ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. शपथ आहे पंक्तिबद्ध होणाऱ्यां (फरिश्त्यां) ची.

2

२. मग पूर्णतः दरडाविणाऱ्यांची.

3

३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची.

4

४. निःसंशय, तुम्हा सर्वांचा उपास्य (माबूद) एकच आहे.

5

५. आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्यांच्या दरम्यानच्या सर्व वस्तूंचा आणि समस्त पूर्व दिशांचा तोच स्वामी आहे.

6

६. आम्ही जगाच्या (जवळ असलेल्या) आकाशाला तारकांनी सजविले आणि सुशोभित केले आहे.

7

७. आणि (आम्ही त्याचे) प्रत्येक विद्रोही सैतानापासून रक्षण केले आहे.

8

८. उच्च विश्वाच्या फरिश्त्यां (च्या गोष्टी) ऐकण्याकरिता ते कानही लावू शकत नाही, किंबहुना चोहीकडून त्यांच्यावर मारा होत असतो.

9

९. पिटाळून लावण्याकरिता आणि त्यांच्या साठी कायमस्वरूपी अज़ाब (शिक्षा - यातना) आहे.

10

१०. परंतु जो घाईगर्दीने एखादी गोष्टी हिसकावून पळेल तर (तत्क्षणी) एक धगधगता निखारा त्याच्या पाठीशी लागतो.

11

११. या काफिर लोकांना विचारा की त्यांना निर्माण करणे जास्त कठीण आहे की ज्यांना आम्ही निर्माण केले आहे? आम्ही तर मानवांना चिकण मातीपासून निर्माण केले आहे.

12

१२. किंबहुना तुम्ही आश्चर्य व्यक्त करत आहात आणि हे लोक थट्टा उडवित आहेत.

13

१३. आणि जेव्हा त्यांना उपदेश केला जातो तेव्हा ते मानत नाहीत.

14

१४. आणि जेव्हा एखादा ईश-चमत्कार (मोजिजा) पाहतात तेव्हा ते थट्टा उडवितात.

15

१५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे.

16

१६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ?

17

१७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही?

18

१८. (तुम्ही) उत्तर द्या की होय, आणि तुम्ही अपमानितही व्हाल.

19

१९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील.

20

२०. आणि म्हणतील की, अरेरे आमचा विनाश, हाच मोबदल्याचा दिवस आहे.

21

२१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात.

22

२२. अत्याचारींना आणि त्यांच्या साथीदारांना आणि ज्यांची ज्यांची ते (अल्लाहखेरीज) उपासना करीत होते.

23

२३. (त्या सर्वांना) एकत्र करून, त्यांना जहन्नमचा मार्ग दाखवा.

24

२४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न विचारले जाणार आहेत.

25

२५. (या वेळी) तुम्ही एकमेकांची मदत करीत नाहीत, याला कारण काय?

26

२६. किंबहुना ते (सर्वजण) आज आज्ञाधारक बनले आहेत.

27

२७. आणि ते एकमेकांना संबोधून प्रश्नोत्तर करू लागतील.

28

२८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत.

29

२९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते.

30

३०. आणि आमच्या तुमच्यावर काहीच जोर नव्हता, किंबहुना तुम्ही तर (स्वतः) विद्रोही लोक होते.

31

३१. आता आम्हा (सर्वां) वर आमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान लागू झालेच आहे की आम्ही (शिक्षा-यातनाची) गोडी चाखणार आहोत.

32

३२. तेव्हा आम्ही तुम्हाला पथभ्रष्ट केले, आम्ही तर स्वतःदेखील पथभ्रष्टतेत होतो.

33

३३. तेव्हा आजच्या दिवशी (सर्वच) शिक्षा यातनेचे वाटेकरी आहेत.

34

३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो.

35

३५. हे असे (लोक) आहेत की जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा हे घमेंड करीत असत.

36

३६. आणि म्हणत की काय आम्ही आपल्या दैवतांना एका वेड्या कवीच्या बोलण्यावरून सोडून द्यावे!

37

३७. (नाही मुळीच नाही) किंबहुना पैगंबर तर सत्य (सच्चा दीन धर्म) घेऊन आले आहेत आणि सर्व पैगंबरांना खरे जाणतात.

