All Islam Directory
1

१. आलिफ. लाम. मीम. सॉद .

2

२. हा एक ग्रंथ आहे, जो तुमच्याकडे अवतरित केला गेला, यासाठी की याद्वारे सचेत करण्यात तुमच्या मनात संकोच निर्माण होऊ नये, आणि ईमान राखणाऱ्यांकरिता बोध आहे.

3

३. जे (धर्मविधान) तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले, त्याचे अनुसरण करा आणि त्याच्याखेरीज इतर दोस्तांचे अनुसरण करू नका. तुम्ही लोक फार कमी बोध प्राप्त करता.

4

४. आणि कित्येक वस्त्या आम्ही नष्ट करून टाकल्या आणि त्यांच्यावर आमचा अज़ाब रात्रीच्या वेळी पोहोचला किंवा अशा स्थितीत की ते दुपारच्या वेळी आराम करीत होते.

5

५. तर जेव्हा त्यांच्याजवळ आमचा अज़ाब आला, तेव्हा त्यांची ओरड फक्त हीच राहिली की ते म्हणाले, आम्हीच अत्याचारी राहिलोत.

6

६. मग आम्ही त्यांना अवश्य विचारू ज्यांच्याजवळ संदेश पाठविला गेला आणि पैगंबरांनाही अवश्य विचारू.१

7

७. मग आम्ही त्यांच्यासमोर ज्ञानासह निवेदन करू, आणि आम्ही गाफील नव्हतो.

8

८. आणि त्या दिवशी ठीक वजन होईल, मग ज्याचे पारडे जड राहील, तर असेच लोक सफल होतील.

9

९. आणि ज्याचे पारडे हलके असेल तर हे असे लोक असतील, ज्यांनी आपले नुकसान स्वतःच करून घेतले, या कारणाने की आमच्या आयतींशी ते जुलूम करीत होते.

10

१०. आणि आम्ही तुम्हाला धरतीत राहण्याचे स्थान दिले आणि त्यात तुमच्यासाठी जीवनसामुग्री निर्माण केली. तुम्ही फार कमी आभार मानता.

11

११. आणि आम्ही तुम्हाला निर्माण केले, मग तुमचे रूप घडविले, मग आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला कारण तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही.

12

१२. (अल्लाहने) फर्माविले, जेव्हा मी तुला सजदा करण्याचा आदेश दिला, तेव्हा कोणत्या कारणाने तुला सजदा करण्यापासून रोखले. तो म्हणाला, मी याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले आहे.

13

१३. (अल्लाहने) आदेश दिला की तू आकाशातून खाली उतर, आकाशात राहून घमेंड करण्याचा तुला काहीच हक्क नाही. तेव्हा चल निघ. निःसंशय तू धिःक्कारलेल्यांपैकी आहेस.

14

१४. (सैतान) म्हणाला, मला (कयामतपर्यंत) संधी प्रदान कर, जेव्हा लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील.

15

१५. (अल्लाहने) फर्माविले, तुला ती संधी प्रदान केली गेली.

16

१६. (सैतान) म्हणाला, तू मला धिःक्कारल्यामुळे मी त्यांच्यासाठी तुझ्या सरळ मार्गावर बसेन.

17

१७. मग त्यांच्या समोरून आणि पाठीमागून आणि उजव्या व डाव्या बाजूने हल्ला करीन आणि तुला यांच्यात अधिकांश लोक कृतज्ञशील आढळणार नाहीत.

18

१८. (अल्लाहने) फर्माविले, तू यापासून (येथून) अपमानित होऊन निघून जा जे त्यांच्यापैकी तुझ्या मार्गावर चालतील तर मी तुम्हा सर्वांनी जहन्नमला भरून टाकीन.

19

१९. आणि (आम्ही फर्माविले की) हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा, मग जिथून इच्छा होईल तिथून खा, आणि त्या झाडाच्या जवळ जाऊ नका अन्यथा अत्याचारी ठराल.

20

२०. मग सैतानाने दोघांच्या मनात कुविचार निर्माण केला, यासाठी की दोघांच्या वर त्यांची लज्जास्थाने उघड करावीत आणि सांगितले की तुम्हा दोघांच्या पालनकर्त्याने तुम्हाला या झाडापासून अशासाठी रोखले आहे की तुम्ही दोघे फरिश्ते व्हाल किंवा सदैवकाळ राहणारे व्हाल.

21

२१. त्याने (सैतानाने) त्या दोघांच्या समोर शपथ घेतली की, मी तुम्हा दोघांचा शुभचिंतक आहे.

22

२२. अशा प्रकारे धोकेबाजीने दोघांना खाली आणले, मग त्या दोघांनी झाडाचा स्वाद घेताच, दोघांवर त्यांची गुप्तांगे उघड झाली आणि ते आपल्यावर जन्नतची पाने चिकटवू लागले, आणि त्यांच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने दोघांना पुकारले की काय मी तुम्हा दोघांना या झाडापासून रोखले नव्हते? आणि तुम्हाला सांगितले नव्हते की सैतान तुमचा खुला शत्रू आहे.

23

२३. दोघे म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही स्वतःवर जुलून करून घेतला आणि जर तू आम्हाला माफ केले नाही आणि आमच्यावर दया केली नाही तर आम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी होऊ.

24

२४. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही खाली उतरा. तुम्ही आपसात वैरी आहात आणि तुम्हाला एक अवधीपर्यंत धरतीत राहावयाचे आणि लाभ प्राप्त करून घ्यायचे आहे.

25

२५. फर्माविले की तुम्ही त्यातच जीवन व्यतीत कराल आणि त्यातच मरण पावाल आणि त्यातूनच बाहेर काढले जाल.

26

२६. हे आदमच्या पुत्रांनो! आम्ही तुम्हाला असे वस्त्र प्रदान केले जे तुमच्या लज्जास्थानांना झाकेल आणि शोभा देईल आणि सर्वांत उत्तम वस्त्र, अल्लाहच्या भयाचे वस्त्र आहे. ही अल्लाहची निशाणी आहे यासाठी की यांनी स्मरण राखावे.

27

२७. हे आदमच्या पुत्रांनो! तुम्हाला सैतानाने बहकवून न द्यावे, जसे तुमच्या माता-पित्याला जन्नतमधून बाहेर घालिवले. त्याने त्यांचे वस्त्र उतरवून दिले, यासाठी की त्यांना त्यांची गुप्तांगे दाखवावीत. निःसंशय तो आणि त्याचे जातीबांधव तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना अशा लोकांचे मित्र बनविले, जे ईमान (विश्वास) राखत नाही.१

28

२८. आणि ते जेव्हा एखादे दुष्कर्म करतात, तेव्हा म्हणतात की आम्हाला आमचे पूर्वज यावरच आढळून आलेत आणि अल्लाहने आम्हाला याचा आदेश दिला आहे. तुम्ही सांगा की अल्लाह वाईट कामाचा आदेश देत नाही. काय तुम्ही अल्लाहसंबंधी अशा गोष्टी करता ज्या तुम्ही जाणत नाहीत.

29

२९. (हे पैगंबर!) तुम्ही सांगा, माझ्या पालनकर्त्याने मला न्यायाचा आदेश दिला आहे आणि प्रत्येक सजदा करतेवेळी आपला चेहरा सरळ दिशेत करून घ्या आणि त्या (अल्लाह) करिता दीन (धर्म) सच्चा मनाने स्वीकारून त्याला पुकारा. त्याने जसे तुम्हाला सुरुवातीला निर्माण केले, त्याच प्रकारे दुसऱ्यांदाही निर्माण करील.

30

३०. आणि त्या (अल्लाह) ने काहींना सन्मार्ग दाखविला तर काही मार्गभ्रष्टतेस पात्र ठरले. त्यांनी अल्लाहच्या खेरीज सैतानांना आपला मित्र बनविले आणि असे समजतात की ते मार्गदर्शन प्राप्त केलेले लोक आहेत.

31

३१. हे आदमच्या पुत्रांनो! प्रत्येक वेळी मस्जिदीत जाताना आपले वस्त्र (पोषाख) घालत जा आणि खा व प्या आणि उधळपट्टीने खर्च करू नका. निःसंशय अमर्याद खर्च करणाऱ्यांशी अल्लाह प्रेम राखत नाही.

32

३२. (हे पैगंबर!) तुम्ही सांगा की त्या शोभा-सजावटीला कोणी हराम केले आहे, जिला अल्लाहने आपल्या दासांकरिता निर्माण केले आहे आणि पाक (स्वच्छ-शुद्ध) रोजीला. तुम्ही सांगा की हे ऐहिक जीवनात त्या लोकांसाठी आहे ज्यांनी ईमान राखले (आणि) विशेषतः कयामतच्या दिवशी त्याच लोकांकरिता आहे. आम्ही अशा प्रकारे आयतींचे सविस्तर वर्णन कतो, त्यांच्यासाठी, जे ज्ञान बाळगतात.

