो इच्छिल १ त्याच्या सत्ताकेंद्रा (कुर्सी) च्या व्यापकतेने समस्त जमीन व आकाशाला आपल्या अधिकारकक्षेत राखले आहे. या सर्वांचे रक्षण करण्यात तो थकतही नाही, आणि कंटाळतही नाही. तो मोठा आलीशान व मोठा महिमावान आहे.

256

२५६. दीन (धर्मा) च्या संदर्भात कसलीही जोरजबरदस्ती नाही. सत्य, असत्यापासून अलग झाले, यास्तव जो मनुष्य तागूत (अल्लाहशिवाय इतर उपास्यां) ना नाकारून एकमेव अल्लाहवर ईमान राखील, तर त्याने मोठा मजबूत आधार धरला, जो कधीही तुटणार नाही आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह ऐकणारा, जाणणारा आहे.

257

२५७. अल्लाह स्वतः ईमानधारकांचा संरक्षक (वली) आहे. तो त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो आणि काफिरांचे (इन्कारी लोकांचे) मित्र तर सैतान आहेत. ते त्यांना प्रकाशाकडून अंधाराकडे नेतात. हे लोक जहन्नमी आहेत, जे नेहमी त्यातच पडून राहतील.

258

२५८. काय तुम्ही त्याला नाही पाहिले, ज्याने राज्य-सत्ता प्राप्त करून इब्राहीमशी, त्याच्या पालनकर्त्याबाबत भांडण केले. जेव्हा इब्राहीम म्हणाले की, माझा रब (पालनकर्ता) तर तो आहे जो जिवंत करतो आणि मारतो. तो म्हणू लागला, मीदेखील जिवंत करतो आणि मारतो. इब्राहीम म्हणाले, अल्लाह तर सूर्याला पूर्व दिशेकडून उगवतो तू त्याला पश्चिमेकडून उगव. आता मात्र तो काफिर निरुत्तर आणि थक्क झाला आणि अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवित नाही.

259

२५९. किंवा त्या माणसासारखे, ज्याचे जाणे एका वस्तीवरून झाले, जी आपल्या छतासमेत पालथी पडली होती. तो म्हणू लागला, त्याच्या मृत्युनंतर अल्लाह त्याला कशा प्रकारे जिवंत करील, तेव्हा अल्लाहने त्याला शंभर वर्षांकरिता मृत्यु दिला. मग नंतर त्याला (जिवंत करून) उठविले. अल्लाहने विचारले, ‘‘किती काळ तू मेलेल्या अवस्थेत होतास?’’ त्याने उत्तर दिले की एक दिवस किंवा दिवसाचा काही हिस्सा. अल्लाहने फमार्विले, ‘‘किंबहुना तू शंभर वर्षांपर्यंत (मृतावस्थेत) राहिला, मग आता तू आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंकडे पाहा की त्या मुळीच खराब झाल्या नाहीत आणि आपल्या गाढवाकडेही पाहा. आम्ही तुला लोकांकरिता निशाणी बनवितो. तू पाहा की आम्ही कशा प्रकारे हाडे उभी करतो, मग त्यांवर मांस चढवितो.’’ जेव्हा त्याला हे सर्व स्पष्ट करून आले, तेव्हा तो म्हणू लागला, मी चांगले जाणून घेतले की सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा आहे.

260

२६०. आणि जेव्हा इब्राहीम म्हणाले, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मला दाखव की तू मेलेल्याला कशा प्रकारे जिवंत करशील?’’ अल्लाहने फर्माविले, ‘‘काय तुमचे (या गोष्टीवर) ईमान नाही?’’ उत्तर दिले, ‘‘ईमान तर आहे, परंतु अशाने माझ्या मनाला समाधान लाभेल.’’ अल्लाहने फर्माविले, ‘‘चार पक्षी घ्या. त्यांचे तुकडे करून टाका, मग प्रत्येक पर्वतावर त्यांचा एक एक हिस्सा ठेवून द्या, नंतर त्यांना हाक मारा, ते तुमच्या जवळ धावत येतील आणि जाणून असा की अल्लाह मोठा जबरदस्त हिकमत राखणारा आहे.’’

261

२६१. जे लोक अल्लाहच्या मार्गात आपला माल (धन) खर्च करतात, त्यांचे उदाहरण त्या दाण्यासारखे आहे, ज्यातून सात कणसे निघावीत आणि प्रत्येक कणसात शंभर दाणे असावेत आणि अल्लाह ज्याला इच्छिल अनेक पटींनी देईल, आणि अल्लाह मोठा व्यापकता राखणारा आणि ज्ञान राखणारा आहे.