38

३८. निःसंशय, तुम्ही दुःखदायक शिक्षा-यातनां (ची गोडी) चाखणार आहात.

39

३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते.

40

४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास!

41

४१. त्यांच्याचकरिता निर्धारित आजिविका (रोजी) आहे.

42

४२. (प्रत्येक प्रकारचे) मेवे आणि ते सन्मानित आदरणीय असतील.

43

४३. सुखांनी भरलेल्या जन्नतीमध्ये.

44

४४. आसनांवर एकमेकांच्या समोर बसले असतील.

45

४५. प्रवाहित (वाहत्या) मद्याचे प्याले त्यांच्या दरम्यान फिरत असतील.

46

४६. जे स्वच्छ सफेद आणि प्यायला स्वादिष्ट असेल.

47

४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील.

48

४८. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या आणि मोठमोठे सुंदर नेत्र असणाऱ्या (हूर-पऱ्या) असतील.

49

४९. अशा की जणू लपवून ठेवलेली अंडी!

50

५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील.

51

५१. त्यांच्यापैकी एक सांगणारा सांगेल की माझा एक जवळचा (सोबती) होता.

52

५२. जो (मला) सांगत असे की काय तू (कयामतच्या येण्याचा) विश्वास राखणाऱ्यांपैकी आहेस?

53

५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ, काय त्या वेळी आम्हाला (कृत कर्मांचा) मोबदला दिला जाईल?

54

५४. सांगितले जाईल, तुम्ही इच्छिता की डोकावून पाहावे?

55

५५. डोकावून पाहताच त्याला जहन्नममध्ये मध्यभागी (जळताना) दिसेल.

56

५६. तो म्हणेल, अल्लाहची शपथ! तू तर माझाही सर्वनाश करण्याच्या जवळ होता.

57

५७. जर माझ्यावर माझ्या पालनकर्त्याची कृपा नसती तर मी देखील जहन्नममध्ये हजर केल्या जाणाऱ्यांपैकी असतो.

58

५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत?

59

५९. पहिल्या एका मृत्युखेरीज, आणि ना आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिला जाईल.

60

६०. मग तर (स्पष्ट आहे की) ही फार मोठी सफलता आहे.

61

६१. अशी (सफलता) प्राप्त करण्यासाठी आचरण करणाऱ्यांनी आचरण केले पाहिजे.

62

६२. काय हे आतिथ्य अधिक चांगले आहे की जक्कूमचे झाड?

63

६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे.

64

६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते.

65

६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात.

66

६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील.

67

६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले.

68

६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल.

69

६९. विश्वास करा की त्यांना आपले वाडवडील पथभ्रष्ट (असल्याचे) आढळले.

70

७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले.

71

७१. आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले अनेक लोक मार्गभ्रष्ट झाले आहेत.

72

७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते.

73

७३. आता तुम्ही पाहा की ज्यांना (अल्लाहच्या अज़ाबचे) भय दाखविले गेले होते, त्यांचा शेवट कसा झाला.

74

७४. अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज.

75

७५. आम्हाला नूहने पुकारले तर पाहा की आम्ही किती चांगले दुआ (प्रार्थना) कबूल करणारे आहोत.

76

७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून वाचविले.

77

७७. आणि त्याच्या संततीला आम्ही बाकी राहणारी बनविले.

78

७८. आणि आम्ही त्याचे स्मरण (चर्चा) नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवले.

79

७९. नूह (अले.) वर साऱ्या जगात सलाम असो.

80

८०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

81

८१. निःसंशय, तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता.

82

८२. मग इतर लोकांना आम्ही बुडवून टाकले.

83

८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते.

84

८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले.

85

८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात?

86

८६. काय तुम्ही अल्लाहखेरीज मनाने रचलेली उपास्ये इच्छिता?

87

८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे?

88

८८. आता (इब्राहीमने) एक नजर ताऱ्यांवर टाकली.

89

८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे.

90

९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले.

91

९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत?

92

९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत!

93

९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले.

94

९४. ते (अनेकेश्वरवादी) धावत पळत त्यांच्याकडे आले.

95

९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता, ज्यांना तुम्ही स्वतः बनविता.