33

३३. तुम्ही सांगा की माझ्या पालनकर्त्याने सर्व प्रकट-अप्रकट स्वरूपाच्या निर्लज्जतेच्या गोष्टींना हराम केले आहे. आणि अपराध व नाहक जुलूम करण्यास,१ आणि अल्लाहसोबत अशाला सहभागी करण्यास, ज्याची त्याने कसलीही सनद उतरविली नाही आणि अल्लाहसंबंधी माहीत नसलेल्या गोष्टी बोलण्यास.

34

३४. आणि प्रत्येक उम्मत (जनसमूह) चा एक निर्धारीत अवधी आहे, मग जेव्हा त्यांची ठरलेली वेळ पूर्ण होईल, तेव्हा ना एक क्षण विलंब होईल, ना पुढे जाईल.

35

३५. हे आदमच्या पुत्रांनो! जर तुमच्याजवळ तुमच्यामधूनच माझे रसूल (पैगंबर) येतील, जे तुमच्यासमोर माझ्या आयतींचे निवेदन करतील तर जो अल्लाहचे भय राखून वागेल आणि आपले आचरण सुधारेल तर अशा लोकांना ना कसले भय राहील, आणि ना तो दुःखी होतील.

36

३६. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि त्यांच्याशी घमेंड केली तेच जहन्नमी आहेत. तेच त्यात सदैव राहतील.

37

३७. त्याहून मोठा अत्याचारी कोण आहे ज्याने अल्लाहवर असत्य रचले किंवा त्याच्या आयतींना खोटे ठरविले, यांना ग्रंथापासून ठरलेला हिस्सा पोहोचेल, येथेपर्यंत की जेव्हा त्यांच्याजवळ आमचे फरिश्ते, त्यांचे प्राण काढण्यासाठी येतील, तेव्हा म्हणतील की ते कोठे आहेत, ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारत राहिले? ते म्हणतील, आमच्यापासून हरवलेत आणि स्वतः काफिर (अधर्मी) असण्याचे स्वतःच कबूल करतील.

38

३८. तो (अल्लाह) फर्माविल, दाखल व्हा जहन्नममध्ये, जिन्न आणि मानवांच्या समूहांसोबत, जे तुमच्यापूर्वी होऊन गेलेत. जेव्हा एखादा समूह दाखल होईल, तेव्हा दुसऱ्या समूहाचा धिःक्कार करील.येथेपर्यंत की जेव्हा त्या (जहन्नम) मध्ये सर्वजण जमा होतील तेव्हा नंतरचे लोक आपल्या अगोदर गेलेल्यांविषयी म्हणतील की, हे आमच्या पालनकर्त्या! यांनीच आम्हाला मार्गभ्रष्ट केले. तू यांना जहन्नमची दुप्पट शिक्षा दे. (अल्लाह) फर्माविल की सर्वांसाठी दुप्पट शिक्षा आहे, परंतु तुम्ही जाणत नाही.

39

३९. आणि अगोदर गेलेले लोक, नंतरच्या लोकांना म्हणतील की आमच्यावर तुम्हाला कसलीही श्रेष्ठता नाही, यास्तव तुम्हीदेखील आपल्या कर्मापायी अल्लाहच्या शिक्षेचा आनंद घ्या.

40

४०. निःसंशय, ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि त्यांच्याशी घमेंड केली, त्यांच्यासाठी आकाशाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत आणि ते जन्नतमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत, जोपर्यंत उंट, सूईच्या छिद्रात दाखल होत नाही आणि आम्ही अपराधी लोकांना असाच मोबदला देतो.

41

४१. त्यांच्यासाठी जहन्नमच्या आगीचे अंथरुण असेल आणि त्यांच्यावर त्याचेच पांघरुण असेल आणि अत्याचारी लोकांना आम्ही अशीच सजा देतो.

42

४२. आणि ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत तर आम्ही कोणत्याही जीवाला, त्याच्या कुवतीनुसारच उत्तरदायित्व सोपवितो. हेच लोक जन्नती आहेत. हेच त्यात सदैव राहतील.

43

४३. आणि आम्ही त्यांच्या मनातले कपट दूर करू, त्यांच्याखाली नद्या वाहत असतील आणि ते म्हणतील, अल्लाहकरिता सर्व प्रशंसा आहे, ज्याने आम्हाला याच्या मार्गावर लावले जर त्याने मार्गदर्शन केले नसते तर आम्ही स्वतः सन्मार्गास लागलो नसतो. निःसंशय, आमच्या पालनकर्त्याचे रसूल (पैगंबर) सत्यासह आले आणि त्यांना पुकारून सांगितले जाईल की आपल्या कर्मांच्या मोबदल्यात तुम्ही या जन्नतचे हक्कदार बनविले गेले.

44

४४. आणि जन्नती लोक, जहन्नमी लोकांना हाक देऊन सांगतील की आम्हाला आपल्या पालनकर्त्याचा वायदा, जो आम्हाला देण्यात आला, खरा आढळला तर काय तुम्हाला, तुमच्या पालनकर्त्याने केलेला वायदा खरा आढळला? ते म्हणतील, होय! मग एक ऐलान करणारा त्यांच्या दरम्यान ऐलान करील की अल्लाहतर्फे धिःक्कार असो अत्याचारी लोकांवर.

45

४५. जे आपल्या पालनकर्त्याच्या मार्गापासून रोखू इच्छितात आणि त्याला वाकडे करू इच्छितात आणि ते आखिरतचाही इन्कार करतात.

46

४६. आणि त्या दोघांच्या दरम्यान एक आड पडदा असेल आणि आराफ (उंचवट्या) वर काही माणसे असतील जे प्रत्येकाला त्यांच्या निशाणांवरून ओळखून घेतील, आणि जन्नती लोकांना हाक देऊन सांगतील की तुमच्यावर सलामती असो, ते त्या (जन्नत) मध्ये अजून दाखल झाले नसतील आणि तिची आशा बाळगत असतील.

47

४७. आणि जेव्हा त्यांची दृष्टी जहन्नमी लोकांवर पडेल तेव्हा म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला अत्याचारी लोकांत सामील करू नको.

48

४८. आणि आराफवाले काही लोकांना, ज्यांना त्यांच्या चिन्हांवरून ओळखत असतील, हाक मारून सांगतील की तुमची जमात आणि तुमची घमेंड तुमच्या उपयोगी पडली नाही.

49

४९. काय हेच ते लोक होत ज्यांच्याविषयी तुम्ही जोर देऊन शपथपूर्वक सांगत होते की यां (जन्नती लोकां) च्या वर अल्लाहची दया कृपा होणार नाही. (त्यांना सांगितले जाईल) की जन्नतमध्ये प्रवेश करा. तुमच्यावर कसलेही भय नाही आणि ना तुम्ही दुःखी व्हाल.

50

५०. आणि जहन्नमवाले जन्नतच्या लोकांना हाक देतील की आमच्यावर थोडे पाणी टाका किंवा अल्लाहने जी रोजी (आजीविका) तुम्हाला प्रदान केली आहे त्यातून थोडेसे द्या. ते म्हणतील, अल्लाहने या दोन्ही वस्तू इन्कारी लोकांकरिता हराम केल्या आहेत.

51

५१. ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला मनोरंजन आणि खेळ-तमाशा बनविले आहे आणि ज्यांना ऐहिक जीवनाने धोक्यात टाकले यास्तव आज आम्ही त्यांचा विसर पाडू ज्याप्रमाणे ते या दिवसाला विसरले होते आणि आमच्या आयतींचा इन्कार करीत राहिले.

52

५२. आणि आम्ही त्यांच्याजवळ ज्ञानावर आधारीत एक ग्रंथ सविस्तर वर्णनासह पाठविला आहे जो मार्गदर्शन आणि दया आहे त्या लोकांकरिता जे ईमान राखतात.

53

५३. काय ते याच्या अंतिम निर्णयाची वाट पाहात आहे? ज्या दिवशी याचा अंतिम निर्णय येऊन पोहोचेल, तर ज्या लोकांनी यापूर्वी याचा विसर पाडला, ते म्हणतील की आमच्या पालनकर्त्याचे रसूल (पैगंबर) सत्य घेऊन आले, तर काय कोणी आमची शिफारस करणारा आहे, ज्याने आमच्यासाठी शिफारस करावी? किंवा आम्हाला दुसऱ्यांदा (जगात) पाठविले गेले असते, तर त्याखेरीज कर्म केले असते, जे (पूर्वी) करीत राहिलो. त्यांनी स्वतःला नुकसानग्रस्त केले आणि ज्या गोष्टी मनाने रचत राहिले, त्यांच्यापासून हरवल्या.

54

५४. निःसंशय तुमचा स्वामी व पालनहार अल्लाहच आहे, ज्याने आकाशांना व जमिनीला सहा दिवसांत बनविले, आणि मग अर्श (सिंहासना) वर उच्च स्थिर झाला. तो रात्रीला दिवसाने अशा प्रकारे लपवितो की ती त्याला द्रुत गतीने येऊन धरते आणि सूर्य व चंद्र आणि ताऱ्यांना कामास ठेवले कारण ते त्याच्या हुकूमाधीन आहेत. ऐका, त्याचीच निर्मिती आणि आदेशही त्याचाच आहे. समस्त विश्वाचा पालनकर्ता मोठा बरकतवाला (समृद्धशाली) आहे.