262

२६२. जे लोक आपले धन, अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, मग त्यानंतर उपकार दर्शवित नाही आणि क्लेश-यातनाही देत नाहीत, त्यांचा मोबदला, त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. त्यांना ना कसले भय राहील, ना ते दुःखी-कष्टी होतील.

263

२६३. भली गोष्ट बोलणे आणि माफ करणे त्या दानापेक्षा उत्तम आहे, जे दिल्यानंतर दुःख पोहचविले जावे आणि अल्लाह निस्पृह आणि सहनशील आहे.

264

२६४. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपले दान, उपकार दर्शवून आणि दुःख पोहचवून वाया जाऊ देऊ नका, ज्याप्रमाणे तो मनुष्य, जो आपले धन लोकांना दाखविण्यासाठी खर्च करील आणि ना अल्लाहवर ईमान राखील, ना कयामतवर, तर त्याचे उदाहरण त्या चिकण्या दगडासारखे आहे, ज्याच्यावर थोडीशी माती असावी, मग त्यावर जोराचा पाऊस पडावा, परिणामी पावसाने त्याला अगदी साफ आणि सक्त (कठोर) सोडावे. या देखावा करणाऱ्यांना आपल्या कमाईपासून काहीच हाती लागणार नाही आणि अल्लाह इन्कार करणाऱ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन करीत नाही.

265

२६५. जे लोक आपले धन अल्लाहची मर्जी (प्रसन्नता) प्राप्त करण्याकरिता मनाच्या खुशीने आणि विश्वासाने खर्च करतात, त्यांचे उदाहरण त्या बागेसारखे आहे जी जमिनीच्या उंच भागावर असावी आणि जोरदार पावसाने ती आपली फळे दुप्पट देईल आणि तिच्यावर पाऊस जरी पडला नाही, तरी पावसाचा हलका वर्षावही पुरेसा आहे आणि अल्लाह तुमच्या कर्मांना पाहत आहे.

266

२६६. काय तुमच्यापैकी कोणी असे इच्छितो की त्याच्याजवळ खजूरीच्या आणि द्राक्षांच्या बागा असाव्यात, ज्यात पाण्याचे प्रवाह वाहत असावेत आणि प्रत्येक प्रकारची फळे असावीत आणि बागेचा मालक म्हातारा झालेला असावा, त्याला लहान मुलेही असावीत आणि अचानक त्या बागेवर आगीचे जोरदार वादळ यावे आणि ती जळून खाक व्हावी. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला आपल्या निशाण्या स्पष्टपणे सांगतो, यासाठी की तुम्ही विचार करावा.

267

२६७. हे ईमानधारकांनो! आपल्या (कष्टाच्या) हलाल कमाईमधून आणि जमिनीतून तुमच्यासाठी आम्ही काढलेल्या वस्तूंमधून खर्च करा. त्यांच्यातल्या खराब वस्तू खर्च करण्याचा (देण्याचा) इरादा करू नका, ज्या तुम्ही स्वतः घेणार नाहीत परंतु डोळे मिटून घ्याल तर गोष्ट वेगळी. आणि लक्षात ठेवा अल्लाह निस्पृह आणि प्रशंसनीय आहे.

268

२६८. सैतान तुम्हाला गरीबीचे भय दाखवितो, आणि निर्लज्जतेचा आदेश देतो. आणि अल्लाह तुमच्याशी आपल्या दया-कृपेचा वायदा करतो. अल्लाह मोठा मेहरबान आणि ज्ञानसंपन्न आहे.

269

२६९. तो ज्याला इच्छितो ज्ञान, बुद्धी प्रदान करतो आणि ज्याला बुद्धिमानता प्रदान केली गेली, त्याला फार मोठी भलाई प्रदान केली गेली आणि बोध- उपदेश केवळ बुद्धिमान लोकच ग्रहण करतात.

270

२७०. तुम्ही वाटेल तेवढा खर्च करा (किंवा दान-पुण्य करा) आणि जो काही नवस माना१ अल्लाह ते जाणतो. आणि अत्याचारींचा कोणी सहायक नाही.

271

२७१. जर तुम्ही दान-पुण्य खुलेआमपणे कराल तर तेही चांगले आहे, आणि जर तुम्ही ते गुपचूपपणे गरीबांना द्याल तर हे तुमच्यासाठी सर्वांत अधिक चांगले आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमचे अपराध मिटवील आणि अल्लाहला तुमच्या समस्त कर्मांची खबर आहे.