96

९६. वास्तविक तुम्हाला आणि तुम्ही बनविलेल्या वस्तूंना अल्लाहनेच निर्माण केले आहे.

97

९७. ते (लोक) म्हणाले, याच्यासाठी एक घर (अग्निकुंड) तयार करा आणि त्या (धगधगत्या) आगीत याला टाकून द्या.

98

९८. त्यांनी तर त्याच्या (इब्राहीम) शी डाव खेळी इच्छिले, परंतु आम्ही त्यांनाच तोंडघशी पाडले.

99

९९. आणि (इब्राहीम) म्हणाले की मी तर (हिजरत- देशत्याग) करून आपल्या पालनर्त्याकडे जाणार आहे, तो निश्चितच मला मार्ग दाखविल.

100

१००. हे माझ्या पालनकर्त्या! मला नेक सदाचारी पुत्र प्रदान कर.

101

१०१. तेव्हा आम्ही त्याला एक सहनशील पुत्र (प्राप्ती) ची शुभवार्ता दिली.

102

१०२. मग तेव्हा (बालक) या वयास पोहचले की त्याच्यासोबत हिंडू फिरू शकेल, तेव्हा (इब्राहीम) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! मी स्वप्नात स्वतःला तुझे बलिदान (कुर्बानी) करताना पाहत आहे. आता तूच सांग, तुझा काय विचार आहे?१ पुत्राने उत्तर दिले, हे पिता! जो आदेश (अल्लाहतर्फे) दिला जात आहे, त्याचे पालन करा. अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला धीर-संयम राखणाऱ्यांपैकी आढळेल.

103

१०३. अर्थात जेव्हा दोघांनी स्वीकार केला आणि त्या (पित्या) ने त्या (पुत्रा) ला माथा टेकलेल्या अवस्थेत खाली पाडले.

104

१०४. तेव्हा आम्ही हाक मारली, हे इब्राहीम!

105

१०५. निःसंशय, तुम्ही स्वप्नाला खरे करून दाखविले. निःसंशय, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

106

१०६. वास्तविक ही उघड अशी कसोटी होती.

107

१०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२

108

१०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली.

109

१०९. इब्राहीमवर सलाम असो.

110

११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

111

१११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता.

112

११२. आणि आम्ही त्याला पैगंबर इसहाकचा शुभ समाचार दिला, जो नेक सदाचारी लोकांपैकी असेल.

113

११३. आणि आम्ही इब्राहीम व इसहाकवर अनेक (प्रकारची) समृद्धी अवतरित केली आणि या दोघांच्या संततीत काही तर भाग्यशाली आहेत आणि काही आपल्या प्राणांवर उघड अत्याचार करतात.

114

११४. आणि निश्चितच आम्ही मूसा आणि हारूनवर मोठा उपकार केला.

115

११५. आणि त्यांची आणि त्यांच्या जनसमूहाची फार मोठ्या दुःख-यातनेतून सुटका केली.

116

११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले.

117

११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला.

118

११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले.

119

११९. आणि आम्ही त्या दोघांकरिता नंतर येणाऱ्यांमध्ये ही गोष्ट बाकी ठेवली.

120

१२०. मूसा आणि हारूनवर सलाम असोे.

121

१२१. निःसंशय, आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करीत असतो.

122

१२२. निःसंशय, हे दोघे आमच्या ईमानधारक दासांपैकी होते.

123

१२३. आणि निःसंशय, इलियास देखील पैगंबरांपैकी होते.

124

१२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत.

125

१२५. काय तुम्ही (वअ्‌ल) नावाच्या मूर्तीला पुकारता आणि सर्वांत उत्तम अशा निर्माणकर्त्याला सोडून देता?

126

१२६. अल्लाह, जो तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व वाडवडिलांचा स्वामी व पालनकर्ता आहे.

127

१२७. परंतु जनसमूहाच्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, तेव्हा ते अवश्य (शिक्षा - यातनाग्रस्त अवस्थेत) हजर केले जातील.

128

१२८. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज.

129

१२९. आणि आम्ही (इलियासची) शुभा चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली.

130

१३०. इलियासवर सलाम असो.

131

१३१. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

132

१३२. निःसंशय, तो आमच्या ईमानधारक दासांपैकी होता.१

133

१३३. निःसंशय, लूत (अलै.) पैगंबरांपैकी होते.