55

५५. आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) ला नम्रतापूर्वक आणि हळू आवाजातही पुकारत जा. अल्लाह मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.

56

५६. आणि धरतीत सुधारणा झाल्यानंतर बिघाड निर्माण करू नका, आणि भय व आशेसह त्याची उपासना करा. निःसंशय अल्लाहची दया नेक सदाचारी लोकांच्या निकट आहे.

57

५७. आणि तोच अल्लाह आहे जो आपल्या दयेने प्रथम शुभ समाचारासाठी वाऱ्यांना पाठवितो, येथेपर्यंत की जेव्हा ते जड ढगांना लादून येतात तेव्हा आम्ही त्यांना एखाद्या कोरड्या जमिनीच्या दिशेने हांकतो, मग त्याद्वारे पाण्याचा वर्षाव करतो, मग त्याद्वारे प्रत्येक प्रकारची फळे काढतो. आम्ही अशाच प्रकारे मेलेल्यांना बाहेर काढू यासाठी की तुम्ही विचार चिंतन करावे.

58

५८. आणि चांगली (पाक) जमीन आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने आपली रोपटे (पीक) उगवते आणि खराब जमीन फार कमी उगवते अशा प्रकारे आम्ही निशाण्यांचे अनेक प्रकारे वर्णन करतो, त्या लोकांकरिता जे कृतज्ञता व्यक्त करतात.

59

५९. आम्ही नूह (अलैहिस्सलाम) यांना त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले तेव्हा ते म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करता. त्याच्याखेरीज तुमचा दुसरा कोणीही उपास्य (माबूद) नाही. निःसंशय मला तुमच्याबद्दल मोठ्या दिवसाच्या शिक्षा-यातनेचे भय वाटते.

60

६०. त्यांच्या जनसमूहाचे सरदार म्हणाले, तुम्ही आम्हाला उघड अशा मार्गभ्रष्टतेत दिसत आहात.

61

६१. नूह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी मार्गभ्रष्ट नाही. तथापि समस्त विश्वाच्या पालनकर्त्याचा पैगंबर आहे.

62

६२. तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचा संदेश पोहचवितो आणि तुमच्या भल्याचे करीत आहे आणि अल्लाहतर्फे ते ज्ञान बाळगतो जे ज्ञान तुम्ही बाळगत नाही.

63

६३. काय तुम्हाला आश्चर्य वाटते की तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याच जनसमूहाच्या एका माणसावर एखादी बोधपूर्ण गोष्ट येते, यासाठी की तुम्हाला सचेत करावे आणि तुम्ही अल्लाहचे भय राखून वागावे यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.

64

६४. तर त्यांनी नूहला खोटे ठरविले, मग आम्ही नूह आणि त्यांच्या अनुयायींना नौकेत वाचविले आणि ज्यांनी आमच्या आयतींचा (निशाण्यांचा) इन्कार केला, त्यांना बुडवून टाकले. निःसंशय तो एक आंधळा जनसमूह होता.

65

६५. आणि आद जनसमूहाकडे त्यांचा भाऊ हूद यांना (पैगंबर म्हणून) पाठविले. ते म्हणाले, हे माझ्या जाती-बांधवानो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. काय तुम्ही भित नाही?

66

६६. त्यांच्या जनसमूहाने काफिर सरदार म्हणाले, आम्हाला तुम्ही मूर्ख आहात असे वाटते. खात्रीने आम्ही तुम्हाला खोट्यांपैकी समजतो.

67

६७. हूद म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी मूर्ख नाही, परंतु साऱ्या जगाच्या पालनकर्त्याचा रसूल (पैगंबर) आहे.

68

६८. मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचा संदेश पोहचवितो, आणि तुमचा प्रामाणिक हितचिंतक आहे.

69

६९. काय तुम्हाला आश्चर्य वाटते की तुमच्या पालनकर्त्यातर्फे एखादी बोधपूर्ण गोष्ट तुमच्यातल्याच एका माणसाजवळ आली आहे, यासाठी की त्याने तुम्हाला सचेत करावे. स्मरण करा, जेव्हा अल्लाहने तुम्हाला नूहच्या जनसमूहानंतर त्यांच्या जागी केले आणि तुमचा शरीर-बांधा अधिक वाढविला, यास्तव तुम्ही अल्लाहच्या कृपा देणग्यांचे स्मरण करा यासाठी की सफल व्हावे.

70

७०. जनसमूहाचे लोक म्हणाले, काय तुम्ही आमच्याजवळ एवढ्यासाठी आला आहात की आम्ही फक्त एक अल्लाहची उपासना करावी आणि आपल्या वाडवडिलांच्या उपास्य दैवतांचा त्याग करावा.१ तेव्हा ज्या गोष्टीची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, ती आणा जर तुम्ही सच्चे असाल.

71

७१. हूद म्हणाले, तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्यावर शिक्षा आणि प्रकोप येऊनच पोहचला. काय तुम्ही माझ्याशी काही अशा नावांविषयी वाद घालता, जे तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवून घेतलेत ज्यांचे कसलेही प्रमाण अल्लाहने उतरविले नाही. तुम्ही प्रतिक्षा करा. तुमच्यासोबत मीदेखील प्रतिक्षा करतो.

72

७२. तेव्हा आम्ही त्यांना आणि त्यांच्या अनुयायींना आपल्या दयेने वाचवून घेतले आणि त्या लोकांची मुळे कापून टाकली, ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि ते ईमानधारक नव्हते.

73

७३. आणि समूदकडे त्यांचा भाऊ सॉलेह (पाठविले). सॉलेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही माबूद (उपास्य) नाही. तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे प्रमाण येऊन पोहोचले. ही अल्लाहची सांडणी तुमच्याकरिता निशाणी आहे, तिला अल्लाहच्या धरतीत खाण्या (चरण्या) साठी सोडून द्या. तिला वाईट इराद्याने हात लावू नका, अन्यथा दुःखदायक अज़ाब तुम्हाला येऊन धरेल.

74

७४. आणि तुम्ही त्या अवस्थआंचे स्मरण करा जेव्हा (अल्लाहने) तुम्हाला आद (जनसमूहा) नंतर खलीफा बनविले आणि या धरतीत तुम्हाला राहण्याची जागा दिली. तुम्ही समतल जमिनीवर घरे बनविता आणि पर्वतांना कोरून घर बनविता, तेव्हा अल्लाहच्या कृपा देणग्यांचे स्मरण करा आणि धरतीत फसाद (उत्पात) माजवित फिरू नका.

75

७५. त्याच्या जनसमूहाचे घमेंडी सरदार म्हणाले, आपल्या कमजोर- दुबळ्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले होते, काय तुमचा पक्का विश्वास आहे की सॉलेह आपल्या पालनकर्त्यातर्फे पाठविले गेले आहेत. ते म्हणाले की आम्ही त्यावर ईमान राखतो, ज्यासह त्यांना पाठविले गेले आहे.

76

७६. गर्विष्ठ सरदार म्हणाले, तुम्ही ज्याच्यावर ईमान राखता, आम्ही ईमान राखत नाही.

77

७७. यास्तव सांडणीला त्यांनी ठार मारले, आणि आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि म्हणाले, हे सॉलेह ! जर तुम्ही पैगंबर असाल तर आपली धमकी पूर्ण करा.

78

७८. तर त्यांना भूकंपाने घेरून टाकले आणि ते आपल्या घरांमध्ये पालथे पडून राहिले.

79

७९. सॉलेह त्यांच्यापासून तोंड फिरवून निघून गेले आणि म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचा आदेश पोहचविला आणि तुमचा हितचिंतक राहिलो परंतु तुम्ही हितचिंतकांशी प्रेम राखत नाहीत.

80

८०. आणि (आम्ही) लूतला (पाठविले) जेव्हा ते आपल्या लोकांना म्हणाले, की तुम्ही असे वाईट कृत्य करता, जे तुमच्यापूर्वी साऱ्या जगात कोणीही केले नाही.

81

८१. तुम्ही पुरुषांशी संभोग करता, स्त्रियांना सोडून, किंबहुना तुम्ही तर मर्यादा पार केली आहे.

82

८२. आणि त्यांच्या जनसमूहाला काही उत्तर देता आले नाही याखेरीज की आपसात म्हणू लागले की या लोकांना वस्तीबाहेर घालवा. हे मोठे पाक साफ (सत्शील, पवित्र) बनतात.

83

८३. जेव्हा आम्ही त्यांना (लूतला) आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचविले त्यांच्या पत्नीखेरीज, कारण ती त्याच लोकांपैकी राहिली, जे (अज़ाबग्रस्त) राहिलेत.

84

८४. आणि आम्ही त्यांच्यावर एक नवीन प्रकारचा पाऊस पाडला तेव्हा बघा तरी, त्या अपराध्यांचा कसा शेवट झाला!