272

२७२. त्यांना सन्मार्गावर आणणे तुमच्या अवाख्यातील गोष्ट नव्हे, किंबहुना अल्लाह ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो आणि तुम्ही जी चांगली वस्तू अल्लाहच्या मार्गात द्याल, त्याचा लाभ स्वतः प्राप्त कराल. तुम्ही केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता खर्च केला पाहिजे. तुम्ही जे काही धन खर्च कराल, त्याच्या पुरेपूर मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा हक्क मारला जाणार नाही.

273

२७३. दानास पात्र केवळ ते गरीब आहेत, जे अल्लाहच्या मार्गात रोखले गेलेत, जे जमिनीवर फिरू शकत नाहीत. नादान लोक त्यांच्या न मागण्याने त्यांना श्रीमंत समजतात. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यांवरील लक्षणे पाहून त्यांना ओळखून घ्याल. ते लोकांकडून अगदी पाठीशी लागून भिक्षा मागत नाहीत. तुम्ही जे काही धन खर्च कराल, अल्लाह ते जाणणारा आहे.

274

२७४. जे लोक आपले धन रात्रं-दिवस गुपचूपपणे किंवा जाहीरपणे खर्च करतात, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ मोबदला आहे, त्यांना ना कसले भय राहील आणि ना ते दुःखी होतील.

275

२७५. व्याज खाणारे लोक उभे राहणार नाहीत. परंतु तसेच जसा तो मनुष्य उभा राहतो ज्याला सैतान बिलगून वेडसर बनवितो. हे अशासाठी की हे म्हणत असत की व्यापारदेखील व्याजाप्रमाणेच आहे. वास्तविक अल्लाहने व्यापार हलाल (वैध) केला आणि व्याजाला हराम. आणि जो मनुष्य आपल्याजवळ आलेला अल्लाहचा उपदेश ऐकून (व्याज घेण्यापासून) थांबला तर त्याच्यासाठी ते आहे जे होऊन गेले आणि त्याचा मामला अल्लाहच्या सुपूर्द आहे आणि तरीही जो (हरामकडे) परतला, तो जहन्नमी आहे आणि असे लोक नेहमी त्यातच पडून राहतील.

276

२७६. सर्वश्रेष्ठ अल्लाह व्याजाला मिटवितो आणि दानाला वाढवितो आणि अल्लाह एखाद्या कृतघ्न आणि इन्कार करणाऱ्याला मित्र बनवित नाही.

277

२७७. जे लोक ईमानासह (पैगंबरांच्या आचरण शैलीनुसार) काम करतात, नमाजांना कायम करतात आणि जकात अदा करतात त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याच्या जवळ आहे. त्यांना ना कसले भय राहील आणि ना कसले दुःख राहील.

278

२७८. हे ईमान राखणाऱ्यानो! अल्लाहचे भय राखा आणि जे व्याज बाकी राहिले आहे, ते सोडून द्या, जर तुम्ही खरोखरचे ईमानधारक असाल!

279

२७९. जर असे करत नसाल तर अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी लढण्यासाठी तयार व्हा आणि जर माफी मागाल तर तुमचे मुद्दल तुमचेच आहे. ना तुम्ही जुलूम करा आणि ना तुमच्यावर जुलूम केला जावा.

280

२८०. आणि जर कोणी गरीब असेल तर त्याला सवड मिळेपर्यंत वेळ दिली पाहिजे आणि सदका (दान) कराल तर तुमच्यासाठी अधिक चांगले आहे जर तुम्ही जाणत असाल.

281

२८१. आणि त्या दिवसाचे भय बाळगा, ज्या दिवशी तुम्ही सर्व अल्लाहकडे परतविले जाल आणि प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि त्यांच्यावर अत्याचार केला जाणार नाही.