134

१३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली.

135

१३५. मात्र त्या म्हातारीखेरीज, जी मागे राहणाऱ्यांमध्ये राहिली.

136

१३६. मग आम्ही इतर सर्वांचा सर्वनाश केला.

137

१३७. आणि तुम्ही तर सकाळ झाल्यावर त्यांच्या वस्त्यांवरून जाता.

138

१३८. आणि रात्री देखील, मग काय तरीही समजून घेत नाही?

139

१३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते.

140

१४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले.

141

१४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले.

142

१४२. मग त्यांना माशाने गिळून टाकले आणि ते स्वतःचाच धिःक्कार करू लागले.

143

१४३. तेव्हा जर ते तस्बीह (अल्लाहचे गुणगान) करणाऱ्यांपैकी नसते.

144

१४४. तर लोकांना उठविले जाण्याच्या दिवसापर्यंत माशाच्या पोटातच राहिले असते.

145

१४५. तर आम्ही त्याला सपाट मैदानात टाकून दिले, आणि त्या वेळी तो आजारी होता.

146

१४६. आणि त्याच्यावर सावली करणारे एक वेलीचे झाड उगविले.

147

१४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले.

148

१४८. तेव्हा त्यांनी ईमान राखले आणि आम्ही एका ठराविक मुदतपर्यंत त्यांना सुख सुविधा प्रदान केली.

149

१४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत?

150

१५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले?

151

१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत.

152

१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत.

153

१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले?

154

१५४. तुम्हाला झाले तरी काय, कसा हुकूम लावत फिरता?

155

१५५. काय तुम्हाला एवढेही समजत नाही?

156

१५६. किंवा तुमच्याजवळ (त्याविषयी) एखादे स्पष्ट प्रमाण आहे?

157

१५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन या.

158

१५८. आणि त्या लोकांनी तर अल्लाह आणि जिन्नांच्या दरम्यानही नाते कायम केले आहे, आणि वास्तविक जिन्न लोक स्वतः हे ज्ञान बाळगतात की ते (अशी श्रद्धा राखणारे अज़ाबच्या समोर) प्रस्तुत केले जातील.

159

१५९. हे, जे काही (अल्लाहविषयी) सांगत आहेत, त्यापासून सर्वश्रेष्ठ अल्लाह पवित्र (अलिप्त) आहे.

160

१६०. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज.

161

१६१. विश्वास करा की तुम्ही सर्व आणि तुमची (खोटी) उपास्ये.

162

१६२. कोणा एकालाही बहकवू शकत नाही.

163

१६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत.

164

१६४. (फरिश्त्यांचे कथन आहे) की आमच्यापैकी प्रत्येकाचे स्थान निर्धारित आहे.

165

१६५. आणि आम्ही (अल्लाहच्या आज्ञापालनात) पंक्तिबद्ध (रांगांनी) उभे आहोत.

166

१६६. आणि त्याची तस्बीह (पावित्र्यगान) करीत आहोत.

167

१६७. आणि काफिर तर म्हणत असत

168

१६८. की जर आमच्याजवळ पूर्वीच्या लोकांची स्मृती असती

169

१६९. तर आम्ही देखील अल्लाहचे निवडक दास बनलो असतो.

170

१७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल.

171

१७१. आणि निःसंशय, आमचा वायदा आधीच आपल्या पैगंबरांकरिता लागू झालेला आहे

172

१७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल.

173

१७३. आणि आमचे सैन्य वर्चस्वशाली (आणि श्रेष्ठतम) राहील.

174

१७४. आता तुम्ही काही दिवसा पर्यंत यांच्याकडून तोंड फिरवून घ्या.

175

१७५. आणि त्यांना पाहत राहा, आणि ते देखील लवकरच पाहतील.

176

१७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत.

177

१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल.

178

१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा.

179

१७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील.

180

१८०. पवित्र आहे तुमचा पालनकर्ता, जो मोठा प्रतिष्ठा बाळगणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीहून जी (अनेकेश्वरवादी) बोलत असतात.

181

१८१. आणि पैगंबरांवर सलाम आहे.

182

१८२. आणि समस्त प्रशंसा, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहकरिता आहे.