85

८५. आणि (आम्ही) मदयनकडे त्यांचे भाऊ शोऐब यांना पाठविले. शोऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही माबूद नाही तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याजवळ स्पष्ट निशाणी येऊन पोहोचली आहे. तेव्हा तुम्ही माप तोल पुरेपूर करीत जा, आणि लोकांना त्यांच्या चीज-वस्तू कमी करून देऊ नका आणि साऱ्या धरतीवर, सुधारणा केली गेल्यानंतर फसाद (उत्पात-उपद्रव) पसरवू नका. हे तुमच्यासाठी लाभदायक आहे जर तुम्ही ईमान राखाल.

86

८६. आणि तुम्ही प्रत्येक रस्त्यावर त्यांना धमकी देण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखण्यासाठी, ज्यांनी अल्लाहवर ईमान राखले, बसू नका आणि त्यात चूका शोधत, आणि स्मरण करा जेव्हा तुम्ही संख्येने कमी होते, अल्लाहने तुम्हाला जास्त केले मग पाहा उत्पाती लोकांचा शेवट कसा झाला.

87

८७. आणि जर तुमच्यापैकी काही लोकांनी त्या आदेशावर ईमान राखले, ज्यासह मला पाठविले गेले आहे आणि काहींनी ईमान राखले नाही तर थोडा धीर-संयम राखा. येथेपर्यर्ंत की अल्लाहने आमच्या दरम्यान फैसला करावा आणि तो सर्वांत उत्तम फैसला करणारा आहे.

88

८८. त्यांच्या जनसमूहाचे घमेंडी अहंकारी सरदार म्हणाले, हे शोऐब! आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सोबतच्या ईमान राखणाऱ्यांना अवश्य आपल्या नगरातून बाहेर घालवू अन्यथा तुम्ही परत आमच्या धर्मात या. ते म्हणाले, काय आम्हाला त्याचा किळस येत असला तरीही?

89

८९. (असे केल्यास) आम्ही तर अल्लाहवर खोटा आरोप ठेवू जर तुमच्या धर्मात परतून आलो. वास्तविक अल्लाहने आम्हाला त्यातून मुक्त केले आहे आणि आमच्यासाठी त्यात पुन्हा परतणे शक्य नाही, परंतु हे की अल्लाह जर इच्छिल, जो आमचा स्वामी, पालनकर्ता आहे. आमच्या पालनकर्त्याने प्रत्येक गोष्टीस आपल्या ज्ञानाने घेरून ठेवले आहे. आम्ही आपल्या अल्लाहवरच भरोसा केला आहे. हे आमच्या पालनकर्त्या! आमच्या आणि आमच्या लोकांच्या दरम्यान फैसला कर सत्यासह आणि तू सर्वांत उत्तम फैसला करणारा आहे.

90

९०. आणि त्यांच्या जनसमूहाच्या इन्कारी सरदारांनी म्हटले की जर तुम्ही शोऐबचे अनुसरण केले तर नुकसान भोगणाऱ्यांपैकी व्हाल.

91

९१. तर त्यांना भूकंपाने येऊन घेरले, यास्तव ते आपल्या घरांमध्ये पालथे पडून राहिले.

92

९२. ज्यांनी शोऐबला खोटे ठरविले, त्यांची अशी अवस्था झाली की जणू त्या (घरां) मध्ये कधी राहतच नव्हते. झ्यांनी शोऐबला खोटे ठरविले, ते लोक हानिग्रस्त झाले.

93

९३. त्या वेळी शोऐब त्यांच्याकडून तोंड फिरवून निघून गेले आणि म्हणाले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी आपल्या पालनकर्त्याचा संदेश तुमच्यापर्यंत पोहचविला आणि मी तुमचे हितचिंतन केले, मग मी त्या इन्कारी लोकांबद्दल दुःखी का व्हावे?

94

९४. आणि आम्ही जेव्हादेखील एखाद्या वस्तीत पैगंबर पाठविला, तर तिथल्या लोकांना आम्ही रोगराई आणि कष्ट यातनेत जरूर टाकले, यासाठी की त्यांनी (लाचार होऊन) गयावया करावी.

95

९५. मग आम्ही त्या दरिरद्रतेला संपन्न अवस्थेने बदलून टाकले, येथपर्यंत की जेव्हा ते सुखसंपन्न झाले आणि म्हणू लागले की आमच्या वाडवडिलांनाही चांगल्या-वाईट स्थितीशी सामना करावा लागला, तेव्हा आम्ही अकस्मात त्यांना पकडीत घेतले आणि ज्यांना कळालेसुद्धा नाही.

96

९६. आणि जर त्या शहरांच्या रहिवाशींनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे भय राखून आचरण केले असते तर आम्ही त्यांच्याकरिता आकाश व जमिनीच्या समृद्धीचे दरवाजे उघडले असते. परंतु त्यांनी खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या दुराचारापायी धरले.

97

९७. काय तरीही या वस्त्यांचे रहिवाशी या गोष्टीपासून निश्चिंत झाले की त्यांच्यावर आमचा अज़ाब रात्रीच्या वेळी येऊन कोसळावा, ज्या वेळी ते झोपेत असावेत.

98

९८. आणि काय त्या वस्त्यांचे रहिवाशी या गोष्टीपासून बेफिकीर झाले आहेत की त्यांच्यावर आमचा अज़ाब दिवस चढता यावा, ज्या वेळी ते खेळ-तमाशात मग्न असावेत.

99

९९. काय ते अल्लाहच्या योजनेपासून निडर झालेत? तर अल्लाहच्या योजनेपासून नुकसान भोगणारेच निडर होतात.१

100

१००. तर काय जे लोक धरतीत, तिच्या रहिवाशांच्या विनाशानंतर वारस बनले आहेत, त्यांना हे माहीत झाले नाही की जर आम्ही इच्छिले तर त्यांच्या अपराधांपायी त्यांना संकटात टाकू आणि त्यांच्या मनांवर मोहर लावू मग ते ऐकू न शकावेत.

101

१०१. या शहरांच्या काही घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि त्यांचे पैगंबर त्यांच्याजवळ प्रमाणासह आले, तरीही ज्याला त्यांनी अगोदर मानले नाही त्याला नंतर मानण्यायोग्य झाले नाहीत. अशा प्रकारे अल्लाह इन्कारी लोकांच्या हृदयांवर मोहर लावून देतो.

102

१०२. आणि आम्हाला त्यांच्यातले अधिकांश लोक वचनाचे पालन करताना आढळले नाहीत, आणि आम्हाला त्यांच्यातले अधिकांश लोक दुराचारी दिसले.

103

१०३. मग त्यांच्यानंतर आम्ही (पैगंबर) मूसा यांना आपल्या निशाण्यांसह फिरऔन आणि त्याच्या सरदारांजवळ पाठविले तर त्यांनी त्या निशाण्यांचा हक्क अदा केला नाही. मग पाहा, दुराचारी लोकांचा कसा शेवट झाला!

104

१०४. आणि मूसा म्हणाले, हे फिरऔन! मी साऱ्या जगाच्या पालनकर्त्यातर्फे पैगंबर आहे.

105

१०५. माझ्याकरिता हेच उत्तम आहे की सत्याशिवाय अल्लाहविषयी काही न बोलावे. मी तुमच्या पालनकर्त्यातर्फे एक मोठी निशाणीही आणली आहे यास्तव तू इस्राईलच्या संततीला माझ्यासोबत पाठव.

106

१०६. तो (फिरऔन) म्हणाला, जर तुम्ही एखादा मोजिजा (चमत्कार) घेऊन आला असाल तर तो प्रस्तुत करा जर तुम्ही सच्चे असाल.

107

१०७. मग मूसा यांनी आपली लाठी खाली टाकली तर अचानक त्या काठीचा साप मोठा अजगर बनला.

108

१०८. आणि आपला हात बाहेर काढला तर अचानक तो सर्व पाहणाऱ्यांसमोर लख्ख चमकणारा बनला.

109

१०९. फिरऔनच्या जनसमूहाचे सरदार म्हणाले, हा मोठा निष्णात जादूगार आहे.

110

११०. तो तुम्हाला तुमच्या देशाबाहेर घालवू इच्छितो, तेव्हा तुमचा काय विचार आहे.

111

१११. ते म्हणाले, तुम्ही त्याला आणि त्याच्या भावाला संधी द्या आणि शहरांमध्ये एकत्र करणाऱ्यांना (दवंडी देणाऱ्यांना) पाठवा.

112

११२. की त्यांनी सर्व निष्णात जादूगारांना आपल्या समोर आणून हजर करावे.

113

११३. आणि जादूगार फिरऔनजवळ आले आणि म्हणाले, आम्ही जर सफल झालो तर आमच्यासाठी काही मोबदला आहे काय?

114

११४. तो म्हणाला, होय, आणि तुम्ही सर्व जवळच्या लोकांपैकी व्हाल.

115

११५. जादूगार म्हणाले, हे मूसा! वाटल्यास तुम्ही टाका किंवा आम्हीच टाकतो.