282

२८२. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही आपसात एका ठराविक मुदतीकरिता एकमेकांशी उधार-उसनवारीचा व्यवहार कराल तर लिहून घेत जा आणी लिहणाऱ्याने अपसातला मामला न्यायासह लिहून द्यावा आणि लिहिणाऱ्याने लिहून देण्यास इन्कार करू नये, जसे अल्लाहने त्याला शिकविले आहे तसे त्यानेदेखील लिहून दिले पाहिजे आणि ज्याच्यावर हक्क देणे बंधनकारक आहे त्याने स्वतः सांगून लिहवून घ्यावे आणि आपल्या अल्लाहचे भय राखावे, जो त्याचा पानलकर्ता आहे. आणि हक्क-अधिकारात काहीही घटवू किंवा कमी करू नये, मात्र ज्या माणसावर हक्क बंधनकारक असतील आणि तो नादान असेल किंवा कमजोर असेल किंवा लिहून घेण्याची शक्ती राखत नसेल तर त्याच्यातर्फे त्याच्या कारभारी किंवा वारसदाराने न्यायासह लिहून द्यावे आणि आपल्यामधून दोन पुरुषांना साक्षी करून घ्या. जर दोन पुरुष उपलब्ध नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया ज्यांना तुम्ही साक्षी म्हणून पसंत कराल, अशासाठी की एकीला विसर पडल्यास दुसरीनेे आठवण करून द्यावी. आणि साक्ष देणाऱ्यांनी, जेव्हा त्यांना बोलविले जावे, आले पाहिजे. येण्यास इन्कार करू नये. आणि कर्ज, ज्याची मुदत निश्चित आहे, मग ते लहान असो किंवा मोठे लिहिण्यात आळस करू नका, सर्वश्रेष्ठ अल्लाहजवळ ही गोष्ट फार न्यायसंगत आहे, आणि साक्ष यथायोग्य राखणारी आणि शंका-संवशयापासूनही वाचविणारी आहे. आता ही गोष्ट वेगळी की तो व्यवहार रोख व्यापाराच्या स्वरूपात असेल, जे आपसात देणे-घेणे कराल तर तो न लिहिण्यात तुमच्यावर काही गुन्हा नाही. खरेदी-विक्री करतेवेळीही साक्षीदार ठरवून घेत जा आणि (लक्षात ठेवा) ना तर लिहिणाऱ्याला नुकसान पोहोचविले जावे आणि ना साक्षीदारांना आणि जर तुम्ही असे कराल तर ही तुमची उघड अवज्ञा आहे. अल्लाहचे भय राखा. अल्लाह तुम्हाला ताकीद करत आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा आहे.

283

२८३. आणि जर तुम्ही प्रवासात असाल आणि लिहिणारा आढळला नाही तर तारण गहाण ठेवून व्यवहार करून घ्या आणि जर आपसात एकमेकांवर विश्वास असेल तर ज्याला अनामत दिली गेली आहे, ती त्याने अदा करावी आणि अल्लाहचे भय बाळगून राहावे, जो त्याच्या पालनकर्ता आहे. आणि साक्ष लपवू नका, आणि जो साक्ष लपवील, तो मनाने पापी आहे आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

284

२८४. जमीन आणि आकाशाची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे. तुमच्या मनात जे काही आहे, ते तुम्ही जाहीर करा किंवा लपवा, अल्लाह त्याचा हिशोब घेईल. मग ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल सजा देईल आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

285

२८५. पैगंबरांनी त्यावर ईमान राखले, जे त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे अवतरित केले गेले आणि ईमान राखणाऱ्यांनीही ईमान राखले. या सर्वांनी अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांवर आणि त्याच्या ग्रंथांवर आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखले. त्याच्या पैगंबरांपैकी कोणाच्याही दरम्यान आम्ही फरक करीत नाही. ते म्हणाले की आम्ही ऐकले आणि आज्ञापालन केले. आम्ही तुझ्याजवळ माफी मागतो. हे आमच्या पालनकर्त्या! आणि आम्हाला तुझ्याचकडे परतायचे आहे.

286

२८६. अल्लाह कोणत्याही आत्म्यावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त ओझे टाकत नाही, जे सत्कर्म करील तर त्याचा मोबदला त्याच्यासाठी आहे आणि जे वाईट कर्म करील तर त्याचे संकट त्याच्यावरच आहे. हे आमच्या पालनकर्त्या! जर आम्ही विसरलो किंवा आमच्याकडून चूक झाल्यास आम्हाला त्याच्याबद्दल पकडीत घेऊ नकोस, हे आमच्या पालनकर्त्या! आमच्यावर ते ओझे टाकू नकोस जे आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकले होते. हे आमच्या पालनकर्त्या! आमच्यावर असे ओझे टाकू नकोस जे उचलण्याची आमच्यात शक्ती नसावी आणि आम्हाला माफ कर, आणि आम्हाला माफी प्रदान कर आणि आमच्यावर दया कर. तूच आमचा स्वामी (मालक) आहेस. आम्हाला काफिर (इन्कारी) जनसमूहावर विजय प्रदान कर.