116

११६. (मूसा) म्हणाले, तुम्हीच टाका, तर जेव्हा त्यांनी टाकले, तेव्हा लोकांची नजरबंदी केली आणि त्यांना भयभीत केले आणि एक प्रकारची मोठी जादू दाखविली.

117

११७. आणि आम्ही मूसाला आदेश दिला की आपली लाठी खाली टाका, मग अचानक ती त्यांच्या बनविलेल्या खेळाला गिळू लागली.

118

११८. तेव्हा, सत्य जाहीर झाले आणि त्यांनी जे काही बनविले होते ते सर्व गायब झाले.

119

११९. यास्तव ते लोक याप्रसंगी पराजित झाले आणि बहुतेक अपमानित होऊन परतले.

120

१२०. आणि जादूगार सजद्यात पडले.

121

१२१. म्हणाले, आम्ही ईमान राखले साऱ्या जगाच्या पालनकर्त्यावर.

122

१२२. जो मूसा आणि हारून यांचाही पालनकर्ता आहे.

123

१२३. फिरऔन म्हणाला, तुम्ही माझ्या आदेशापूर्वीच त्या (मूसा) वर ईमान राखले, निश्चित हे एक कट-कारस्थान आहे जे तुम्ही शहरात त्याच्या रहिवाशांना त्यातून बाहेर घालविण्यासाठी रचले आहे, यास्तव तुम्हाला लवकरच माहीत पडेल.

124

१२४. मी तुमचा एक बाजूचा हात आणि दुसऱ्या बाजूचा पाय कापून टाकीन, मग तुम्हा सर्वांना सूळावर लटकवीन.

125

१२५. त्यांनी उत्तर दिले, आम्ही (मेल्यावर) आपल्या पालनकर्त्या जवळच जाऊ.

126

१२६. आणि तुम्ही आमच्यात हाच दोष पाहिला की आम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आयतीं (चिन्हां) वर ईमान राखले, जेव्हा त्या आमच्याजवळ येऊन पोहोचल्या. हे आमच्या पालनकर्त्या! आमच्यावर सब्र (धीर-संयम) ओत आणि आम्हाला ईमानधारक असतानाच मृत्यु दे.

127

१२७. आणि फिरऔनच्या जनसमूहाचे सरदार म्हणाले, काय तुम्ही मूसा आणि त्याच्या लोकांना असेच सोडून द्याल की त्यांनी धरतीवर फसाद (उत्पात) करावा, आणि तुमचा व तुमच्या दैवतांचा त्याग करावा. तो म्हणाला, आम्ही त्याच्या पुत्रांना ठार मारू आणि त्यांच्या स्त्रियांना जिवंत ठेवू आणि आम्ही त्यांच्यावर वर्चस्वशाली आहोत.

128

१२८. मूसा आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, अल्लाहची मदत घ्या आणि धीर-संयम राखा, ही धरती अल्लाहची आहे. तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, तिचा उत्तराधिकारी बनवितो आणि अंतिम सफलता त्यांनाच लाभते, जे अल्लाहचे भय बाळगतात.

129

१२९. ते म्हणाले, तुमच्या आगमनापूर्वीही आम्हाला कष्ट-यातना दिल्या गेल्या आणि तुमच्या आगमनानंतरही. मूसा म्हणाले, लवकरच तुमचा पालनकर्ता तुमच्या शत्रूंचा सर्वनाश करील आणि या धरतीचा वारसा तुम्हाला प्रदान करील, मग हे पाहील की तुम्ही कसे आचरण करता.

130

१३०. आणि आम्ही फिरऔनवाल्यांना दुष्काळ आणि फळांच्या उत्पन्नात कमीद्वारे घेरले, यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा.

131

१३१. जर त्यांच्याजवळ भलाई येते, तेव्हा म्हणतात की हे तर आमच्यासाठी व्हायलाच हवे आणि जर कष्ट-यातना येते, तेव्हा मूसा आणि त्यांच्या अनुयायींना अपशकूनी ठरवितात. ऐका, त्यांचा अपशकून अल्लाहच्या जवळ आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.

132

१३२. आणि ते म्हणाले, आमच्याजवळ जीदेखील निशाणी आमच्यावर जादू करण्यासाठी आणाल तरी आम्ही तुमच्यावर ईमान राखणार नाहीत.

133

१३३. मग आम्ही त्याच्यावर वादळ आणि टोळ आणि उवा आणि बेडूक आणि रक्त पाठविले, वेगवेगळ्या निशाण्या, मग त्यांनी घमेंड केली आणि ते अपराधी लोक होते.

134

१३४. आणि जेव्हा त्यांच्यावर एखादा अज़ाब (अल्लाहचा प्रकोप) येत असे, तेव्हा म्हणत की हे मूसा! आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याजवळ त्या वायद्याद्वारे, जो तुम्हाला दिला, दुआ (प्रार्थना) करा. जर तुम्ही आमच्यावरून अज़ाब हटविला तर अवश्य आम्ही तुमच्यावर ईमान राखू आणि तुमच्यासोबत इस्राईलच्या पुत्रांना पाठवू.

135

१३५. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावरून तो अज़ाब एका ठराविक मुदतीपर्यंत की त्यापर्यंत त्यांना पोहचणे क्रमप्राप्त होते, हटवित तेव्हा ते त्वरीत वचन भंग करू लागत.

136

१३६. मग आम्ही त्याच्याशी सूड घेतला अर्थात त्यांना समुद्रात बुडविले, या कारणास्तव की ते आमच्या आयतींना (निशाण्यांना) खोटे ठरवित, आणि त्यांच्याबाबत गाफीलपणा दर्शवित.

137

१३७. आणि आम्ही त्या लोकांना जे अतिशय दुर्बल समजले जात, त्या धरतीच्या पूर्व आणि पश्चिमेचे मालक बनविले, जिच्यात आम्ही समृद्धी राखली आहे आणि तुमच्या पालनकर्त्याचा नेक वायदा बनी इस्राईलविषयी, त्यांच्या धीर-संयमामुळे पूर्ण झाला आणि आम्ही फिरऔन आणि त्याच्या जनसमूहाने बनविलेल्या कारखान्यांना आणि ज्या उंच इमारती ते उभारत, सर्वकाही क्षत-विक्षत करून टाकले.

138

१३८. आणि आम्ही बनू इस्राईल (इस्लाईच्या मुलांना) ला समुद्रापलीकडे उतरविले, मग त्यांचे एका अशा जमातीजवळून जाणे झाले, जी आपल्या काही मूर्त्या (प्रतिमा) घेऊन बसली होती. (त्यांना पाहून हे लोक) म्हणाले, हे मूसा! आमच्यासाठी सुद्धा असेच उपास्य ठरवून द्या, जशी यांची ही दैवते आहेत. मूसा म्हणाले, खरोखर, तुम्हा लोकांत मोठी मूर्खता आहे.

139

१३९. हे लोक ज्या कामात गुंतले आहेत ते नष्ट केले जाईल आणि त्यांचे हे काम केवळ असत्य आहे.

140

१४०. फर्माविले, काय अल्लाहखेरीज अन्य एखाद्याला तुमचा माबूद (उपास्य) ठरवून देऊ? वास्तविक त्याने समस्त जगातील लोकांवर तुम्हाला प्राधान्य प्रदान केले आहे.

141

१४१. आणि ती वेळ आठवा, जेव्हा आम्ही तुम्हाला फिरऔनच्या लोकांपासून वाचविले जे तुम्हाला सक्त शिक्षा देत असत. तुमच्या पुत्रांची हत्या करीत आणि तुमच्या स्त्रियांना जिवंत सोडून देत आणि यात तुमच्या पालनकर्त्यातर्फे फार मोठी परीक्षा होती.

142

१४२. आणि आम्ही मूसा यांना तीस रात्रींचा वायदा दिला आणि दहा अधिक रात्रींनी तो पूर्ण केला, अशा प्रकारे त्यांच्या पालनकर्त्याचा अवधी पूर्ण चाळीस रात्रींचा झाला आणि मूसा, आपला भाऊ हारूनला म्हणाले, मी (गेल्या) नंतर या (लोकां) ची व्यवस्था राखा आणि सुधारणा करीत राहा आणि उपद्रवी व उत्पाती लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नका.

143

१४३. आणि जेव्हा मूसा आमच्या वेळेवर आले, आणि त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्याशी संभाषण केले तेव्हा त्यांनी विनंती केली, हे माझ्या पालनकर्त्या! मला आपले दर्शन घडू दे, मी एक क्षण तुला पाहून घेऊ. आदेश झाला की, तुम्ही मला कधीही पाहू शकणार नाही, परंतु तुम्ही या पर्वताकडे पाहात राहा, जर तो आपल्या जागी स्थिर उभा राहिला तर तुम्हीही मला पाहू शकाल. मग त्यांच्या पालनकत्यार्तने जेव्हा त्या पर्वतावर प्रकाश टाकला तेव्हा त्या दिव्य तेजाने त्याचे तुकडे तुकडे झाले आणि मूसा बेशुद्ध होऊन खाली पडले, मग जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा म्हणाले, निःसंशय (हे अल्लाह) तू पवित्र आहेस. मी तुझ्याजवळ आपल्या अपराधांची क्षमा मागतो आणि सर्वांत प्रथम तुझ्यावर ईमान राखतो.

144

१४४. अल्लाहने फर्माविले, हे मूसा! मी आपली पैगंबरी आणि आपल्याशी केलेल्या संभाषणाद्वारे इतर लोकांवर तुम्हाला श्रेष्ठता प्रदान केली आहे तेव्हा जे काही मी तुम्हाला प्रदान केले आहे, त्याचा स्वीकार करा आणि कृतज्ञता व्यक्त करा.

145

१४५. आणि आम्ही काही तक्त्यांवर प्रत्येक प्रकारचा बोध-उपदेश आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील त्यांना लिहून दिला. तुम्ही त्यांना पूर्ण शक्ती-सामर्थ्याने धरा आणि आपल्या लोकांना ताकीद करा की त्यातल्या चांगल्या आदेशानुसार आचरण करा. आता लवकरच तुम्हा लोकांना त्या दुराचारी लोकांचे स्थान दाखवितो.

146

१४६. मी अशा लोकांना आपल्या आयतींपासून विमुखच ठेवीन, जे जगात घमेंड करतात, ज्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. जर ते सर्व निशाण्या पाहूनही घेतील तरीही त्या ंच्यावर ईमान राखणार नाहीत आणि जर ते सत्य मार्ग पाहूनही घेतील तरी त्याला आपला मार्ग ठरविणार नाहीत, आणि जर ते मार्गभ्रष्टता पाहतील तर तिला आपला मार्ग बनवतील. हे अशासाठी की त्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि त्यांच्यापासून गाफील राहिले.

147

१४७. आणि ते लोक ज्यांनी आमच्या आयतींना आणि आखिरतच्या येण्याला खोटे ठरविले, त्यांचे सर्व आचरण वाया गेले, त्यांना तशीच यातना दिली जाईल, जसे कर्म ते करीत होते.

148

१४८. आणि मूसाच्या जनसमूहाने त्यांच्या पश्चात आपल्या दागिन्यांनी एक वासरू बनवून त्याला उपास्य दैवत बनविले, जो एक आकार मात्र होता ज्यात एक आवाज (ध्वनी) होता. काय त्यांनी हे नाही पाहिले की ते (वासरू) त्यांच्याशी बोलतही नव्हते आणि ना त्यांना मार्गदर्शन करीत होते त्याला त्यांनी (दैवत) बनविले आणि मोठे अन्यायाचे कृत्य केले.

149

१४९. आणि जेव्हा लज्जित झाले आणि जाणून घेतले की खरोखर ते लोक वाट चुकून बहकले, म्हणू लागले की जर आमच्या पालनकर्त्याने आमच्यावर दया केली नाही आणि आमचे अपराध माफ केले नाहीत तर खात्रीने आम्ही नुकसान भोगणाऱ्यांपैकी होऊ.

150

१५०. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाकडे परत आले क्रोध आणि दुःखात बुडालेले, तेव्हा म्हणाले, तुम्ही माझ्या पश्चातही मोठी वाईट हरकत केली. काय आपल्या पालनकर्त्याच्या आदेशापूर्वीच तुम्हीही घाई केली आणि त्वरेने तक्ते एका बाजूला टाकले आणि आपला भाऊ हारूनचे डोके धरून त्याला आपल्याकडे ओढू लागले. (हारून) म्हणाले, हे माझ्या मातेपासून जन्मलेले! या लोकांनी मला फार कमकुवत जाणले आणि बहुतेक त्यांनी मला ठार केले असते. तेव्हा तुम्ही माझ्या शत्रूंना हसवू नका आणि माझी गणना या अत्याचारी लोकांमध्ये करू नका.

151

१५१. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या आणि माझ्या भावाच्या चुका माफ कर आणि आम्हा दोघांना आपल्या दयेत दाखल कर आणि तू दया करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक दया करणारा आहेस.

152

१५२. निःसंशय, ज्या लोकांनी वासराची उपासना केली, त्यांच्यावर लवकरच त्यांच्या पालनकर्त्यातर्फे प्रकोप आणि अपमान या जगाच्या जीवनातच कोसळेल आणि आम्ही खोटा आरोप ठेवणाऱ्यांना अशीच शिक्षा देतो.

153

१५३. आणि ज्या लोकांनी दुष्कर्मे केलीत, त्यानंतर त्यांनी त्याबद्दल क्षमा-याचना केली आणि ईमान राखले तर तुमचा पालनकर्ता त्या क्षमा-याचनेनंतर अपराध माफ करणारा, दयावान आहे.

154

१५४. आणि जेव्हा मूसा यांचा क्रोध शांत झाला, तेव्हा त्यांनी ते तक्ते उचलून घेतले. त्यातल्या लेखांमध्ये, त्या लोकांकरिता जे आपल्या पालनकर्त्याचे भय राखत, मार्गदर्शन आणि दया-कृपा होती.

155

१५५. आणि मूसाने आपल्या जनसमूहातून सत्तर माणसांना आमच्या ठराविक अवधीकरिता निवडले, तर जेव्हा भूकंपाने त्यांना येऊन धरले, जेव्हा (मूसा) दुआ करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! जर तुला मान्य असते तर याच्यापूर्वीच यांचा आणि माझा नाश करून टाकला असता. काय तू आमच्यापैकी काही मूर्खांमुळे सर्वांचाच नाश करशील? ही घटना तुझ्यातर्फे केवळ एक कसोटी आहे, अशा कसोट्यांद्वारे तू ज्याला इच्छिल मार्गभ्रष्ट करशील आणि ज्याला इच्छिल मार्गदर्शन करशील. तूच आमचा संरक्षक आहेस. आता आम्हाला क्षमा कर आणि आमच्यावर दया कर आणि तू माफ करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक माफ करणारा आहेस.

156

१५६. आणि आम्हा लोकांच्या नावे या जगातही पुण्य लिहुन ठेव आणि आखिरतमध्येही. आम्ही तुझ्याचकडे लक्ष केंद्रित करतो. (अल्लाह) फर्मावितो की मी आपला प्रकोप त्याच्यावरच अवतरित करतो, ज्यावर इच्छितो आणि माझ्या दया-कक्षेत प्रत्येक गोष्ट आहे तर ती दया त्या लोकांच्या नावे अवश्य लिहीन, जे अल्लाहचे भय बाळगतात आणि जगात (धर्मदान) देतात आणि जे आमच्या आयतींवर ईमान राखतात.

157

१५७. जे लोक अशा अशिक्षित (जगातील गुरुजनांद्वारे शिक्षण न घेतलेल्या) पैगंबराचे अनुसरण करतात, जे त्या लोकांना आपल्या जवळच्या तौरात आणि इंजीलमध्ये लिहिलेले आढळतात. ते त्यांना नेकीच्या कामांचा आदेश देतात आणि दुष्कर्मांपासून रोखतात आणि पाक (स्वच्छ-शुद्ध) वस्तू हलाल (वैध) असल्याचे सांगतात आणि नापाक (अस्वच्छ-अशुद्ध) वस्तू हराम (अवैध) असल्याचे सांगतात आणि त्या लोकांवर जे ओझे आणि गळ्याचे फास होते, त्यांना दूर करतात. यास्तव जे लोक या (नबी) वर ईमान राखतात, आणि त्यांचे समर्थन करतात आणि त्यांना मदत करतात, आणि त्या नूर (प्रकाशा) चे अनुसरण करतात, जो त्यांच्यासोबत पाठविला गेला आहे, असे लोक पूर्ण सफलता प्राप्त करणारे आहेत.

158

१५८. तुम्ही सांगा, लोक हो! मी तुम्हा सर्वांकडे, त्या अल्लाहतर्फे पाठविला गेलो आहे, ज्याची राज्य-सत्ता समस्त आकाशांमध्ये व धरतीत आहे त्याच्याखेरीज कोणीही उपासना करण्यायोग्य नाही. तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यु देतो. यास्तव अल्लाहवर आणि त्याचे पैगंबर अशिक्षित नबीवर ईमान राखा की जे अल्लाहवर आणि त्याच्या हुकूमावर ईमान राखतात आणि त्यांचे अनुसरण करा, यासाठी की तुम्ही सत्य मार्गावर यावे.

159

१५९. आणि मूसा यांच्या जनसमूहात एक जमात अशीही आहे, जी सत्याला अनुसरून मार्गदर्शन करते आणि सत्यानुसारच न्याय करते.

160

१६०. आणि आम्ही त्यांना बारा परिवारांमध्ये विभागून सर्वांची वेगवेगळी जमात ठरवून दिली आणि आम्ही मूसाला आदेश दिला, जेव्हा त्यांच्या समुदायाच्या लोकांनी पाणी मागितले, की आपली लाठी अमक्या एका दगडावर मारा, मग त्याच क्षणी त्यातून बारा स्रोत वाहू लागले. प्रत्येकाने आपले पाणी पिण्याचे स्थान जाणून घेतले आणि आम्ही त्यांच्यावर ढगांची सावली केली आणि त्यांना मन्न आणि सल्वा पोहचविले की खा स्वच्छ शुद्ध स्वादिष्ट वस्तू, ज्या आम्ही तुम्हाला प्रदान केल्या आहेत. आणि त्यांनी आमचे काहीच नुकसान केले नाही, उलट ते स्वतःचेच नुकसान करीत होते.

161

१६१. आणि जेव्हा त्यांना आदेश दिला गेला की तुम्ही लोक त्या वस्तीत जाऊन राहा आणि खा तिथून, जिथे तुमची इच्छा होईल आणि तोंडाने म्हणत जा की आम्ही क्षमा मागतो आणि झुकलेल्या स्थितीत दरवाजाने प्रवेश करा. आम्ही तुमचे अपराध माफ करू, जे लोक सत्कर्म करतील, त्यांना याहून जास्त प्रदान करू.

162

१६२. परंतु या अत्याचारी लोकांनी, त्यांना सांगितलेल्या वचनाऐवजी दुसरेच वचन बदलून टाकले, त्यापायी आम्ही आकाशातून एक संकट त्यांच्यावर पाठविले, या कारणास्तव की ते जुलूम करीत होते.

163

१६३. आणि तुम्ही त्या लोकांना, त्या वस्तीच्या रहिवाशांची, जी समुद्राच्या जवळ वसली होती, त्या वेळची अवस्था विचारा, जेव्हा ते शनिवारच्या दिवसाबाबत मर्यादेचे उल्लंघन करीत होते. वास्तविक त्यांच्या शनिवारच्या दिवशी त्यांना मासे उघडपणे त्यांच्यासमोर येत आणि जेव्हा शनिवारचा दिवस नसे तेव्हा (मासे) त्यांच्या समोर येत नसत. आम्ही अशा प्रकारे त्यांची कसोटी घेत होतो. या कारणास्तव की ते आज्ञा भंग करीत होते.

164

१६४. आणि जेव्हा त्यांच्यातला एक गट असे म्हणाला की तुम्ही अशा लोकांना उपदेश का करता, ज्यांना अल्लाह पूर्णपणे बरबाद करणार आहे किंवा त्यांना कठोर शिक्षा देणारा आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले की तुमच्या पालनकर्त्यासमोर क्षमा-याचना करण्याकरिता आणि यासाठी की कदाचित त्यांनी (अल्लाहचे) भय बाळगावे.

165

१६५. मग जेव्हा ते त्या उपदेशाला विसरले, ज्याची त्यांना आठवण करून दिली जात राहिली, तेव्हा आम्ही त्या लोकांना तर वाचवून घेतले जे त्यांना वाईट गोष्टीपासून रोखत होते, आणि त्या लोकांना जे जुलूम अत्याचार करीत होते एका सक्त शिक्षा-यातनेने धरले, या कारणाने की ते आज्ञा भंग करीत होते.

166

१६६. अर्थात जेव्हा त्यांना ज्या कामापासून मनाई केली गेली, त्यात त्यांनी मर्यादेचे उल्लंघन केले, तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, तुम्ही अपमानित वान्हरे व्हा.

167

१६७. आणि त्या वेळेचेही स्मरण राखले पाहिजे की जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने सांगितले की तो या (यहूदी) लोकांवर कयामतपर्यंत अशा माणसाला आच्छादित ठेवील जो यांना कठोर शिक्षेद्वारे दुःख पोहचवित राहील. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लवकरच शिक्षा-यातना देणार आहे आणि निःसंशय तो खरोखर मोठा माफ करणारा आणि दयावान आहे.

168

१६८. आणि आम्ही या जगात त्यांचे (वेगवेगळे) गट पाडले. त्यांच्यात काही नेक सदाचारी होते आणि काही वेगळ्या आचरणाचे आणि आम्ही संपन्न अवस्था आणि वाईट अवस्थेद्वारे त्यांची कसोटी घेत राहिलो यासाठी की त्यांनी परतावे.

169

१६९. मग त्यांच्यानंतर असे लोक त्यांचे वारसदार बनले की ज्यांनी त्यांच्यापासून ग्रंथ प्राप्त केला. ते या तुच्छ जगाचे थोडेसेही धन घेऊन टाकतात आणि म्हणतात की आम्हाला अवश्य मुक्ती मिळेल, जरी त्यांच्याजवळ तसेच धन येत राहिले तर तेही घेऊन टाकतील. काय त्यांच्याशी या ग्रंथाच्या या मजकूराचा वायदा घेतला गेला नाही की अल्लाहकडे सत्य गोष्टीशिवाय दुसऱ्या कोणत्याही वचनाचा संबंध न दाखवतील. आणि त्यांनी या ग्रंथात जे काही होते, ते वाचले आणि आखिरतचे घर त्या लोकांसाठी चांगले आहे, जे अल्लाहचे भय बाळगतात, मग काय तुम्ही समजून घेत नाही?

170

१७०. आणि ज्या लोकांनी ग्रंथ मजबूतपणे धरला (ग्रंथावर अटळ राहिले) आणि जे नमाज कायम करतात, तर आम्ही अशा लोकांचा, जे स्वतःचे आचरण सुधारून घेतील, मोबदला वाया जाऊ देणार नाही.

171

१७१. आणि ती वेळही आठवा, जेव्हा आम्ही पर्वताला छत्रीसारखे त्यांच्यावर अधांतरित ठेवले आणि त्यांना खात्री झाली की आता त्यांच्यावर येऊन कोसळेल आणि आम्ही फर्माविले, की आम्ही जो ग्रंथ तुम्हाला प्रदान केला आहे त्याचा दृढतापूर्वक स्वीकार करा आणि लक्षात ठेवा यातले आदेश, यासाठी की तुम्ही अल्लाहचे भय बाळगू लागावे.१

172

१७२. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने आदमच्या संततीच्या पाठींमधून त्यांची अपत्ये काढली आणि त्यांच्याकडून त्यांच्याचबाबत वायदा घेतला की काय मी तुमचा स्वामी व पालनकर्ता नाही? सर्वांनी उत्तर दिले, का नाही, आम्ही सर्व साक्षी आहोत. यासाठी की तुम्ही लोकांनी कयामतच्या दिवशी असे न म्हणावे की आम्ही तर यापासून अगदी अजाण होतो.

173

१७३. किंवा हे सांगाल की सर्वांत प्रथम शिर्क तर आमच्या वाडवडिलांनी केले आणि आम्ही त्यांच्यानंतर त्यांच्या वंशात आलो. तर काय त्या चुकीच्या लोकांच्या दुष्कृत्यांबद्दल तू आम्हाला विनाशात टाकशील?

174

१७४. आणि आम्ही अशा प्रकारे आयतींचे स्पष्टपणे निवेदन करतो, यासाठी की (वाईट मार्गापासून) त्यांनी परत फिरावे.

175

१७५. आणि त्या लोकांना त्या माणसाची अवस्था वाचून ऐकवा की ज्याला आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या, मग तो त्यांच्यापासून अगदी निघून गेला, मग सैतान त्याच्या मागे लागला अशा प्रकारे तो वाट चुकलेल्या लोकांमध्ये सामील झाला.

176

१७६. आणि जर आम्ही इच्छिले असते तर त्याला या निशाण्यांमुळे उच्च पदावर बसविले असते, परंतु तो तर जगाच्या मोहपाशात अडकला आणि आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे चालू लागला तेव्हा त्याची अवस्था कुत्र्यासारखी झाली की जर तुम्ही त्याच्यावर हल्ला कराल तरीही (जीभ बाहेर काढून) धापा टाकील किंवा त्याला सोडून द्याल तरीही धापा टाकील. हीच अवस्थआ त्या लोकांची आहे, ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले, यास्तव तुम्ही या अवस्थेचे निवेदन करा, कदाचित त्या लोकांनी काही विचार करावा.

177

१७७. त्या लोकांची अवस्थादेखील मोठी वाईट अवस्था आहे, जे आमच्या आयतींना खोटे मानतात, आणि आपले नुकसान करून घेतात.

178

१७८. ज्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह स्वतः मार्गदर्शन करतो. तो सरळ मार्गावर असतो आणि ज्यांना अल्लाह मार्गभ्रष्ट करील, तेच तोट्यात आहेत.

179

१७९. आणि आम्ही असे अनेक जिन्न आणि मानव जहन्नमकरिता निर्माण केले आहेत, ज्यांची मने अशी आहेत की ज्यांच्याद्वारे समजत नाही, आणि ज्यांचे डोळे असे आहेत, ज्यांच्याद्वारे पाहत नाहीत आणि ज्यांचे कान असे आहेत, ज्यांच्याद्वारे ऐकत नाहीत. हे लोक चतुष्पाद (पशू) सारखे आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक भटकलेले१ हेच लोक गाफील आहेत.

180

१८०. आणि उत्तमोत्तम नावे अल्लाहकरिताच आहेत. यास्तव या नावांनी अल्लाहला पुकारीत जा आणि अशा लोकांशी संबंधही ठेवू नका, जे त्याच्या नावांमध्ये तेढनिर्माण करतात. त्या लोकांना त्यांच्या कृत कर्माची शिक्षा अवश्य मिळेल.

181

१८१. आणि आमच्या निर्मितीत एक जमात अशीही आहे, जी सत्यासह मार्गदर्शन करते आणि सत्याला अनुसरून न्याय करते.

182

१८२. आणि जे लोक आमच्या आयतीं (चिंन्हां) ना खोटे ठरवितात, आम्ही त्यांना हळू हळू (तावडीत) अशा प्रकारे घेत आहोत की त्यांना कळतदेखील नाही.

183

१८३. आणि त्यांना संधी देतो, निःसंशय माझी पद्धत मोठी मजबूत आहे.

184

१८४. काय त्या लोकांनी ही गोष्ट ध्यानी घेतली नाही की त्यांच्या साथीदाराला किंचितही वेड लागले नाही, ते तर केवळ एक स्पष्ट भय दाखविणारे आहेत.

185

१८५. आणि काय त्या लोकांनी विचार नाही केला आकाशांच्या आणि धरतीच्या विश्वात आणि दुसऱ्या चीज-वस्तूंमध्ये, ज्या अल्लाहाने निर्माण केल्या आहेत आणि या गोष्टीत की संभवतः त्याचे मरण जवळच येऊन ठेपले असावे, मग त्या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर हे लोक ईमान राखतील?

186

१८६. ज्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह मार्गभ्रष्ट करील त्याला कोणी सन्मार्गावर आणू शकत नाही, आणि अल्लाह अशा लोकांना मार्गभ्रष्टतेत भटकत राहण्यास सोडून देतो.

187

१८७. हे लोक तुम्हाला कयामतविषयी विचारतात की ती केव्हा येईल? तुम्ही सांगा की याचे ज्ञान फक्त माझ्या पालनकर्त्यालाच आहे. तिला तिच्या वेळेवर, अल्लाहखेरीज दुसरा कोणी जाहीर करणार नाही. ती आकाशांची व जमिनीची फार मोठी (घटना) असेल. ती तुमच्यावर अचानक येऊन कोसळेल. ते तुम्हाला अशा प्रकारे विचारतात, जणू काही तुम्ही तिचा शोध घेऊन बसलात. तुम्ही सांगा, तिचे ज्ञान विशेषरित्या अल्लाहजवळ आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत.

188

१८८. तुम्ही सांगा, मी स्वतः आपल्याकरिता एखाद्या फायद्याचा अधिकार राखत नाही, आणि ना एखाद्या नुकसानाचा, परंतु तेवढाच, जेवढा अल्लाहने इच्छिला असेल आणि जर मी अपरोक्ष गोष्टींना जाणणारा राहिलो असतो तर मी पुष्कळ लाभ प्राप्त करून घेतले असते, आणि एखादे नुकसानही मला पोहचले नसते.१ मी तर केवळ भय दाखविणारा आणि शुभ-समाचार देणारा आहे, त्या लोकांसाठी जे ईमान राखतात.

189

१८९. तो (अल्लाह) असा आहे की ज्याने तुम्हाला फक्त एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्याद्वारे त्याची जोडी बनवली, यासाठी की त्याने आपल्या त्या जोडीदारापासून सुख चैन प्राप्त करावी, मग पतीने पत्नीशी जवळीक केली, तेव्हा तिला गर्भ राहिला हलकासा, मग ती त्याला घेऊन चालत फिरत राहिली. जेव्हा तिला भार जाणवू लागला, तेव्हा पती-पत्नी दोघे अल्लाहशी, जो त्यांचा स्वामी आहे, दुआ (प्रार्थना) करू लागले की जर तू आम्हाला सहीसलामत (व्यवस्थित स्वरूपात) संतान प्रदान केली तर आम्ही खूप खूप आभार मानू.

190

१९०. तर जेव्हा अल्लाहने त्या दोघांना यथायोग्य संतान प्रदान केली, तेव्हा अल्लाहने प्रदान केलेल्यात ते दोघे (इतरांना) अल्लाहचा सहभागी ठरवू लागले, यास्तव अल्लाह पवित्र आहे त्याच्या सहभागी ठरविण्यापासून.

191

१९१. काय अशांना अल्लाहचा सहभागी ठरवितात, जे कोणत्याही चीज-वस्तूला निर्माण करू शकत नसावे (किंबहुना) स्वतः त्यांनाच निर्माण केले गेले असावे.

192

१९२. आणि ते त्यांना कसल्याही प्रकारची मदत करू शकत नाही, आणि ते स्वतः आपली मदत करू शकत नाही.

193

१९३. आणि जर तुम्ही एखादी गोष्ट सांगण्यासाठी त्यांना पुकाराल तर तुमच्या सांगण्यानुसार चालणार नाहीत. तुमच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, मग तुम्ही त्यांना पुकारा किंवा गप्प राहा.

194

१९४. वास्तविक तुम्ही अल्लाहला सोडून ज्यांना पुकारता (ज्यांची उपासना करता) तेदेखील तुमच्यासारखेच अल्लाहचे दास आहेत, तर तुम्ही त्यांना पुकारा, मग त्यांनीही तुमच्या सांगण्यानुसार केले पाहिजे. जर तुम्ही सच्चे असाल.

195

१९५. काय त्यांना पाय आहेत, ज्या आधारे ते चालत असावेत, किंवा त्यांना हात आहेत, ज्याद्वारे एखाद्या वस्तूला धरू शकतील, किंवा त्यांना डोळे आहेत, ज्याद्वारे ते पाहात असावेत, किंवा त्यांना कान आहेत, ज्याद्वारे ते ऐकतात. तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या सर्व सहभाग्यांना बोलावून घ्या, मग मला (हानी पोहचविण्याची) उपाययोजना करा. मग मला किंचितही सवड देऊ नका.

196

१९६. निःसंशय, माझा मित्र-मदतकर्ता अल्लाहच आहे ज्याने हा ग्रंथ (पवित्र कुरआन) अवतरीत केला आणि तो नेक सदाचारी लोकांची मदत करतो.

197

१९७. आणि तुम्ही ज्या लोकांना अल्लाहला सोडून पुकारता (उपासना करता) ते तुमची काहीच मदत करू शकत नाही, आणि ना ते स्वतः आपली मदत करू शकतात.

198

१९८. आणि जर त्यांना काही सांगण्यासाठी पुकाराल तर ते ऐकू शकणार नाहीत. आणि तुम्ही त्यांना पाहता की ते तुम्हाला पाहत आहेत आणि ते काहीच पाहत नाहीत.

199

१९९. तुम्ही क्षमाशीलतेचा मार्ग पत्करा, सत्कर्मांची शिकवण देत राहा, आणि मूर्ख लोकांपासून अलिप्त राहा.

200

२००. आणि जर तुम्हाला एखादा संशय सैतानाकडून येऊ लागेल तर अल्लाहचे शरण मागत जा. निःसंशय अल्लाह मोठा ऐकणारा आणि खूप जाणणारा आहे.

201

२०१. निःसंशय जे लोक (अल्लाहचे) भय बाळगतात जेव्हा त्यांना एखादा संशय सैतानाकडून उद्‌भवतो, तेव्हा ते अल्लाहच्या स्मरणात मग्न होतात, यास्तव अकस्मात त्यांचे डोळे उघडतात.

202

२०२. आणि जे सैतानांचे अनुयायी आहेत, ते त्यांना संकटात ओढून नेतात. मग ते थांबत नाही.

203

२०३. आणि जेव्हा तुम्ही एखादा मोजिजा (ईश-चमत्कार) त्यांच्यासमोर सादर करत नाही, तेव्हा ते लोक म्हणतात की तुम्ही हा चमत्कार का आणला नाही. तुम्ही सांगा की मी त्याचे अनुसरण करतो जो माझ्याकडे माझ्या पालनकर्त्यातर्फे आदेश पाठविला गेला आहे. हे मान्य करा. हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे अनेक प्रमाणे आहेत आणि मार्गदर्शन व दया कृपा आहे त्या लोकांकरिता, जे ईमान राखतात.

204

२०४. आणि जेव्हा कुरआन पठण होत असेल तेव्हा ते लक्षपूर्वक ऐका, आणि शांत राहा आशा आहे की तुमच्यावर दया होईल.

205

२०५. आणि (हे मानव!) आपल्या मनात नम्रता आणि भय राखून आपल्या पालनकर्त्याचे स्मरण करीत राहा. सकाळ-संध्याकाळ स्वर सौम्य ठेवून आणि गाफील लोकांपैकी होऊ नको.

206

२०६. निःसंशय, जे लोक तुझ्या पालनकर्त्याशी निकट आहेत ते त्याच्या उपासनेपासून घमेंड करीत नाही आणि त्याची पवित्रता वर्णन करीत त्याच्या पुढे सजदा करतात (माथा टेकतात).